Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 09 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø मराठवाड्यातली दुष्काळी स्थिती समूळ नष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची
ग्वाही
Ø काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचवीस आमदार संपर्कात असल्याचा भाजपचे नेते जल संसाधन
मंत्री गिरीश महाजन यांचा दावा
Ø केरळमध्ये मान्सून दाखल; शुक्रवारपर्यंत दक्षिण
कोकणात दाखल होण्याची शक्यता
Ø दहावी परीक्षेच्या
निकालाची टक्केवारी घटली
आणि
Ø विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियासोबत
सामना
****
मराठवाड्यातली दुष्काळी स्थिती समूळ नष्ट करण्याची
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथल्या चारा छावणीला
भेट दिल्यानंतर आयोजित कार्यकमात ते बोलत होते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, गाळ मुक्त धरणं, गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून
मराठवाड्यातला हा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आमच्या समुद्राकडे नद्यातलं पाणी जे वाहून जातं ते पाणी उचलून गादावरीच्या
खोऱ्यामध्ये जर आपण आणलं तर जवळ-जवळ १०० टिएमसी पाणी हे आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामधे
आणू शकतो. आणि हे समूद्रात वाहून जाणार पाणी जर इथ आलं, मराठवाड्याचा दुष्काळ हा भुतकाळ
असेल. आणि मी याठिकाणी सांगितलं. की, या पिढीने दुष्काळ पाहिला, मोदी साहेबांच्या नेतृत्वात
माझा तुम्हाला शब्द आहे. की, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. त्या करीता
जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणे करणार आहे.
पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा
सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासही लवकरच सुरूवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यंदा पाऊस थोडा उशीरा होण्याची
शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी
घाई न करता शासनाच्या माहितीचा, एसएमएस सेवेचा लाभ घ्यावा.
त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवणार नाही, असं ते म्हणाले.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे
किमान पंचवीस आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीश
महाजन यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा
दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना मोठा
धक्का बसणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजप – शिवसेना युतीच्या नेत्यांनी हुरळून
जाऊ नये, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं
आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातले अनेक नेते काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न
करत आहेत. मात्र काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या अमिषाला
भुलणार नाहीत, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीबरोबर, आघाडी करण्यासाठी काँग्रेस
पक्षामधे अनुकूलता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज आमच्या अनेक जिल्ह्याच्या लोकांनी सांगितलं. की, वंचित आघाडीशी आपली आघाडी करण्याबद्दल हरकत नाही
,केली पाहिजे. अश्या स्वरूपाचा सुरू सुद्धा बैठकीत निघालेला आहे. मात्र, हा निर्णय
जो घ्यायचा आहे. तो निर्णय प्रकाश आंबेडकरांना
त्यांना घ्यावा लागेल. आमच्याकडच्या बऱ्याचश्या अध्यक्षांनी यांच्या बाबतीत अनुकूलता
दर्शविली आहे.
****
एक आठवड्याच्या विलंबानंतर नैऋत्य मोसमी पाऊस
काल केरळच्या किनाऱ्यावर दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली. केरळमधल्या अनेक भागांमध्ये काल पावसाला सुरुवात झाली. विलंबानं आला असला तरी देशभरात यावर्षी एकूण पर्जन्यमान चांगलं राहील,
असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
येत्या १४ जून शुक्रवारपर्यंत हा मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातल्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो. मान्सूनपूर्वीचा
वादळी पाऊस हा सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे.
दरम्यान, काल राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व
पाऊस झाला. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या पानगव्हाण इथं एका ४० वर्षीय
शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला. जिल्ह्यातल्या बाळापूर
इथंही वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाला. या वादळ वाऱ्यात
विजेचे चार खांब कोसळल्यामुळे औरंगाबाद शहरातल्या जवाहर कॉलनी,
गारखेडा भागासह ४५ गावांचा वीज पुरवठा काही तासांसाठी खंडित झाला होता.
बीड जिल्ह्यात नागडगाव, माजलगाव आणि महातपुरी इथं
प्रत्येकी एक जणाचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला. नागपूर,
सातारा, कोल्हापूर, सोलापूर
आणि सांगली जिल्ह्यात
काल मान्सूनपूर्व पाऊस पडला. सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही
भागात आज पहाटे ५ वाजेपासून पाऊस सुरु झाला असून, आज पहाटे अकोल्यातही
पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातही काल जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. वडाळा गावात पत्रे
उडून एका वृद्ध महिलेवर पडल्यानं तिचा मृत्यू झाला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षणमंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकाल यावर्षी जवळपास १२ टक्क्यानं कमी लागला. यंदा
या परीक्षेत परीक्षेत ७७ पूर्णांक १० शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, असं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी काल सांगितलं. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८८ पूर्णांक ३८ शतांश टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७ पूर्णांक २७ शतांश टक्के इतका
लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ७५ पूर्णांक २० शतांश टक्के
तर लातूर विभागाचा निकाल
७२ पूर्णांक ८७ शतांश टक्के इतका लागला आहे.
अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पद्धत थांबवण्यात आली. त्यामुळे
हा निकाल कमी लागल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं योग्य मूल्यमापन केलं पाहिजे त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर त्याला दहावीलाच योग्य
दिशा मिळू शकेल, असं त्यांनी वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं.
मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेसाठी फेरपरीक्षा महिनाभरातच घेतली जाते, त्यात उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण घेता येईल, अन्यथा कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्था केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात सामना होणार आहे. काल इंग्लंड आणि बांग्ला देशच्या लढतीत
यजमान इंग्लंडनं बांग्लादेशचा १०६ धावांनी पराभव केला. विजयासाठी
इंग्लंडनं ठेवलेल्या ३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ २८० धावा
करून सर्वबाद झाला. तर काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात
न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा सात गडी राखून
पराभव केला. अफगाणिस्ताननं विजयासाठी दिलेलं १७३ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं अवघ्या ३ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं.
****
राज्य नाट्य महोत्सवाअंतर्गत प्राथमिक फेरीतल्या औरंगाबाद
विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा काल औरंगाबाद इथं पार पडला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक श्रीराम
पांडे, अधीक्षक मिलिंद बिजे यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद , बीड आणि नांदेड ३६ संस्थांनी हौशी मराठी नाट्य
स्पर्धेत तर एकोणसाठ संस्थांनी बालनाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
****
औरंगाबाद शहरातल्या सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातल्या वाघाच्या
बछड्यांचा काल नामकरण सोहळा झाला. एक नर आणि तीन मादींचं नामकरण यावेळी करण्यात आलं. कुश,
अर्पिता, प्रगती, आणि देविका
अशी या बछड्यांची नावं ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान,
खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळे एमआयएमच्या
नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घालत निषेध
नोंदवला.
****
औरंगाबाद इथं काल शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेच्या चौतिसाव्या
वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचं
उद्घाटन झालं.
*****
***
No comments:
Post a Comment