Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या
दिवसापासून गाजत असलेल्या मुद्यांवरून संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत राफेल
लढाऊ विमानाचा मुद्दा आणि इतर विषयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात
व्यत्यय आला. काँग्रेसनं राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची
मागणी लावून धरली. अण्णाद्रमुक पक्षाचे सदस्य कावेरी नदीवर प्रस्तावित मेकादेतु धरणाच्या
विरोधात घोषणाबाजी करत, हौद्यात उतरले. तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनीही आंध्रप्रदेशला
विशेष राज्याचा दर्जा देत, अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसाठी हौद्यात उतरून, फलक झळकावत
घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दुपारी
बारा वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावरही विरोधकांची घोषणाबाजी
सुरुच राहील्याचं अध्यक्षांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्यकाळ
पुकारताच अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम - एआयएडीएमकेच्या सदस्यांनी कावेरी
पाणीप्रश्नी तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली, तर तेलगु
देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी
केली. हा गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
मुस्लिम महिला वैवाहीक अधिकार संरक्षण विधेयक पारित
करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी केलं आहे. संसद भवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. तिहेरी तलाकची पद्धत
रद्द करण्याची तरतूद असलेलं हे विधेयक राजकारणापलिकडचं असून, याचा धर्माशी काहीही संबंध
नसल्याचं ते म्हणाले. मुस्लिम महिलांना न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून देणं, हा या विधेयकाचा
उद्देश असल्याचंही प्रसाद म्हणाले.
****
शिष्यवृत्तीची
थकलेली रक्कम अदा करण्यासाठी केंद्र सरकारनं अडीचशे कोटी रुपयांच्या निधीला विशेष मंजुरी
दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि आखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था यांच्याकडून
शिष्यवृत्तीची रक्कम थकल्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे विशेष निधी देण्याबद्दल
निर्णय घेण्यात आला, असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याच्या ३० तारखेला शिष्यवृत्तीची रक्कम
पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संशोधन पाठ्यवृत्तीची शिष्यवृत्ती
रक्कम वाढवण्याच्या मागणीबद्दल सरकार सकारात्मक आहे असंही त्यांनी सांगितलं.
****
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या शुल्कासंबंधी नवीन नियमांमुळे कार्यक्रमांच्या प्रसारणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं दूरसंचार नियामक प्राधिकरण – ट्रायनं स्पष्ट केलं आहे. परवा २९ डिसेंबरपासून वाहिन्यांच्या पॅकेजसंदर्भातला नियम लागू होत असल्यानं, सध्या दिसणाऱ्या वाहिन्यांचं प्रक्षेपण बंद होणार असल्याचं वृत्त प्रसारित होत आहे, या पार्श्वभूमीवर ट्रायनं, प्रक्षेपण बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, ट्रायच्या या नियमांना विरोध दर्शवत, केबल
चालकानी आज संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळेत प्रसारण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
****
मतदान
केंद्रांवर कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्याचा निर्णय
निवडणूक आयोगानं घेतला आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी
सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी जिल्हा निवडणूक आधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक
सूचना देण्यासही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. धुम्रपानच नव्हे तर तंबाखू खाण्यावरही
बंदी घालण्यात येणार असून, यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेशही निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
उत्तर
भारतात थंडीची लाट आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब
आणि हरियाणात दाट धुक्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. लेहमधे उणे
१७ पूर्णांक एक दशांश, तर गुलमर्गमधे उणे नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. राज्यातही
तापमानात पुन्हा घट झाली आहे. आज सर्वात कमी एक पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नाशिक
जिल्ह्यातल्या निफाड इथं नोंदवलं गेलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या
कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसर्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद आठ धावा झाल्या.
तत्पूर्वी भारतानं आपला पहिला डाव सात बाद ४४३ धावांवर घोषित केला. चेतेश्र्वर पुजारानं
आज आकर्षक १०६ धावा तसंच कर्णधार विराट कोहलीनं ८२, अजिंक्य रहाणेनं ३४, ऋषभ पंतनं
३९ धावा केल्या. रोहित शर्मा ६३ धावांवर नाबाद राहिला. चार सामन्यांच्या या मालिकेत
दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment