Thursday, 20 December 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.12.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 December 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

लोकसभेत आज ‘ग्राहक संरक्षण विधेयक २०१८’ पारित करण्यात आलं. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे. जिल्हा आयोगाला एक कोटी, राज्य आयोगाला १५ कोटी आणि राष्ट्रीय आयोगाला त्यापेक्षा जास्त रकमेच्या दाव्यांशी संबंधित तपासणी करण्याची परवानगी या विधेयकाअंतर्गत देण्यात आली आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतुदही या विधेयकात आहे.

****

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या. यात ७१ पुरवणी मागण्या आणि दोन विनियोजन विधेयकांचा समावेश आहे. यामध्ये ८५ लाख ९४९ कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. तसंच त्यांनी कंपनी सुधारणा विधेयक २०१८ ही लोकसभेत सादर केलं.

****

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या कांद्यासाठी २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळानं घेतलेल्या या निर्णयाबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत. नगण्य बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं अनुदान देण्याबाबत मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी मागणी केली होती.

डॉ. होमी भाभा विद्यापीठ उभारण्यासही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबईची शासकीय विज्ञान संस्था, एलफिन्स्टन महाविद्यालय आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचा समावेश करुन हे विद्यापीठ उभारण्यात येणार असून, यात रोजगार निर्मिती पूरक अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत.

राज्यात रस्ते सुरक्षा विषयक कामकाज हाताळण्यासाठी शिर्षसंस्था स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यासाठी सहपरिवहन आयुक्त, परिवहन उपायुक्त, उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त अशा १६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली.

११ विद्यापीठांसाठी ३२ अधिष्ठातांच्या पदांना मंजुरी, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना करण्यास, अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या तुकाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत २० पाझर तलावात पाणी सोडण्यास, जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.

****

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आपल्याला पटला नसून, ही रक्कम अपुरी असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ इथं आज ते बोलत होते. 

दरम्यान, बागलाण मधल्या नामपूर बाजार समितीत आज कांद्याला एक रुपया प्रति किलो तर क्विंटलला शंभर रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव रोखल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी आणि भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं राज्य रस्ते विकास महामंडळाला आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २५० कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा धनादेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांकडून भूसंपादनासाठी दुय्यम कर्ज स्वरुपाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येत आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्या विरुद्ध १६ नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज मंजूर झाला. कर्मचारी आणि सहकारी नगरसेवकांशी उद्धट वर्तन करणं, या कारणावरुन शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

****

जालना इथं सुरु असलेल्या ६२व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज मल्ल सागर मारकडनं अंतिम फेरीत धडक मारली. तर मल्ल ओंकार लाडनं शिवराज हाके याचा पराभव करुन आणि कोल्हापूरच्या भरत पाटील यानं सुरज अस्वले याचा पराभव करुन कांस्य पदक पटकावलं. मुंबईच्या सचिन पाटीलनं अजय भोईर याचा पराभव करुन कांस्य पदक मिळवलं. तर माती विभागाच्या ७९ किलो वजनी गटात साताऱ्याचा किरण बरकडे यानं अजहर शेखचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं.

****

दरम्यान, या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आज शहरातून पहिलवानांची दुचाकी रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला.

****

No comments: