Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्र आणि
मराठवाड्यातला दुष्काळ कायमचा संपण्यासाठी राज्यशासन सातत्यानं काम करत असून, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली धरण जोड योजना त्याचाच एक भाग असल्याचं शिवसेना
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जालना तालुक्यातल्या साळेगाव इथं आज चारा
छावणीतल्या शेतकऱ्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेत अन्न धान्याचं वापट
करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही
असल्याचंही ते म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री
अर्जुन खोतकर उपस्थित होते. राज्यात पीकविम्यासाठी नियुक्त विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची
फसवणूक झाल्याचं सांगत, विमा भरलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या
सूचनाही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
****
मुस्लिम
धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेसाठी यावर्षी भारतातून २ लाख यात्रेकरूंची नोंद झाल्याचं
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे. हे यात्रेकरू कोणत्याही अनुदानाशिवाय हज
यात्रेला जाणार असल्याची माहितीही
नकवी यांनी आज मुंबईत खाजगी प्रवासी वाहतूकदारांसोबत झालेल्या बैठकीत दिली.
हज यात्रेसाठी यावर्षी देशाच्या विविध शहरांतून सुमारे ५०० विमानं उड्डाण करतील. खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसाठी haj.nic.in/pto हे संकेतस्थळ सुरु
केल्याचंही पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ
तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ आणि १२ जून दरम्यान हे
चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. ते राज्यात धडकण्याची
शक्यता नसली, तरी त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला
दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असं मत हवामान तज्ज्ञांनी
व्यक्त केलं आहे. सुरक्षितेसाठी मासेमारांनी ११ आणि १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणं
टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे
अनेक झाडं उन्मळून रस्त्यावर पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली ही
झाडं हटवून वाहतूक सुरळीत केली. तसंच शहरातल्या काही भागांतला वीजपुरवठा दुपारपासून
खंडित झाल्याचंही वृत्त आहे.
****
पुण्याच्या नागरिकांचं, मुळा आणि मुठा नद्यांना प्रदूषण मुक्त
पाहण्याचं स्वप्न मोदी सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही माहिती आणि प्रसारण, तथा पर्यावरण,
वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. पुणे इथं झालेल्या, नद्यांच्या
प्रदूषण आढावा बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेत जपान
आंतरराष्ट्रीय सहयोग संस्था - जायका सोबत झालेल्या कर्ज करारानुसार नऊशे नव्वद कोटी रुपयांच्या
योजनेपैकी ८५ टक्के भाग केंद्र सरकार, तर उर्वरित १५ टक्के रक्कम पुणे महानगरपालिका देणार असल्याचं ते म्हणाले.
****
महाराष्ट्रातल्या पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्पा’चं अनावरण शिरुरचे खासदार
डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे इथल्या मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर
पारसिक डोंगराच्या पायथ्याला हे चित्रशिल्प साकारण्यात आलं आहे. संत तुकाराम, राजमाता
जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू
महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये
दाखविण्यात आला आहे.
****
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दुपारी भारताचा गतविजेत्या
ऑस्ट्रेलियाशी सामना सुरू झाला. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात
शिखर धवनने शतक ठोकून भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. आयसीसीच्या
स्पर्धेत एकाच मैदानावर तीन शतकं झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. ९५ चेंडूंत
शतक पूर्ण करणारा धवन ११७ धावा करून माघारी परतला.
****
No comments:
Post a Comment