आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २८ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
** मुस्लिम
महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयक २०१८ लोकसभेत दुसऱ्यांदा
मंजूर
** एक जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य
मंत्रिमंडळाची मंजूरी
** मराठा
क्रांती मोर्चा आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने दाखल गुन्ह्यांच्या फेरचौकशीचं गृह राज्यमंत्र्यांचं आश्वासन
आणि
** मेलबर्न कसोटीत भारताचा पहिला
डाव सात बाद ४४३ धावांवर घोषित
****
तिहेरी तलाकला प्रतिबंध करणारं मुस्लिम महिला वैवाहिक
अधिकार संरक्षण विधेयक २०१८ लोकसभेत काल मंजूर झालं. तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवून, अशा प्रकारे तलाक
देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षे तुरुंगवासाची तरतूद या विधेयकात
आहे. हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारं असून, कोणत्याही
धर्म, समाज आणि मान्यतेविरुद्ध नसल्याचं कायदा मंत्री
रविशंकर प्रसाद यांनी विधेयक मांडताना सांगितलं.
गेल्या
वर्षी डिसेंबर महिन्यात लोकसभेनं तिहेरी तलाक विधेयक मंजूर केलं होतं. मात्र राज्यसभेत
ते मंजूर होऊ शकलं नाही. त्यानंतर सरकारनं अध्यादेश काढला, मात्र सहा महिन्यांच्या
मुदतीत या विधेयकाला संसदेची मंजूरी न मिळाल्यानं, काल हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडण्यात
आलं.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर
सादर करण्याची मागणी केली. तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, अण्णाद्रमुकचे
पी वेणुगोपाल, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही हे विधेयक संयुक्त संसदीय
समितीसमोर सादर करण्याची मागणी केली. विधेयकातल्या दंडात्मक तरतुदीवर विरोधी
पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.
या विधेयकावर मतदानापूर्वी काँग्रेसच्या सदस्यांनी
सभात्याग केला, त्यानंतर हे विधेयक २४५ विरुद्ध ११ मतांनी मंजूर झालं, आता हे
विधेयक राज्यसभेकडे मंजुरीसाठी पाठवलं जाईल.
त्यापूर्वी काल लोकसभेत
काँग्रेस, अण्णाद्रमुक आणि तेलगुदेशम पक्षांनी अनुक्रमे
राफेल खरेदी चौकशी, कावेरी धरण आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या
मागणीसाठी गदारोळ केल्यानं, सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही
याच मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारी
पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य मंत्रिडळानं काल मान्यता दिली. एक जानेवारी
२०१६ पासूनची तीन वर्षांची थकबाकी, येत्या आर्थिक वर्षापासून पाच वर्षात पाच समान हप्त्यांत
रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवृत्तीवेतनात वाढ करण्यासही राज्यसरकारनं काल मंजुरी
दिली. ८० ते ८५ वर्षे वयोगटातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात १० टक्के,
८५ ते ९० वयोगटाला १५ टक्के, ९० ते ९५ वयोगटाला २० टक्के, ९५ ते १०० वयोगटाला २५ टक्के
तर १०० वर्षांवरच्या निवृत्तीवेतनधारकांच्या मूळ निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ होईल.
राज्यात १०० हून अधिक वर्षांचे ३६२ निवृत्तीवेतनधारक आहेत.
शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातल्या नांदेड शहरानजीकच्या
किवळा साठवण तलावाचं काम जलसंपदा विभागामार्फत करण्यास तसंच मुंबई मेट्रो मार्ग चार
अ कासारवडवली ते गायमुख या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादन होत असल्याने साखर
उद्योग अडचणीत येवू नये यासाठी इथेनॉल प्रक्रियेवर भर द्यावा, असं
आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. काल मुंबईत साखर उद्योगांच्या
समस्या आणि उपायासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. इथेनॉल
प्रक्रियेसंदर्भातल्या सर्व सूचनांचा एकत्रित अहवाल येत्या १० जानेवारी पर्यंत
सादर करण्याचे निर्देशही देशमुख यांनी दिले
****
मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीनं
गुन्हे दाखल झालेल्या घटनांची नि:पक्षपातीपणे फेरचौकशीचं आश्वासन गृह राज्यमंत्री
दीपक केसरकर यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.
आंदोलनात सहभागी नसतानाही गुन्ह्यांची नोंद झालेल्या घटनांची माहिती समन्वय
समितीने पंधरा दिवसात पोलीसांना द्यावी, अशा प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल,
असंही केसरकर यांनी सांगितलं.
****
मुंबईत चेंबूर
भागात एका इमारतीच्या १४ व्या
मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला
तर अनेक जण जखमी झाले. काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग आता नियंत्रणात
आली आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथं ६४ व्या राष्ट्रीय शालेय
बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं
काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत
१४ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातले खेळाडू सहभागी होतील. दोन जानेवारीपर्यंत चालणाऱ्या
या स्पर्धेत देशभरातले सुमारे एक हजार खेळाडू, सहभागी होणार आहेत.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न
सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाच्या
चार बाद ८९ धावा झाल्या आहेत. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या तिघांनी
प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी
भारतानं काल आपला पहिला डाव सात बाद ४४३ धावांवर घोषित केला. पहिल्या डावात चेतेश्र्वर पुजारानं १०६, कर्णधार
विराट कोहलीनं ८२, अजिंक्य रहाणेनं ३४, तर ऋषभ पंतनं ३९ धावा केल्या. रोहित शर्मा ६३
धावांवर नाबाद राहिला. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
नव्व्याणवावं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येत्या २२ ते २५ जानेवारी दरम्यान
नागपूर इथं होणार आहे. अखिल भारतीय मराठी परिषदेनं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती
दिली.
****
परभणी जिल्ह्यात सेलु इथं उद्यापासून संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं आहे. छोट्या गावांमधली शास्त्रीय संगीताची परंपरा, लोकाश्रयावर टिकवून
ठेवण्यासाठी स्थापन "शार्ङ्गदेव संगीत मंच" च्या वतीनं हा महोत्सव आयोजित
करण्यात आला आहे. सेलू इथल्या नूतन विद्यालयात उद्या सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाला
प्रारंभ होणार आहे.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी
तालुक्यातल्या भायगव्हाण इथं शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत वीस एकर जमिनीवरील ऊस
जळाला. काल सायंकाळी झालेल्या या घटनेत सात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून, विद्युत
विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
****
राफेल विमान खरेदीत घोटाळ्याचा आरोप
करत, परभणी काँग्रेस समितीच्यावतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात
आलं. व्यापारी, बेरोजगार, शेतमजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत
असून उद्योजकांना मोठं करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
****
शिवसंग्रामचा औरंगाबाद इथला नियोजित
वर्धापनदिन मेळावा येत्या सहा जानेवारीऐवजी २७ जानेवारी रोजी होणार आहे. पक्षाचे संस्थापक,
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल औरंगाबादमध्ये ही माहिती दिली.
//***********//
No comments:
Post a Comment