Saturday, 22 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ डिसेंबर २०१  दुपारी .०० वा.

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक झाली. सुरक्षा बलाच्या जवानांनी अवंतीपुरा परिसरात शोधमोहीम सुरु केली होती, त्यावेळी दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातल्या अडालज गावाजवळ त्रिमंदिर परिसरात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय संमेलनात उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्या या दोन दिवसीय संमेलनाचं काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राष्ट्रीय महिला मोर्चात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेल्या महिलांनी सहभाग घेतला आहे. पंतप्रधान कालपासून गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत

****



 नवी दिल्लीत आज वस्तू आणि सेवाकर परिषदेची बैठक सुरु आहे. या बैठकीत अनेक वस्तूंवरचे जीएसटी दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ९९ टक्के वस्तूंवरील जीएसटी कर १८ टक्के किंवा त्याहून कमी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. निर्यातदारांसाठी नियम सोपे करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता असून, हायब्रिड कारवर सध्या लागू असलेला, २८ टक्के दर कमी करण्यावरही विचार होण्याची शक्यता आहे.

****



 आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचं धोरणंच भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचं कारण बनेल, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात, असे सांगत ठाकरे यांनी, सरकारच्या विविध धोरणावर टीका केली. देशातल्या १० महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही संगणकावर नजर ठेवण्याचा अधिकार देण्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला. तसंच सरकारी तिजोरीत पैसा नसताना कांदा उत्पादकांना अनुदान कोठून देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जानेवारी मध्ये पुन्हा एकदा नाशिकच्या दौऱ्यावर येणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.

****



 देशात युरिया खताचा तुटवडा असल्याचं सरकारनं नाकारलं आहे. आपलं मंत्रालय सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात असून कोठेही युरियाची कमतरता नसल्याचं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंगौडा यांनी सांगितलं. सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात युरिया खताचं वाटप झालेलं आहे, परंतु राज्यांनी वितरणाचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे, असं ते म्हणाले.

****



 तेलंगणात काँग्रेसच्या सहा विधानपरिषद सदस्यांपैकी चार सदस्य काल पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रीय समितीमध्ये सहभागी झाले. काँग्रेसचे एम.एस. प्रभाकर राव, टी. संतोष कुमार, के.दामोदर रेड्डी आणि अकुला ललिता यांनी विधानपरिषद सभापती के. स्वामी गौड यांना भेटून, टीआरएसमध्ये सहभागी होण्याबाबतची याचिका सादर केली. त्यानंतर विधानपरिषदेच्या सचिवांनी या सदस्यांना टीआरएसमध्ये सहभागी करून घेण्याची सभागृहाला सुचना केली. ४० सदस्यांच्या विधानपरिषदेत काँग्रेसचे आता मोहम्मद अली शब्बीर आणि पी. सुधाकर रेड़्डी हे दोनच सदस्य राहीले आहेत.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५१वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव कृषी उत्पन्नबाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. १८ संचालक पदांसाठी ६०उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १०८ मतदान केंद्रांवर ६० हजार हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 चौथी प्रिमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून मुंबईत सुरु होत आहे. ऑलिम्पिक तसंच जागतिक विजेते या स्पर्धेत भाग घेत आहेत. स्पेनच्या कॅरालिना मरिन, व्हीक्टर एक्सेलसन, भारताचे पी. व्ही सिधूं, एच एस प्रणोय, के श्रीकांत तसंच सायना नेहवाल यांच्यासह ९० खेळाडू भाग घेत असून, १३ जानेवारीला बंगळुरू इथं स्पर्धेचा समारोप होईल.

****



  विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान वाढलं आहे.

*****

***

No comments: