Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 25 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
नागरी सेवा परिक्षेत सहभागी होण्यासाठी
वयासंबंधीच्या निकषात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं
आहे. सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री
जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. सामान्य श्रेणी उमेदवारांसाठी नागरी सेवा परिक्षेला
बसण्यासाठीची वयोमर्यादा २०२२ - २३ पर्यंत २७ वर्ष केली जाणार असल्याचं वृत्त प्रसारित
झालं होतं, त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. नागरी परिक्षेत सामान्य श्रेणी उमेदवारांसाठीची
वयोमर्यादा ३२ वर्ष आणि अनुसूचित जाती आणि जमातीतल्या उमेदवारांसाठी ३७ वर्ष इतकी आहे.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी
वाजपेयी यांची जयंती आज देशभरात सुशासन दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला सुशासन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्याचं महत्व हा दिवस विषद करतो, असं त्यांनी
म्हटलं आहे. प्रत्येक धोरण आणि कार्यक्रम राबवताना नागरिकांच्या कल्याणाचा विचार झाला
पाहिजे, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे.
****
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक आणि राष्ट्र निर्माते
मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मालवीय यांना अभिवादन केलं आहे. मालवीय यांनी स्वातंत्र्य आंदोलन
आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं
आहे.
****
देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोर मोठं
आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. भारतीय
अर्थव्यवस्थेच्या स्थितीसंदर्भात आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं, सिंचनासारख्या पायाभूत सुविधांमध्ये
अधिक गुंतवणूक करून तसंच शेतमालाच्या खरेदीतलं सहकार्य वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न
वाढवणं हाच उपाय असल्याचं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार आर्थिक तूट
कमी करण्याचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास व्यक्त करत, महसूल प्राप्तीच्या दृष्टीनं
वाहन, दूरसंचार, बांधकाम आणि हवाई वाहतूक क्षेत्रात नुकत्याच झालेल्या
विक्री कराच्या अनुषंगानं लक्ष ठेवण्यात आलं आहे असं जेटली यांनी सांगितलं.
****
सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू असून
विविध देशांमधून भारतात आलेल्या लोकांनी तो स्वीकारला, असं
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी
दिल्ली इथं गुप्तचर विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. देश सुरक्षित करण्यासाठी गुप्तचर
विभाग गाजावाजा न करता अथक प्रयत्न करत असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. चौकशी
टाळण्यासाठी निर्णयच न घेण्याची प्रवृत्ती नोकरशहांमधे बळावली आहे, याबाबत
नाराजी व्यक्त करुन, पारदर्शकता महत्त्वाची आहे, पण
त्याच बरोबर कालबद्ध निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीही आवश्यक आहे, असं गडकरी यावेळी
म्हणाले.
****
समाज माध्यमं आणि ऑनलाईन माध्यमांचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारनं माहिती
आणि तंत्रज्ञानविषयक नियमावलीत बदल प्रस्तावित केले आहेत. सरकारनं मागणी केल्यास माहितीचा
स्रोत उघड करणं समाज माध्यमं तसंच ऑनलाईन माध्यमांना बंधनकारक असेल. कोणत्याही संदेशाचं
मूळ जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार सरकारला असेल. समाज माध्यमांनी
बेकायदेशीर माहिती वा संदेश ओळखून ते समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्याचं तंत्रज्ञान
विकसित करणं आवश्यक आहे, असंही या सुधारित प्रस्तावात म्हटलं आहे.
****
वीज वापराची मोजणी करणारी मापनयंत्रं म्हणजेच वीजमीटर
आता प्रिपेड करण्याचा निर्णय केंद्र
सरकारनं घेतला आहे. पुढील वर्षाच्या
एक एप्रिलपासून तीन वर्षात स्मार्ट प्रीपेड वीजमापकं उपयोगात आणायचा सरकारचा विचार
आहे. यामुळे वितरण आणि वापरामधलं वीजगळतीचं प्रमाण कमी होईल, आणि
ऊर्जा बचत होईल. ग्राहकांना पूर्ण महिन्याचं देयक भरण्याऐवजी वापराएवढं देयक भरण्याची
सुविधा या स्मार्ट प्रीपेड वीजमापकांमुळे उपलब्ध होईल, तसंच
या मापकांच्या निर्मितीमुळे उद्योगक्षेत्रात रोजगार निर्माण होतील.
****
यवतमाळ जिल्ह्यात ट्रक आणि जीपच्या अपघातात नऊ जण ठार तर अन्य सहा जण जखमी झाले. कळंब तालुक्यात चापर्डा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. अपघातग्रस्त जीपमध्ये पारडी गावातील रहिवासी होते. जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालय आणि यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे.
****
हैदराबाद
इथं प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत आज
चौथ्या दिवशी हैदराबाद हंटर्स आणि चेन्नई स्मॅशर्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल.
*****
***
No comments:
Post a Comment