Saturday, 15 December 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.12.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडियामधे अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचं भूमीपूजन केलं. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून केवडियास्थित स्टॅच्यू ऑफ युनिटीला एक वर्षाच्या आत उर्वरित देशाशी जोडण्यात येणार आहे. यामुळे आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना सहजरित्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणं शक्य होणार आहे.

****

भारत आणि फ्रान्सदरम्यान भारत-पॅसिफीक प्रदेशातील सहकार्य, नागरी आण्विक सहकार्य, संरक्षण, अवकाश, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य वाढवून दोन्ही देशांदरम्यान संबंध अधिक बळकट करण्याबाबत सहमती झाली. भारत दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन वेस ले डेरिअन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची आज नवी दिल्लीत भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली. त्यानंतर दहशतवादाचा एकत्रितरित्या सामना करण्याबाबत उभय देशांत सहमती झाली असल्याचं स्वराज यांनी सांगितलं.

****

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चिट दिल्यानंतरही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गांधी यांच्यावर टीका केली. जनता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवेल, असं ते म्हणाले. यवतमाळ इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते.

****

मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या मांजरी इथं आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ऊसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनानं ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

“जीत” प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर आणि संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज “राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम” अंतर्गत जीत’ प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यातल्या १३ शहरांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं.

****

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख १२ हजार ७७२ मुलामुलींचं लसीकरण करण्यात आलं. या मोहिमेमध्ये नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातले एकूण पाच लाख १२ हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. गोवर रुबेला आजाराचं उच्चाटन होण्यासाठी सर्व पालकांनी मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून एक महिना उलटून गेला असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. सरकारमार्फत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत जाहीर करावी अशा मागणीचं निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसिलदारांना देण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी महादेव केंद्रे आणि मिश्रक प्रशांत चोटपगार यांना आज २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. थकित वेतन आणि भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी एका कर्मचाऱ्याकडून त्यांनी ही लाच मागितली होती.

****

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किसान सभेच्या वतीनं आत्महत्याग्रस्त विभागात जागृती अभियान सुरू करण्यात येत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी आज अहमदनगर इथं ही माहिती दिली. वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

चीनमधे ग्वांगझू इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या, वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधूनं उपांत्य फेरीत थायलंडच्या रत्चानोक इंटॅनॉनचा २१ - १६, २५ - २३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत मात्र समीर वर्माचा चीनच्या युकी शी कडून १२ - २१, २२ - २०, २१ - १७ असा पराभव झाला.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या तीन बाद १७२ धावा झाल्या. कर्णधार विराट कोहली ८२ आणि अजिंक्य रहाणे ५१ धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी आज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला. भारत १५४ धावांनी पिछाडीवर आहे.

****

No comments: