Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
झारखंडच्या दुमका जिल्ह्यात माओवाद्यांशी आज सकाळी
झालेल्या चकमकीत सशस्त्र सीमा दलाचा एक जवान शहिद झाला तर अन्य चार जवान जखमी झाले
आहेत. तलदंगलच्या जंगलात एक शोध मोहिम सुरु असताना माओवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार
केला, यावेळी ही चकमक उडाली होती. या गोळीबारात जखमी झालेले किमान पाच माओवादी यावेळी
फरार झाले, अशी माहिती पोलिस अधीक्षक वाय एस रमेश यांनी दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील
राष्ट्रीय पोलिस स्मारकावर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली
अर्पण केली. देशाची सुरक्षा आणि जनतेचं कल्याण नरेंद्र मोदी सरकारची प्रमुख प्राथमिकता
असल्याचं त्यांनी या संदर्भातील एका संदेशात म्हटलं आहे. अमित शाह यांनी काल गृह मंत्रालयाचा
पदभार स्वीकारला आहे.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीत बनावट मतदारांबद्दलचं
वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भातील दावे आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात
आलेल्या मतदारांच्या अंतिम संख्येवर आधारित असून संकेतस्थळावर टाकलेली मतदारांची संख्या
अंतिम नसल्याचं आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान काही राज्यांमध्ये
मतदारांची वास्तविक संख्या आणि मतदान करणाऱ्यांची एकूण संख्या यात विसंगती आढळल्याचे
आरोप आहेत.
ईव्हीएम मतदान आणि टपालानं प्राप्त मतदान या दोन
प्रकारातील मतदान एकत्र केल्यानंतर अंतिम निकाल तयार केला जातो, असं आयोगानं म्हटलं
आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास दोन ते तीन
महिन्यांचा अवधी लागला होता. यंदा
सर्व राज्यांमध्ये सर्व लोकसभा निवडणूक क्षेत्रांतील मतदारांशी संबंधित आकडे एकत्र
करण्यासाठी माहिती, तंत्रज्ञानाच्या
नव्या तंत्राचा उपयोग करण्यात आला असून सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती आयोगाला
लवकरच प्राप्त होण्याची शक्यता असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी राष्ट्रीय
कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी केंद्रानं दिल्ली, शिमला, म्हैसूर, अहमदाबाद
आणि रांची या पाच शहरांची निवड केली आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र
मोदी यांची सलग दुसऱ्यांदा
निवड झाल्यावर सरकारनं हाती घेतलेला हा पहिला मोठा कार्यक्रम आहे. येत्या २१ जूनला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचं स्थळ लवकरच जाहीर होईल, अशी माहिती आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. योग ही आता जन
चळवळ बनली आहे असं ते म्हणाले. यंदा प्रथमच ब्रिटीश संसदेतल्या खासदारांना योगाची प्रात्यक्षिकं
देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
****
अपुऱ्या पावसामुळं राज्यात दुष्काळी
परिस्थिती आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत
आहे अशी ग्वाही माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. औरंगाबाद शहराजवळील
करमाड इथल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीला पाटील यांनी आज भेट
दिली, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या
आहेत तसचं या दुष्काळी परिस्थितीत मागेल त्याला टँकर आणि मागेल त्याला छावणी देण्याला
शासनाचे प्राधान्य आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी यावेळी दिली.
दरम्यान,
महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज औरंगाबाद इथं रामभाऊ
म्हळगी प्रबोधिनी आणि मराठवाडा युवक विकास मंडळ औरंगाबादच्या वतीनं आयोजित 'महाराष्ट्रातील
दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भुमिका' या विषयावरील चर्चा सत्रातही मार्गदर्शन केलं.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढवण्याचं काम सरकारनं केलं आहे. दुष्काळासाठी चार हजार सातशे कोटी रूपये निधी केंद्र
सरकारनं दिला, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं महावितरणाच्या
सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत विभागाच्या पथकानं ४३ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी
रंगेहाथ पकडलं. रोहीत्रामधून वीज पुरवठा सुरु करून देण्यासाठी त्यानं कुडाळ एमआयडीसीतल्या
एका उद्योजकाकडे ही लाच मागितली होती.
*****
***
No comments:
Post a Comment