Tuesday, 4 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्पाचं काम लवकरचं सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Ø  पुरेसे पाणी तसंच चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या आणि टँकर सुरू ठेवणार- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
Ø  राज्याच्या काही भागात पाऊस; उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा
आणि
Ø  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा यजमान इंग्लंवर १४ धावांनी विजय
****

 मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाची एकात्मिक पाणी पुरवठा योजना - वॉटर ग्रीड प्रकल्पाचं काम लवकरचं सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. परळी इथं भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात काल ते बोलत होते. या प्रकल्पासाठी पाच प्रकल्प अहवाल मंजूर झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवगंत गोपीनाथ मुंडे यांनी बघितलं होतं. मराठवाड्याला कोकणातून पाणी देण्याबाबतही सरकार विचार करत असून मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस दसलक्ष घनफूट पाणी लवकरात लवकर देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रतिम मुंडे यांची यावेळी अभिवादनपर भाषणं झाली. औरंगाबाद शहरातही काल गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं.
*****

 राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी आणि टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली. दुष्काळ निवारणासंदर्भातील उपाय योजना सुचवण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल  मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणं शेळ्या मेंढ्यांसाठीची राज्यातली पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 राज्यात दुष्काळी निधीचं वाटपही सुरू असून आतापर्यंत ६७ लाख ४७ हजार ८३५ शेतकऱ्यांना चार हजार ४१९ कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.  
*****

 नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या दहा दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचं काल राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उदघाटन झालं. अशी शिबीरं विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात आणि जगणं समृद्ध करतात, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. स्वच्छ भारत योजनेत प्रत्येकानं सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****

 बलात्काराचे गुन्हे दाखल असलेल्या दोषींना आजन्म कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या सुधारित कलमाच्या घटनात्मक वैधतेचं मुंबई उच्च न्यायालयानं समर्थन केलं आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन दोषींनी त्यांना २०१४मध्ये सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठानं काल फेटाळली. २०१२ मधल्या निर्भयाप्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या ३१६व्या कलमात सुधारणा करुन बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगारांना आजन्म कारावास किंवा मृत्युदंडच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्वाळा खंडपीठानं काल दिला.
****

 बाराव्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांची घोषणा राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केली.  परभणी जिल्ह्यातल्या झरी इथं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी मेघा देशमुख यांच्यासह राज्यातल्या अकरा जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून तीन जुलै रोजी मुंबईया पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****

 कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए चोपडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळं नवीन कुलगुरूची नियुक्ती  होईपर्यंत डॉ शिंदे यांच्याकडे हा कार्यभार रहाणार आहे.
****

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातल्या  मुस्लिम कर्मचारी बांधवांना उद्या  ईद उल फित्र- रमजान ईद उत्साहात साजरी करता यावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन  आज करावे, असे आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा ७ तारखेला होते. पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या ७१ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय झाला आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्याच्या काही भागात काल पाऊस झाला. या पावसामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या शहागड, पाथरवाला, डोमलगाव, वाळकेश्वर, गंधारी परिसरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरची पत्रे उडाली. तसंच शहागडमध्ये विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा काही काळ खंडीत झाला होता. हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा, गंगाखेड, आणि पालम या ठिकाणी काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ांदेड जिल्ह्याच्या काही भागात तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम तसंच पंरडा तालुक्याच्या काही भागातही चांगला पाऊस झाला.  सोलापूर जिल्ह्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात कारंजा इथंही काल वादळी वाऱ्यासह पास झाला. काही ठिकाणी जुनी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी फळबागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धुळ्यातही शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून बदलेल्या वातावरणामुळे उन्हाचा कडाका कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातही काल अचानक वादळासह मुसळधार पाऊस झाला. वादळात जिल्हा परिषद शाळेच्या ईमारतीसह अनेक घरांचे मोठे नुकसान झालं.
****

 जालना जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांना विमा नाकारण्यात आल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं काल अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री इथं औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक तास `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांना निवेदन देऊन पीक विमा मंजूर करण्याची मागणी यावेळी केली. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 उस्मानाबाद इथं श्री तुळजा भवानी खरीप हंगामपूर्व कृषी प्रदर्शनाचं  उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते काल झालं. उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनात विविध परिसंवाद आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असून १२५  स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या पेनुर लहान इथं गोदावरी नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारी सात वाहनं आणि काही दुचाकी पकडण्यात आल्या. गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांनी ही कारवाई केली. पकडण्यात आलेल्या दोषींना सर्वांना जवळपास  साडे दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
****

 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्ताननं यजमान इंग्लंचा १४ धावांनी पराभव केला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या  संघासमोर विजयासाठी ३४८ धावांच आव्हान ठेवलं. प्रत्युतरात इंग्लंडनही दमदार खेळी केली, मात्र इंग्लंडचा डाव ९ बाद ३३४ धावांवर रोखण्यात पाकिस्तानला यश आलं. दरम्यान, आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या जांब पंचायत समिती गणाची पोटनिवडणूक प्रकिया कालपासून सुरु झाली असून उमेदवारी अर्ज सहा जूनपर्यंत दाखल करता येणार आहेत.  २३  जून रोजी मतदान घेतलं जाणार असून २४  जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. पंचायत समिती गणाबरोबरच मुखेड तालूक्यातील १९ ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुकीची प्रक्रियाही सुरु झाली आहे
****

 जालना जिल्ह्यातली दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं आवश्यक उपाय योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. वाघमारे यांनी काल जिल्ह्यात दुष्काळ निवारण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या नागरिकांना पाणी, आरोग्य सुविधा, रोजगार तसचं जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****

 जालना जिल्ह्यात मंठा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी आत्माराम चव्हाण आणि घरकुल विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहल भोसले यांना वीस हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. या प्रकरणात तक्रारदार हा माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात गावात झालेल्या घरकुल आणि शौचालयाच्या बांधकामाच्या चौकशीत त्यांच्या विरूध्द चौकशी अहवाल तयार करून सदर प्रकरणात अडकविण्याची धमकी देत त्यांनी ही लाच मागितली होती.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...