Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 15 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
जगभरातल्या आर्थिक अनिश्चिततेच्या
वातावरणात देखील भारत सात ते आठ टक्के वृद्धीदर राखणार असून, सर्वाधिक वेगानं वाढणारी
अर्थव्यवस्था कायम राखणार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते काल
नवी दिल्लीत फिक्कीच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. तसंच चालू आर्थिक वर्षात सरकार
तीन दशांश तीन पूर्णांक टक्के तुटीचं लक्ष्य ठेवणार असून, अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा
करण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं जेटली यावेळी म्हणाले.
****
जाणीवपूर्वक कर्ज बुडवणाऱ्यांची
यादी जाहीर करण्याच्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती
स्थगिती दिली आहे. तसंच रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांना माहिती उघड
करत नसल्याबद्दल जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशीलाही न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी
आणि न्यायमूर्ती एस व्ही कोतवाल यांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे. केंद्रीय दक्षता
आयोगानं रिझर्व बँकेला एक हजार कोटी रुपयांहून जास्त रकमेची कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांची यादी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांच्या
विरोधात रिझर्व्ह बँकेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची
पुढची सुनावणी १० एप्रिल २०१९ ला होणार आहे.
****
मिझोराममधे
मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष झोरामथांगा आज दुपारी ऐझवालमध्ये मुख्यमंत्रीपदाची
शपथ घेणार आहेत. राज्यपाल कुम्मानम शेखरन हे झोरामथांगा यांना पद आणि गोपनियतेची शपथ
देतील. इशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या पदग्रहण सोहळ्यास आमंत्रित करण्यात
आलं आहे.
****
काँग्रेस आज छत्तीसगडमध्ये
मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करणार आहे. ९० आमदाराच्या विधानसभेत काँग्रेसनं ६८
जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. नवनियुक्त आमदारांची आज बैठक होण्याची शक्यता
आहे.
****
श्रीलंकेचे पंतप्रधान
महिंदा राजपक्षे यांनी आज आपल्या पदाचा राजिनामा दिला. यामुळे रानील विक्रमसिंघे यांचा
नवं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कनिष्ठ न्यायालयानं राजपक्षे यांच्या
सरकारला काम करण्यासाठी घातलेल्या निर्बंधाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं नकार
दिल्यावर राजपक्षे यांना राजिनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
****
नैसर्गिक स्रोतांच्या सुयोग्य
वापरासाठी आणि शाश्वत विकासासाठी देशाला जास्तीत जास्त देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाची
गरज असल्याचं मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त
केलं आहे. ते काल नवी दिल्लीत आयोजित सामाजिक उद्योजकता परिषदेत बोलत होते. खादी हे
सामाजिक उद्योजकतेचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचा दाखला देत त्यांनी, युवकांना
खादी उद्योगात सहभागी होण्याचं आणि शाश्वत विकासाच्या मॉडेलचा एक भाग बनण्याचं आवाहन
केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची
निवडणूक २२ डिसेंबरला होत आहे. मतदारांना मतदानाचा
हक्क बजावता यावा, तसंच मतदान शांततेत पार पडावं यासाठी बाजार समिती निवडणूक क्षेत्रातल्या तामसा, कवान आणि पळसा या तीन ठिकाणचे आठवडी बाजार
शनिवार ऐवजी दुसऱ्या दिवशी रविवारी २३ डिसेंबरला भरवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या नव्या जहिराबाद - लातूर या राष्ट्रीय
महामार्गाची रुंदी २४ मीटरवरुन ३० मीटर करण्यास मान्यता दिली असल्याचं, जिल्ह्याचे
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. ते काल लातूर इथं बोलत होते. अतिरिक्त
सहा मीटर जमिनीचा मावेजा संबंधितांना मिळावा, यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही
निलंगेकर यांनी दिली.
****
परभणी तालुक्यात मौजे खानापूर - जलालपूर इथं उभारलेल्या
सांस्कृतिक सभागृहाचं काल आमदार राहुल पाटील
यांच्या हस्ते लोकार्पण झालं. आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत पाच लाख रूपयांतून हे
सभागृह उभारण्यात आलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसर्या दिवशी भारताची निराशाजनक सुरुवात झाली.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद ७० धावा झाल्या होत्या. लोकेश राहुल
दोन, तर मुरली विजय एकही धाव न करता बाद झाला. विराट कोहली ३७, तर चेतेश्वर पुजारा
२३ धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी आज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात
आला. भारत २५६ धावांनी पिछाडीवर आहे.
****
चीनमध्ये
ग्वांगझू इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत
आज समीर वर्मा आणि पी.व्ही.सिंधू आपापल्या
गटात उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पी व्ही सिंधू
चा सामना थायलंडच्या रत्चानोक इंटॅनॉन हिच्याशी, तर
पुरुष एकेरीत समीरची लढतनं चीनच्या युकी शी याच्याशी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment