Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 09
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
मालदीव दौऱ्यावरून श्रीलंकेत आलेल्या पंतप्रधान मोदी
यांचं तिथले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी स्वागत केलं. मालदीव आणि श्रीलंकेच्या
एकदिवसीय दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी तिरुपती-तिरुमला
इथल्या बालाजी व्यंकटेश मंदिरात पूजा करण्यासाठी जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे.
****
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत पात्र
शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यासाठी अधिसूचना सरकारनं काढली आहे. या
निर्णयाचा देशभरातील सुमारे चौदा कोटी पन्नास
लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून, यात
शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही. या निर्णयाची अधिसूचना काढून,
केंद्रीय कृषी मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत.
****
येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम झारखंडची राजधानी रांची इथं
प्रभात तारा मैदानावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार
आहेत. झारखंड सरकारही १५ जून पासूनच योग
सप्ताह राबवणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आल्याचं झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितलं.
****
बिहारमध्ये इन्सेफेलाईटिस आजारानं थैमान घातलं आहे. ॲक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम या आजारानं आतापर्यंत तब्बल १९ मुलांचा
मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात १५ मुलांचा मृत्यू झाला. तर इतर खासगी रुग्णालयांमध्ये ४ मुलांचा याच आजारानं मृत्यू झाला आहे. त्याखेरीज
अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
****
राजकीय वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांतून, राजकीय मूल्यांची होत असलेली घसरण हा चिंतेचा विषय असल्याचं
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. या मूल्यांना शिष्ट, सभ्य आणि सुदृढ स्वरुपात बदलण्याचं आवाहनही त्यांनी
केलं, ते हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. संसदेत सातत्यानं होणाऱ्या गोंधळाबद्दलही यावेळी नायडू यांनी चिंता व्यक्त
केली. संसदेसारख्या महत्वाच्या
संवैधानिक व्यासपीठावरचं अशाप्रकारचं वर्तन म्हणजेच राजकीय मूल्यांची घसरण असल्याचं
नायडू यांनी यावेळी सांगितलं.
****
कालपासून राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला
सुरवात झाली आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या.
मराठवाड्यात जालना, बीड, उस्मानाबादसह काही ठिकाणी आज पहाटे थोड्याफार
प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. उस्मानाबादेत आज पहाटे साडे चार वाजल्यापासून जोराच्या
वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. जेमतेम पाऊण तास झालेल्या या पावसानं शहरात अनेक ठिकाणी
पाणी तुंबलं. नागपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अकोला
आणि सांगली जिल्ह्यातही वादळी वारं आणि मेघगर्जनेसह पाऊस झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह
जोरदार पाऊस झाला. या पावसात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी
झाल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावात घरावरील पत्रे पडून
एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर याच कुटुंबातील
तीन जण जखमी झाले आहेत.
****
औरंगाबाद शहरातील इतिहास प्रेमींसाठी आज सकाळी भडकल
गेट, जुनं निजामकालीन फोकानिया हायस्कूल आणि टाऊन हॉल भागात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात
आलं होतं. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यानं सुमारे चारशे वर्षांपूर्वी शहरात उभारलेल्या
या वास्तू आणि इथल्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी आणि
रफत कुरेशी यांनी उपस्थितांना दिली. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी या संस्थेनं या कार्यक्रमाचं
आयोजन केलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment