Thursday, 13 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

v मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयकाच्या नव्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
v कोकण किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर वायू चक्रीवादळ आज गुजरातला धडकण्याची शक्यत
v राज्यातले नद्याजोड प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आणि
v दुष्काळ निवारण कार्यात सरकार कमी पडल्याची, राजू शेट्टी यांची टीका
****

 तिहेरी तलाकवर बंदी घालण्याची तरतूद असलेल्या मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयकाच्या नव्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी काल, मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं.

 आधार आणि इतर कायद्यात सुधारणा विधेयकाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

 जम्मू आणि काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवटीला आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

 दरम्यान, काल काश्मीर मध्ये अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात पाच पोलिसांना वीरमरण आलं, तर चार जवान जखमी झाले. यावेळी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं.
****

 अरबी समुद्रातून जाणाऱ्या वायू वादळाचा काल मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीला फटका बसला आहे. अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे मालवण दांडी, वायरी, देवबाग, डिंगेवाडी, मोबारवाडी या भागाला फटका बसला. अनेक भागात नागरी वसाहतीत समुद्राचं पाणी घुसून नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

 दरम्यान, हे चक्रीवादळ आज दुपारपर्यंत गुजरामध्ये वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. या भागातल्या सुमारे तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदल, तटरक्षक दल आणि सीमासुरक्षा दल यांची बचाव पथकं सज्ज असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे .

 या चक्रीवादळाचा संभाव्य धोका पाहता, पश्चिम रेल्वेनं गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या शुक्रवार सकाळपर्यंत अंशत: किंवा पूर्ण रद्द केल्या आहेत.
****

 केंद्र सरकारनं नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जमातींसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे, अनुसूचित जमातीच्या विकासासाठी मंत्रालयाकडून निर्धारित १०० दिवसांच्या उद्दीष्टाचा एक भाग असल्याचं, या खात्याचे मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितलं.
****

 राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या भागात नदी जोड प्रकल्प येत्या पाच वर्षात निर्धारित वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नदीजोड प्रकल्पासंदर्भात मुंबईत झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. आंतरराज्यीय दमणगंगा -पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार- पार- गिरणा, पार-गोदावरी-दमणगंगा-वैतरणा, एकदरे- गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबण्याऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या करंजवण धरणातून मनमाड शहराला पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी काल मान्यता दिली.

 दरम्यान, नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं ६० टक्के पाणी माढ्याकडे वळवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. या कालव्याचं सर्व, अकरा दशलक्ष घनफूट पाणी आता फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे.
****

 कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसंच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी काल ही घोषणा केली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २६ जून रोजी हा पुरस्कार हजारे यांना  समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 दुष्काळ निवारणसाठी आवश्यक उपाय योजना करण्यास सरकार कमी पडल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. फळबागा जगवण्यासाठी एकरी पन्नास हजार रूपये आणि फळबागा नुकसानीपोटी एकरी एक लाख रूपये मदतीची मागणी शेट्टी यांनी केली. मागणी मान्य न केल्यास, येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क अनेक ठिकाणी माफ झालं नाही, बसचा पास मोफत मिळाला नाही, जाचक अटींमुळे अनेक चारा छावण्या बंद पडत आहेत, असे आरोप त्यांनी केले. उंबरठा उत्पादन जास्त दाखवून, शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या दोन आर्थिक वर्षात विमा कंपन्यांचा नफा १९ हजार कोटी रूपये झाला आहे. त्यामुळे हीपंतप्रधान पीक विमा योजना नसून, कॉर्पोरेट कल्याण योजनाअसल्याची टीका त्यांनी केली.
****

 जहाल नक्षलवादी नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नर्मदाक्कावर गडचिरोली जिल्ह्यात ६५ गुन्हे दाखल असून, या दोघांवर अनेक नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. राज्य शासनाने या दोघांवरही प्रत्येकी २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या दोघांना जांभुळखेडा भू- सुरुंग स्फोट प्रकरणी अटक केल्याचं, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं.
****

 पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या संदर्भात पुणे पोलिसांनी काल सामाजिक कार्यकर्ता फादर स्टेन स्वामी यांच्या झारखंडमध्ये रांची इथल्या निवासस्थानांवर छापा घातला. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यात ८१ गावं आणि १५ वाडी-तांड्यावर ९८ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या सुमारे चारशे एक्काहत्तर विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
****

 नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागानं घेतलेल्या दहा दिवसाच्या ‘आव्हान - २०१९या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचा काल समारोप झाला. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघांचा आणि स्वयंसेवकांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट जिल्ह्यासाठी देण्यात येणारा फिरता चषक भंडारा आणि नांदेड या जिल्ह्यांना मिळाला आहे.
****

 लातूर शहर महानगर पालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांसहित सर्वच कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे पगार थकले आहेत. या कर्मचाऱ्यांचे पगार येत्या १५ जून पर्यंत केले नाहीत तर कार्यालयीन वेळेत उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी आयुक्त एम डी सिंह यांना पत्राद्वारे कर्मचाऱ्यांना पगाराअभावी उद्भवलेल्या अडचणी कळवल्या असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे प्रकल्पातून कालवे खोदण्याच्या कामाला कालपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे कालवे भूमिगत अथवा जलवाहिनीद्वारे व्हावेत अशी मागणी, इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली होती. अकोले इथले आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वात यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं, पंत याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

 दरम्यान काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३५१ धावसंख्येचा पाठलाग करताना, पाकिस्तानचा संघ शेहेचाळीसाव्या षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्धेत आज भारत - न्यूझीलंड सामना होणार आहे.
****

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुनर्परीक्षेचे ऑनलाईन अर्ज उद्या १४ तारखेपासून स्वीकारले जाणार आहेत. ही पुनर्परीक्षा १७ ते ३० जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.
****

 धुळे शहराजवळ काल तिहेरी अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर लळींग गावाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एका बालिकेचा समावेश आहे. चालकाचं नियंत्रण सुटलेला ट्रक, दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या दोन वाहनांवर आदळून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...