Monday, 3 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 केंद्र सरकारनं २०२२ पर्यंत देशभऱात दीड लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रं स्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. देशभऱात सुमारे सतरा हजार अशी केंद्रं स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  तेलंगाना, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि दिल्ली या पाच राज्यात `आयुष्यमान  भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य` योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यानं या राज्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

 दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इऱाणी यांनी आज महिला आणि बाल विकास मंत्री पदाचा तसंच रविशंकर प्रसाद यांनी कायदा आणि न्याय मंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. अर्जुन मुंडा यांनी जनजाती व्यवहार मंत्री आणि रेणुका सिंह यांनी जनजाती व्यवहार राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे.
****

 जम्मू काश्मीरमधे शोपियां जिल्ह्यातल्या मोलू चित्रगाम परिसरात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह मिळालं असून ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं. या भागातून जाणाऱ्या सैन्याच्या धडक कृती दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर ही चकमकम सुरू झाली होती.
****

 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाचेन ग्लेशिअरला भेट देऊन पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागातल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे देखील त्यांच्यासोबत असतील. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह जवान आणि अधिका-यांशी संवाद साधतील. लष्कराची सज्जता तसंच 14 कॉर्प्स आणि 15 कॉर्प्स या तुकड्यांच्या कार्यप्रणालीवर आधारित सविस्तर सादरीकरण त्यांच्या समोर केलं जाणार आहे. या तुकड्यांवर चीन आणि पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवर तसंच काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्याची माहिती सैन्यदलानं दिली आहे.
****

 देशात उष्णतेची तीव्रता असताना काल नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड आणि लासलगाव इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस झाला. जळगाव, धुळे आणि सातारा जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस झाला. जळगाव जिल्ह्यतल्या यावल इथं झालेल्या गारपीटीमुळं केळाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. घरांवरील पत्रेही उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पास झाला. येत्या काही दिवसात मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या काल बीड इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या. शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी-बियाणं, तं संच पिक कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचं यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****

 औरंगाबाद शहरातल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाय योजना राबवण्याकरता १०५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाटील हे काल औरंगाबादमध्ये आले होते, त्यावेळी महापौर घोडेले आणि आमदार अतुल सावे यांनी त्याची भेट घेऊन ही मागणी केली.
****

 पुण्यामध्ये तलवारी आणि छऱ्याच्या बंदुका घेऊन मिरवणूक काढल्याच्या आरोपावरून विश्र्व हिंदू परिषदेच्या सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पिंप्री चिंचवड भागातील निगडीमध्ये काल परवानगी नसताना ही मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालूक्यातील जांब पंचायत समिति गणाची पोटनिवडणूक प्रकिया आज पासून सुरु झाली असून उमेदवारी अर्ज सहा जून पर्यंत दाखल करता येणार आहेत. 
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...