Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 16
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू
करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø रेशीम शेतीला
बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची राज्य सरकारची ग्वाही
Ø राज्यातल्या औरंगाबादसह १३
शहरांमध्ये क्षयरोगमुक्तीच्या 'जीत' प्रकल्पाची अंमलबजावणी
आणि
Ø जागतिक बॅडमिंटन
महासंघाच्या, वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत जेतेपदासाठी आज भारताच्या पी. व्ही सिंधूची
जपानच्या नोझोमी ओकुहाराशी लढत; तर क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या तीन बाद
१७२ धावा
****
मराठवाड्यात वसंतदादा साखर संस्था - शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन
सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पुणे
जिल्ह्यातल्या मांजरी इथं काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या
४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ऊस कापणी
यंत्र - हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनानं ४०
लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे
होणार असून पारदर्शक मतदानाचा अनुभव देणाऱ्या या यंत्राच्या सुविधेची माहिती मतदारांपर्यंत
पोहोचवण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचं प्रात्यक्षिक संपूर्ण जिल्ह्यात करुन, मतदारांमध्ये
जनजागृती करावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार
यांनी काल औरंगाबाद इथं दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद विभागातल्या लोकसभा
निवडणूक तयारी संदर्भातली आढावा बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी
संबधितांना हे निर्देश दिले. या बैठकीला, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्यासह
विभागातले आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
उपस्थित होते.
****
कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन
देण्यासाठी रेशीम ग्रामचा उपक्रम राबवण्यात येत असून या माध्यमातून अर्थसहाय्यासह बाजारपेठ
उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी
दिली आहे. काल नागपूर इथं, महा रेशीम अभियान २०१९’ चा राज्यस्तरीय शुभारंभ देशमुख यांच्या
हस्ते झाला, त्यावेळी राज्यातल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते
बोलत होते. रेशमाची मागणी जगात वाढत असताना राज्यातल्या रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन
देण्याचं धोरण तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रेशीम ग्रामच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोष ते कापड ही
संपूर्ण प्रक्रिया क्लस्टरच्या माध्यमातून राबवणार असल्याचं देशमुख म्हणाले.
****
“जीत” प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त
महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर आणि
संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक
सावंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल “राष्ट्रीय क्षयरोग
नियंत्रण कार्यक्रम” अंतर्गत ‘जीत’ प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी
ते बोलत होते. राज्यातल्या औरंगाबाद,
कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबईसह १३
शहरांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं.
****
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किसान सभेच्या वतीनं आत्महत्याग्रस्त विभागात जागृती
अभियान सुरू करण्यात येत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी काल
अहमदनगर इथं ही माहिती दिली. वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून या अभियानाची सुरुवात
करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यात
आतापर्यंत दोन लाख १२ हजार ७७२ मुलामुलींचं लसीकरण करण्यात आलं. या मोहिमेमध्ये नऊ
महिने ते १५ वर्ष वयोगटातले एकूण पाच लाख १२ हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.
गोवर रुबेला आजाराचं उच्चाटन होण्यासाठी सर्व पालकांनी मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन
आरोग्य विभागानं केलं आहे.
****
ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षिकांनी साहित्यनिर्मितीबरोबरच वाचन चळवळ उभी करण्याचा आणि
स्वत: अभिव्यक्त होण्याचा वसा घेण्यासाठी पुढं यायला हवं असं मत शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षिका
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रतिभा भराडे यांनी व्यक्त केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या
उमरगा इथं राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी काल त्या बोलत
होत्या. सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला मोरे यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्धाटन
झालं.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
*****
रब्बी हंगामात पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत
कर्जदार शेतकऱ्यांना आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर ही आहे. पीक विमा योजना
ही कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित महसूल मंडळातल्या अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा
हप्ता रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात
आला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर
करून एक महिना उलटून गेला असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोणत्याही उपाययोजना
केल्या नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. सरकारमार्फत दुष्काळग्रस्त
शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत जाहीर करावी अशा मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं.
****
चीनमधे ग्वांगझू इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन
महासंघाच्या, वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत आज जेतेपदासाठी भारताच्या पी. व्ही सिंधूची
लढत जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे. काल सिंधूनं उपांत्य फेरीत थायलंडच्या रत्चानोक
इंटॅनॉनचा २१ - १६, २५ - २३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत मात्र
समीर वर्माचा उपान्त्य फेरीत चीनच्या युकी शी कडून १२ - २१, २२ - २०, २१ - १७ असा पराभव
झाला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या तीन बाद १७२ धावा झाल्या.
कर्णधार विराट कोहली ८२ आणि अजिंक्य रहाणे ५१ धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी काल ऑस्ट्रेलियाचा
पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला. भारत १५४ धावांनी पिछाडीवर आहे.
****
हिंगोली नगर परिषद आणि नगरपंचायत कार्यालयातल्या
कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं. राज्यभरातल्या
जवळपास २४० नगर परिषदा आणि ११० नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी
झाले. २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत काळ्याफिती बांधून काम केलं जाणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी
यावेळी सांगितलं.
****
गंगाखेड नगर पालिकेचे उप नगराध्यक्ष राष्ट्रीय समाज
पक्षाचे राधाकिशन शिंदे यांच्यावर काल २४ पैकी १६ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला.
या ठरावावर २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता चर्चा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा
उपक्रम असलेले फिरते वस्तूसंग्रहालय, कालपासून उस्मानाबाद इथं आलं आहे. १९ डिसेंबरपर्यंत
हे वस्तुसंग्रहालय उस्मानाबाद इथं थांबणार आहे. शहरातल्या कन्या प्रशाला, इथं सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत
हे फिरते वस्तूसंग्रहालय सर्वांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
तुम्ही जर वस्तूसंग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नसाल तर वस्तूसंग्रहालय
तुमच्यापर्यंत पोहोचेल” हे घोषवाक्य घेऊन ही बस संपूर्ण राज्यभरात फिरत आहे.
****
उत्तर रेल्वे मध्ये फरीदाबाद जवळ होत असलेल्या तांत्रिक
कामामुळे, सचखंड एक्सप्रेस आणि नागलडैम एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांच्या दोन फेऱ्या
रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड़ - अमृतसर सचखंड एक्सप्रेस २० आणि २१ डिसेंबरला तर
परतीच्या प्रवासात २२ आणि २३ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. ऊना हिमाचल ते नांदेड़
- नागलडैम एक्सप्रेस २० डिसेंबर आणि परतीच्या प्रवासात २२ डिसेंबरला रद्द करण्यात आली
आहे.
****
गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचं आमिष
दाखवून हजारो जणांना गंडा घालणाऱ्या हिरा
ग्रुप आणि हिरा गोल्ड या कंपनीची संचालिका नौहिरा शेख हिला काल औरंगाबादच्या पोलिसांनी
मुंबई कारागृहातून ताब्यात घेतलं. या कंपनीत एकूण २४०० जणांनी पैसे गुंतवले होते. त्यात
औरंगाबाद शहरातल्या अनेक गुंतवणूकदारांचा समावेश आहे. कंपनीनं शहरातून जवळपास ५० कोटी
रूपयांच्या ठेवी स्वीकारल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेख हिला पाच
दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment