Wednesday, 19 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९  नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 गोवा मुक्तीदिन आज साजरा केला जात आहे. साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा स्वतंत्र झाला. त्यानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोव्यातल्या जनतेला मुक्तिदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****



 राज्यातील सर्व अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असं राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या वतीनं अल्पसंख्यांक हक्क दिवस काल नागपूर इथं साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्यासाठी उभा असेल असं सांगत सरकारच्या १५ कलमी कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करून घेण्यात येईल तसंच समाजाच्या विकासासाठी कायम प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही शेख यांनी यावेळी दिली.

****



 प्रगल्भ समाज निर्मितीसाठी वाचन महत्वपूर्ण असून ग्रंथोत्सव ही वाचन संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणारी उपयुक्त चळवळ आहे असं प्रतिपादन औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं ग्रंथोत्सव २०१८ च्या समारोपप्रसंगी बोलत होते. ज्ञान, कौशल्य, माहितीसाठी ग्रंथ, पुस्तक हे प्रभावी साहित्य असून, हे साहित्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं पाहिजे असंही ते म्हणाले. वाचनाचा संस्कार अधिक व्यापक करण्यासाठी शिक्षणाचा सर्वदूर प्रसार होणं, प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळणं ही बाब प्राधान्यानं महत्वाची ठरते असंही त्यांनी नमूद केलं.

****



 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेकरता १७ क्रमांकाचा अर्ज भरण्यासाठीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. खाजगी विद्यार्थी अतिविलंब शुल्कासह ऑफलाईन पध्दतीनं हा अर्ज भरून परीक्षा देऊ शकतील, असं मंडळानं कळवलं आहे.

****



 विभागात परभणी, नांदेड, औरंगाबादसह बहुतांश ठिकाणी तापमानात मोठी घसरण झाली आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गारठा निर्माण होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. वाढत्या थंडीचा रब्बी पीकांना फायदा होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments: