Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 16 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
चीनमधे ग्वांगझू इथं झालेल्या जागतिक
बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधूनं महिला
एकेरीचं विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या अंतिम फेरीत सिंधूनं जपानच्या नोझोमी ओकुहाराचा
२१ - १९, २१ - १७ असा पराभव केला. सिंधूचा २०१६ साली या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव
झाला होता, तर गेल्यावर्षी अंतिम फेरीत पराभव होऊन तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं
लागलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या
दौऱ्यावर असून, त्यांनी रायबरेली इथं रेल्वेचे डबे बनवण्याच्या कारखान्याची पाहणी केली.
यावेळी त्यांनी हमसफर रेल्वेगाडी आणि कारखान्यात तयार झालेल्या नऊशेव्या वाघिणीला हिरवा
झेंडा दाखवून रवाना केलं. रायबरेली
इथं विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर, ते प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक नियंत्रण
कक्षाचं उद्घाटन करतील.
****
पुढच्या दोन ते तीन वर्षात भारत, ट्रिलियन
डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री
रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. भारतीय औद्योगिक आणि वाणिज्य महासंघ - फिक्कीच्या
१९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा राजकारणाशी
काहीही संबंध नाही, आणि म्हणूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत
केलं असल्याचं ते म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्थेवरील सार्वजनिक
कर्जाचं मोठं ओझं येत्या चार ते पाच वर्षात कमी करण्यावर भर देण्याची गरज, आर्थिक
व्यवहार सचिव, सुभाषचंद्र गर्ग यांनी यावेळी व्यक्त केली. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या
तीन टक्के इतक्या योग्य स्तराकडे, वित्तीय तुटीची वाटचाल सुरू असून, चलनवाढीचा
दरही संतुलित आहे, असं ते म्हणाले.
****
रेल्वेमंत्री
पीयूष गोयल यांनी काल वडोदऱ्यात देशातल्या पहिल्या
राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठाचं लोकार्पण केलं. रेल्वे मंत्रालयानं या विद्यापीठासाठी
४२१ कोटी रुपयांची तरतूद केली असून, पुढच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला मंजुरी
दिली आहे.
****
महार रेजिमेंटच्या शौऱ्याची थोर परंपरा नव्या पिढीसमोर
यावी, या हेतूनं राज्य शासनानं महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव आणि शौर्य पुरस्कार प्राप्त
सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण
संस्था - बार्टी, आणि नागपूरचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त
विद्यमानं मुंबईत काल महार रेजिमेंट अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यात
महार रेजिमेंटचं गौरव स्मृती संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
कमी खर्चात
अधिक उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम ग्रामचा उपक्रम राबवण्यात
येत असून, या माध्यमातून अर्थसहाय्यासह बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही
सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. नागपूर इथं काल महा रेशीम
अभियान २०१९’ चा राज्यस्तरीय प्रारंभ देशमुख यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत
होते. रेशीमची मागणी जगात वाढत असताना राज्यातल्या रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं
धोरण तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रेशीम ग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना
एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, कोष ते कापड ही संपूर्ण प्रक्रिया
क्लस्टरच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचं देशमुख म्हणाले.
****
पुण्यात सुरू असलेल्या ६६व्या सवाई
गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची आज सांगता होत आहे. काल या महोत्सवात खासदार शरद पवार
यांच्या हस्ते यू-ट्यूबवरच्या भीमसेन स्टुडिओ या वाहिनीचं उद्घाटन झालं. तसंच कालच्या
सत्रात दत्तात्रय वेलणकर, सावनी शेंडे, श्रीनिवास जोशी, देवकी पंडित यांचं गायन, तर
उस्ताद शाहीद परवेझ यांचं सतारवादन झालं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं कर्णधार विराट कोहलीच्या
शतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात २८३ धावा केल्या. कोहलीनं १२३, अजिंक्य रहाणेनं
५१, ऋषभ पंतनं ३६, चेतेश्वर पुजारानं २४, तर हनुमा विहारीनं २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा
दुसरा डाव सुरू झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या ३३ धावा झाल्या
होत्या. भारत ७६ धावांनी पिछाडीवर आहे.
****
भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा अंतिम
सामना आज बेल्जियम आणि नेदरलँड दरम्यान होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल. बेल्जियमनं इंग्लडला सहा - शून्य, तर नेदरलँडनं ऑस्ट्रेलियाला चार -
तीन अशा गुणफरकानं हरवत अंतिम फेरीत मजल मारली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment