Wednesday, 5 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यात मेट्रो आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्याचे प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी
Ø  आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकर यांची घोषणाश
Ø  देशभरात आज ईद-उल-फित्र-सणाचा उत्साह
आणि
Ø  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा दक्षिण अफ्रिकेविरूद्ध सामना

****

 राज्याप्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रीक बसेस आणि लहान इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले. ते काल पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील १५० नगरपरिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली आहे. तसंच प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे हे देशसेवेचं काम आहे आणि यात सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
****

 नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना आर्थिक मदत करण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली अटल अर्थसहाय्य योजना चालू वर्षातही सुरू ठेवण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधीची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीपूरक, सुगीपश्चात प्रकल्प तसंच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज आणि अनुदान दिलं जाणार आहे.
****

 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र्य कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्याबाबतचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी बडोले बोलत होते. ज्येष्ठांचं जीवन सुसह्य व्हावं, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावं, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी या कक्षाची मदत होणार आहे.
****

 राज्याआगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढवेल, अशी माहिती या आघाडीचे नेते विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते काल अकोला इथं वार्ताहरांशी बोलत होते. येत्या सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किमान दहा आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचं आणि यावर सात जूनला अधिक माहिती देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्यात युतीत सहभागी असलेल्या लहान लहान घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली तर उत्तम राहील, असं मत भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. सांगितलं. राज्यात भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती सेना आणि शिवसंग्राम या पक्षांसोबत युती आहे. भाजपच्या चिन्हावर या पक्षांनी निवडणूक लढवली तर त्यांना जिंकण्याची मोठी संधी आहे, असं ते म्हणाले.
****

 काँग्रेसचे जेष्ठ नेते शिर्डी विधानसभा मतदारसंघातले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा काल विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार होते.
****

 मराठवाड्याच्या काही भागात काल मान्सूनपुर्व पावसानं हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अनेक ठिकाणी पास झाला आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या कळमनुरी, औंढा, वसमत तालुक्यात काल रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पास झाला. या पावसामुळं वसमत तालुक्यातल्या ३५ गावात वीज पुरवठा बंद पडला. नांदेड जिल्ह्यात माहूर शहरासह आजुबाजुच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं. परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यात कालेश्र्वर शिवारातही काल रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जोरदार पावसामुळं घरांवरील पत्रे उडून गेले तर पूर्णा झिरोफाटा रस्त्यावर तीन झाडे उन्मळून पडली. बीडमध्येही वळवाच्या पावसानं काल हजेरी लावली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंरत आज देशभरात ईद-उल-फित्र-साजरी केली जात आहे. काल रात्री चंद्र दर्शन झाल्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामानं आज इद साजरी केली जाणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईदचा पवित्र सण परोपकार, बंधुता आणि करूणेवरचा विश्वास वाढवत असून या शाश्वत मूल्यांचा अंगिकार करण्याचा प्रत्येकानं संकल्प करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात केलं आहे.

 औरंगाबाद शहरातल्या छावणी ईदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज आज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी अदा केली जाईल.
****

 औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार जयश्री कुलकर्णी यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या उपस्थितीत काल झालेल्या या निवडणुकीत त्यांनी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्धीकी यांचा ११ विरूद्ध ४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. औरंगाबाद मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे. या निवडणुकीबरोबरच पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी तसंच महिला आणि बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक घेण्यात आली. विषय समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळं सर्वांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
****

 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आज आपला पहिला सामना दक्षिण अफ्रिके विरूद्ध खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

 दरम्यान काल झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं अफगाणिस्तानचा ३४ धावांनी पराभव करत या स्पर्धेतला आपला पहिला विजय मिळवला. पावसाच्या व्यत्यय आल्यामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ४१ षटकांचा झाला.
****

 औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी आमदार संजय शिरसाट यांच्या प्रयत्नातून ३८३ कोटी रूपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. बीड बायपास रस्त्यावर गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी आमदार शिरसाट यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी उपसमिती समोर या बाबतचा प्रस्ताव सादर केल्यावर समितीनं या प्रस्तावाला मंजुरी दिली.  हा रस्ता ६ पदरी करण्याचा तसंच या रस्त्यावर तीन भुयारी मार्ग करण्याची तरतूद या प्रस्तावात आहे.
****

 लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्याहलगरा इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं पशुधनासाठी चारा डेपोचा काल शुभारंभ करण्यात आला.
****

 औरंगाबाद इथं नक्षत्रवाडी भागात आठ हेक्टरमध्ये गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ - म्हाडाची दीड हजार सदनिकांची योजना लवकरचं सुरु करणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या हस्ते काल औरंगाबादमध्ये म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९१७ सदनिकांची सोडत झाली. त्यावेळी ते बोलत होते. लातूर इथं ९०० घरांची सोडत विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात येणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****

 परभणी इथं फिरतं लोकन्यायालय आणि माहिती शिबीराचं उद्घाटन जिल्हा आणि सत्र न्यायाधिश उर्मिला जोशी- फलके यांच्या हस्ते झालं. सर्वसामान्यांना त्वरित न्याय मिळण्यासाठी लोकन्यायालय आणि माहिती शिबीराचा उपयोग होईल आणि या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणं तडजोडी अंती मिटू शकतील, असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार यावेळी उपस्थित होते.     
****

 हिंगोली  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातल्या समग्र शिक्षा अभियान विभागाच्या  कार्यकारी अभियंत्याला पाच हजार रूपयांची तर जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या साडेगावच्या तलाठ्याला १० हजार रूपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. शाळेच्या बांधकामासंदर्भातल्या कामासाठी कार्यकारी अभियंता विजय अग्रवाल यांनी ही पाच हजार रुपयांची ही लाच मागितली होती तर वडीलोपार्जित जमिनीच्या वाटणी पत्रकाआधारे फेर घेण्यासाठी तलाठी अमोल मारूती कोंकटवार यानं १० हजार रूपयांची लाच मागितली होती.
****

 जागतिक लोक पर्यावरण मंचतर्फे औरंगाबाद शहरात आज सायंकाळी पाच वाजता क्रांती चौक ते पैठण गेट परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं आहे. “पर्यावरण वाचवा विनाश थांबवाया माहिमेअंतर्गत मानवी साखळी उभारण्यात येणार आहे.
****

 मराठवाड्यातलं पहिलं महिला महाविद्यालय असलेल्या औरंगाबादच्या डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयानं यावर्षीपासून मुलां-मुलींचे एकत्र सहशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या वसुधा पुरोहित यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश घेतांना सहशिक्षण असा पर्याय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...