Wednesday, 26 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.12.2018 07.10AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26  December 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६    डिसेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

v शाळा प्रवेशासाठी आधार क्रमांकाची सक्ती करता येणार नसल्याचं, विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून स्पष्ट
v `भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय’ १३ शाळांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
v ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ - भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
आणि
v उदगीर जिल्हा मागणीचा ठराव करत, मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप
*****

शाळा प्रवेशासाठी आधार क्रमांकाची सक्ती करता येणार नसल्याचं, विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या निर्णयात, बँक खाते, दूरसंचार सेवांसोबतच शाळा प्रवेशासाठीही आधार क्रमांक आवश्यक नाही, असं म्हटलं होतं, त्यामुळे शाळांनी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देताना, आधार क्रमांक मागणं बेकायदा असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे. पॅन्‍ अर्थात कायम खाते क्रमांक, आयकर विवरणपत्रं, आणि काही कल्याणकारी योजनांसाठीच आधार क्रमांक आवश्यक करण्यात आला आहे.
****

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या `भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय’ १३ शाळांचा शुभारंभ काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या या शाळांचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यशासन राबवत असलेल्या कल्पक प्रयोगांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांत गेलेली मुलं, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परतत असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
****

 परभणी इथल्या केंद्रीय विद्यालयाचं उद्घाटन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते काल झालं. डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात उभारलेल्या वसतीगृहाचं उद्घाटनही लोणीकर यांच्या हस्ते काल झालं.
****

 राज्यातल्या ९० टक्के शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. राज्यातल्या आत्महत्या पीडित १४ जिल्ह्यांमध्ये गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये किलो दरानं उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीसंदर्भातली बोलणी अद्याप सुरू व्हायची असल्याचं, ते म्हणाले.
****

 प्रत्येक राज्यात एक मध्यवर्ती बालगृहं उभारण्याचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी, आकाशवाणीला दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली. या बालगृहात राज्यातली सर्व निराधार मुलं राहू शकतील, त्यांच्या देखभालीवर लक्ष देणं सोपं होईल, असं गांधी यांनी सांगितलं. बालगृहासाठी आवश्यक असलेली जागा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून द्यावी, असंही गांधी यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
****

 आसाम आणि अरुणाचल प्रदेशाला जोडणाऱ्या बोगीबील या सर्वात लांब रेल्वे आणि रस्ता पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. ब्रह्मपुत्र नदीवरच्या सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे रेल्वे प्रवास कालावधीत सुमारे दहा तासांची बचत होणार असून, रस्ता मार्गाने अंतर सुमारे पाचशे किलोमीटरने कमी होणार आहे. चीन सीमेवर संरक्षण साहित्य पोहोचवण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.

 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ५१ वा भाग असेल.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यात कर्जत इथल्या तौसिफ शेख आत्मदहन प्रकरणी जबाबदार असलेले, कर्जतचे मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी या सर्वांना निलंबित करून त्यांच्या विरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी काल कर्जत इथं तौसीफ शेख याच्या कुटुंबियांची भेट घेउन सांत्वन केलं. तौसिफच्या कुटुंबियांना ५०लाख रुपयांची मदत करावी, त्याच्या पत्नीस शासकीय नोकरीत घ्यावं तसंच या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. मराठवाडा साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांचं अनुदान देण्यात यावं, उदगीर जिल्हा निर्मिती करावी, मराठवाड्यातल्या सर्व रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण करून मध्य रेल्वेशी जोडण्यात यावं, उदगीर इथं पशुधन विद्यापीठ स्थापन करावं, आदी बारा ठराव यावेळी संमत करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, एक्क्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा कार्यक्रमासह काल आयोजित विविध विषयांवरचे परिसंवाद, तसंच कविसंमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
****

देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँक कर्मचारी अधिकारी शिखर संघटनेनं आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. या संपात राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
****

 विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काल बीड इथं दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदानाची पावती देणारं व्ही व्ही पॅट यंत्राचीही भापकर यांनी बीड इथं प्रात्याक्षिकाव्दारे माहिती घेतली. या यंत्रांसंबंधी मतदारांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असं ते म्हणाले.
****

 माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****

 प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामांची गुंतागुंत न करता एकावेळी एकच काम जबाबदारीपूर्वक पूर्ण केल्यास, संबंधित जनता आणि संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचंही समाधान होईल, अस लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी म्हटलं आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हास्तरीय सुशासन दिन प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. प्रशासनात साध्या साध्या गोष्टीतून आदर्शवत काम करत, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून सुशासन देता येतं, अस मतही त्यांनी यावेळी व्यक्त केल.
****

 पहिलं राज्यस्तरीय भटके विमुक्त आदीवासी साहित्य संमेलन येत्या रविवारी औरंगाबाद इथं होत असल्याची माहिती मुख्य संयोजक के. ओ. गिर्हे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. या एक दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी टी. एस. चव्हाण यांची निवड करण्यात आली असून माधवराव बोर्डे स्वागताध्यक्ष असतील. संमेलनात चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****

  भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना पर्थ इथं आजपासून सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद ५३ धावा झाल्या होत्या. हनुमा विहारी आठ धावांवर बाद झाला, मयंक अग्रवाल ३४ तर चेतेश्वर पुजारा सहा धावांवर खेळत आहेत.
*****
***

No comments: