Saturday, 29 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2018 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी आणि गाझीयाबादला भेट देणार आहे. ते वाराणसीमध्ये स्थापन केलेलं सहावं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या दक्षिण आशियायी प्रादेशिक केंद्र राष्ट्रला समर्पित करणार आहेत. हे केंद्र दक्षिण आशिया आणि सार्क प्रदेशासाठी तांदूळ संशोधनासाठी लाभदायी ठरणार आहे. तसंच देशाच्या पूर्वोत्तर भागातलं अशा प्रकारचं असलेलं हे पहिलचं आंतरराष्ट्रीय केंद्रामुळं या प्रदेशामध्ये तांदळाच्या भरघोस उत्पादनासाठी मोठी मदत होणार आहे. या नंतर पंतप्रधान मोदी  ’एक जिल्हा एक उत्पादन’ या प्रादेशिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहे. यावेळी ते महाराज सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करणार आहेत.
****

 केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठीचे प्रोत्साहन सहाय्य पाच टक्क्यांवरून दहा टक्के केलं आहे. देशामध्ये कांद्याचे भरमसाठ उत्पादन झाल्यानंतर कांद्याचे भाव पडल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे किंमती स्थिर होण्यास मदत होईल, असंही या पत्रकात म्हटलं आहे. जुलै २०१८ पर्यंत कांदा निर्यातीला कोणतेही प्रोत्साहन सहाय्य देण्यात येत नव्हते. मात्र, जुलैपासून कांदा निर्यातीला पाच टक्के सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
****

 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे एक लाख बारा हजार कर्ज अर्ज मंजूर केले असून त्यापोटी ३७ हजार ४१२ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे. ’एकोणसाठे मिनिटात कर्ज’ या योजनेअंतर्गत हे कर्ज मंजूर करण्यात आलं असल्याचं या मंत्रालयानं लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक़ाकडे कर्जासाठी आलेल्या एक लाख ३१ हजार अर्जांपैकी एक लाख बारा हजार अर्ज मंजूर करण्यात आले असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला म्हणाले. यापैकी ४० हजार ६६९ प्रकरणांमध्ये १४ हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं असल्याचं ते म्हणाले.
****

 केंद्रीय मंत्रीमंडळाने भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या १० हजार कोटी रुपयांच्या गंगायान अभियानाला मंजूरी दिली आहे. या अभियानात सात भारतीय यात्रींसह अवकाशयान पृथ्वीपासून सर्वात खालच्या एका कक्षात सात दिवसांसाठी थांबून संशोधन कार्य करून शकेल. या अभियानासाठी यात्रींना अवकाशात घेऊन जाऊ शकेल अशा जी एस एल व्ही एम के- तीन या अवकाशायानाची निवड करण्यात आली आहे. या अभियानासाठी मंजूर करण्यात आलेल्या दहा हजार कोटी रुपयांमध्ये या अभियानासाठीचं नवं तंत्रज्ञान विकसीत करण्याबरोबरच यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्मिती देखील करण्यात येणार आहे.
****
 भारतीय व्यवस्थापन संस्था आईआईएम मध्ये पीएचडी करण्यासाठी कमीत कमी कालावधी तीन वर्षांचा असेल, अशी माहिती काल राज्यसभेत देण्यात आली. मनुष्य बळ विकास राज्यमंत्री  सत्यपाल सिंह यांनी काही व्यवस्थापन संस्थांनी आयआयएममध्ये पी एच डी अभ्यासक्रमासाठी दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परवानगीची विनंती केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
 २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशातल्या एटीएम केंद्राच्या संख्येत  घट झाली आहे. रिझर्व्ह बँकेनं  काल जारी केलेल्या वार्षिक अहवालात  या वर्षात एटीएमची संख्या दहा हजारांनी कमी होवून ती दोन लाख सात हजार इतकी झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. डिजिटल व्यवहारामध्ये झालेली वाढ हे एटीएमच्या संख्येत घट होण्यामागील एक कारण असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
 भारत चीन सीमेवर सिक्कीमच्या नाथूला दरीच्या परिसरात अडकलेल्या जवळपास २५०० पर्यंटकांची सेनेच्या जवानांनी आज सकाळी सुखरूप सुटका केली. या परिसरात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळं ४०० वाहनांमधले २,५०० पर्यटक अडकून पडले होते.
****
 कर्मचारी राज्य वीमा महामंडळ ईएसआईसीच्या रूग्णालयांमध्ये आता बिगर वीमा लाभधारक रूग्णही रूग्णालयाचे शुल्क देऊन उपचार घेवू शकतात. सामान्य व्यक्तीही रूग्णालयाची ठराविक शुल्क दिल्यावर इथं उपचार घेऊ शकतात, असं श्रम आणि रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवाल यांनी सांगितलं. सध्या प्रायोगिक तत्वावर निवडक रूग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली असून कालावधीनंतर देशभरातल्या सर्व ईएआईसीच्या रूग्णालयामंध्ये ही योजना लागू केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
****
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज  वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर इथं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी बंद पुकारला आहे. एकरी ५० हजार रुपये कर्जवाटप आणि कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर  जमा करा, या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. स्वामीनाथन आयोगानुसार दीडपट हमीभाव द्यावा आणि शिरपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागण्या देखील हे शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या ३९८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या आठ बाद २५७  धावा झाल्या आहेत. भारतानं आठ बाद १०६ धावांवर दुसऱ्या डावाचा खेळ घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३९९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
*****
***

No comments: