Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या
कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २००६ पासून सहाव्या वेतन आयोगाची सुधारित श्रेणी लागू करण्याचा
तसंच एक जानेवारी २००६ ते ३१ मार्च २००९ मधल्या वेतनाची थकबाकी देण्याचा निर्णय राज्य
मंत्रीमंडळानं आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. नाशिक मधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वैधानिक आणि शासन मंजूर पदावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करायला मंत्रीमंडळानं मंजूरी दिली. महाराष्ट्र
कृषी विद्यापीठ अधिनियम आणि महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात
सुधारणा करायलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे.
****
राज्यात २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरता वैद्यकीय पदव्युत्तर
अभ्यासक्रम आणि दंतवैद्य अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची प्रक्रिया
करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. तसंच ही प्रक्रिया १४
जूनपर्यंत पूर्ण करावी, अशी सूचनाही केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात गुणवत्ता यादी पुन्हा जाहीर करण्याच्या निर्णयानंतर
काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं
आज हे आदेश दिले.
****
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी
सर्व २८८ जागा लढवेल, अशी माहिती या आघाडीचे नेते विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी दिली
आहे. ते आज अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किमान दहा आमदार
वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचं आणि यावर सात जूनला अधिक माहिती देणार असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि शिर्डी विधानसभामतदारसंघातले
काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला.
****
ईद-उल-फित्र उद्या साजरी केली जाणार असून ईद निमित्त
औरंगाबाद शहरातल्या मुख्य बाजारपेठेत नवे कपडे आणि खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे.
विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. औरंगाबाद मधल्या छावणी ईदगाह मैदान इथं ईदची
मुख्य नमाज उद्या सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी अदा केली जाणार आहे.
****
औरंगाबाद इथं नक्षत्रवाडी भागात आठ हेक्टरमध्ये गृहनिर्माण
आणि क्षेत्रविकास मंडळ -म्हाडाची दीड हजार सदनिकांची योजना लवकरचं सुरु करणार असल्याचं
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं
म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९१७ सदनिकांची सोडत
झाली. त्यावेळी ते बोलत होते. लातुर इथं ९०० घरांची सोडत विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात
येणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांनी यांनी यावेळी सांगितलं.
****
कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा
कार्यभार स्वीकारला. डॉ. शिंदे यांनी मावळते कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडून
औरंगाबाद इथं विद्यापीठात आयोजित समारंभात हा पदभार स्वीकारला. नव्या कुलगुरूंची नियुक्ती
होईपर्यंत कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.
****
परभणी इथं फिरतं लोकन्यायालय आणि माहिती
शिबीराचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधिश उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते
झालं. सर्वसामान्यांना त्वरित न्याय मिळण्यासाठी लोकन्यायालय आणि माहिती शिबीराचा उपयोग
होईल आणि या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणं तडजोडी अंती मिटू शकतील, असा विश्र्वास
न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी यावेळी व्यक्त केला. परभणी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर,
पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार या शिबीराच्या उदघाटनाचे
प्रमुख पाहुणे होते.
****
हिंगोली जिल्हा
परिषद शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान विभागातील कार्यकारी अभियंत्याला पाच
हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज अटक केली. शाळेच्या
बांधकामासंदर्भातील कामासाठी कार्यकारी अभियंता विजय अग्रवाल यांनी पाच हजार रुपयाची
लाच मागितली होती ती स्वीकारत असताना ही अटक करण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं
दिली आहे.
****
No comments:
Post a Comment