Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2018
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २६ डिसेंबर
२०१८ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रीय
तपास संस्था एनआयएनं दहशतवादी संघटना इसीसशी संबंधांच्या संशयावरून उत्तरप्रदेश आणि
नवी दिल्लीत दहा जणांना आज ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये १६ ठिकाणी
धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारत, प्रामुख्यानं
देशाच्या राजधानीमध्ये स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांतील
पाच जणांना पश्चिम उत्तरप्रदेशमधील आमरोहा जिल्ह्यातून आणि उर्वरितांना ईशान्य दिल्लीतून
ताब्यात घेण्यात आलं.
`हरकत
उल हर्ब ए इस्लाम` संघटनेच्या नावानं हे संशयित कारवाया करत होते. त्यांच्या संशयास्पद
उपक्रमांची माहिती मिळाल्यानंतर काही काळापासून एनआयएचं त्यांच्यावर लक्ष होतं.
****
अंतरराष्ट्रीय
गोल्फपटू ज्योती रंधावाला अवैध शिकारी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश वन
विभागानं बहराईच जिल्ह्यातील मोतीपूर वनक्षेत्रात ही अटक केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं
एक पथक रंधावाची चौकशी आणि कायदेशीर कारवाई करत आहे. पोलिसांनी आकाशवाणीला दिलेल्या
माहितीनुसार ज्योती रंधावा आणि त्याचा मित्र महेश विराजदार गेल्या काही दिवसांपासून
या भागात होते आणि वन विभागाचं एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन होतं. रानडुकराचं कातडं,
दुर्बीन आणि रंधावाच्या नावे असलेली बंदूक तसंच एक वाहन, वन्य जीव संबंधी वस्तू त्यांच्याकडे
आढळल्या आहेत. रंधावा आणि त्याच्या मित्रानं काल एका जंगली कोंबड्याची शिकार केल्याचंही
वृत्त आहे.
****
लोकसभेत
उद्या मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१८ अर्थात तीन तलाक विधेयक २०१८
सादर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, उद्या सकाळी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची एक
बैठक होणार आहे. या विधेयकावर संसदेत होणाऱ्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार असल्याचं
या पक्षानं आधीच जाहीर केलं आहे. विधेयकावर कॉंग्रेसची भूमिका काय असेल याबाबत या बैठकीत
निर्णय घेतला जाईल असं पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं पीटीआयशी बोलतांना सांगितलं.
****
माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाचा छायाचित्र विभाग पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सातवी
राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार स्पर्धा घेणार आहे. यात छायाचित्रकारांना विविध पुरस्कारांनी
सन्मानित केलं जाणार आहे. तीन लाख रुपयांचा एक जीवन गौरव पुरस्कार यात आहे. व्यावसायिक
छायाचित्रकारांसाठी एक लाख रुपयाचा एक आणि पन्नास हजार रुपयांचे पाच पुरस्कार यात दिले
जाणार आहेत. पुरस्कारासाठी या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत अर्ज पाठवता येतील. अधिक
माहितीसाठी डब्ल्यू डब्लू डब्लू डॉट फोटोडिव्हीजन डॉट गव्ह डॉट इन येथे संपर्क साधण्याचं
आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केलं आहे.
****
केंद्र
सरकारनं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला पाच हजार ६७५ रुपये निश्चित केली आहे.
राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागानं
केंद्र सरकारकडं पाठविला आहे. आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरु
करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री
करु नये, असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. गत हंगामात दोन फेब्रुवारी
२०१८ पासून खरेदी केंद्र सुरु करण्यात आलं होतं. यंदा हंगामातील आधारभूत किंमतीनं तूर
खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी
दरानं व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये आणि ही विक्री करत असताना शेतकऱ्यांनी सात
बारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, असं आवाहन पणन मंत्री देशमुख यांनी केलं आहे.
****
१६
वी मुंबई मॅरॅथॉन स्पर्धा येत्या २० जानेवारीला होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली. या स्पर्धेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
स्पर्धेत जवळपास ५० हजार स्पर्धक भाग घेतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
बँक
विलीनीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळं
औरंगाबाद जिल्ह्यातील कामकाज आज विस्कळित झालं होतं. देना बँक आणि विजया बँकेच्या बडोदा
बँकेतील विलीनीकरणाला विरोधासाठी हा संप होता. शहरातल्या अदालत रस्त्यावरील देना बँकेसमोर
बँक अधिकारी आणि कर्मचारी कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे
पदाधिकारी देवीदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातले साडेचारशे बँक
कर्मचारी या संपात सहभागी झाले.
****
औरंगाबाद
महापालिकेनं प्प्लॅस्टिक जप्ती मोहिमेअंतर्गत २५० दुकानांवर कारवाई करून सुमारे १२६५
किलो प्लॅस्टिक जप्त केलं आहे. उपायुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखालील या
कारवाईत तीन लाख १७ हजार, ४५० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे पहिल्या डॉ.भीमराव गस्ती प्रबोधन
आणि डॉ.रखमाबाई राऊत पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी
यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. त्यानुसार आदिवासी हक्कांसाठी कार्यरत
पालघरचे मिलिंद थत्ते यांना ‘डॉ. गस्ती प्रबोधन’ आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत
चाळीसगावच्या मिनाक्षी निकम यांना ‘डॉ. राऊत पुरस्कार’ येत्या पाच जानेवारी रोजी सामाजिक
न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
****
No comments:
Post a Comment