Friday, 14 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय या क्षेत्रात सातशे औद्योगिक समुह उभारण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या परिषदेत मार्गदर्शन करत होते. त्यांनी उद्योगांना या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रात विकास आणि रोजगार निर्माणाची मोठी क्षमता असल्याचंही गडकरी यांनी यावेळी नमुद केलं.
****
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन अज्ञात नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद प्रभावित कांकेर जिल्ह्यातल्या मालेपारा आणि मुरनार गावांदरम्यान जंगलामध्ये सुरक्षा दल गस्त घालत असताना ही चकमक उडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून तीन बंदुका जप्त करण्यात आल्या असून दहशतवाद्यांची ओळख पटायची असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.   
****
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अवंतीपुरा भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध शोध मोहीम हाती घेतली होती, त्यावेळी उडालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
****
वायू चक्रीवादळ गुजरातला धक्का न पोचवता वायव्येकडे सरकलं असलं तरी जोरदार वारं, धुळीचं वादळ आणि मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. त्यामुळे अतिदक्षतेचा इशारा पुढच्या काही तासांसाठी कायम ठेवला असल्याचं हवामान शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी अहमदाबाद इथं सांगितलं. सौराष्ट्रातल्या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमधे काल रात्री जोरदार पाऊस पडला असून, आजही तो कायम राहण्याची शक्यता आहे.
****
राज्याच्या दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाची इतर कामं नियोजनबध्द पूर्ण करून दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल कराड इथं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर, शेतकरी
मेळाव्यात बोलत होते. कृत्रीम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत, याच तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल पध्दतीचा, कीड नियंत्रणासाठी राज्याच्या सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधीमंडळाचं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुष्काळ निवारण-शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पांबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी विरोधी पक्ष करणार आहे. 
दरम्यान, काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. विधानपरिषद नेतेपदी विजय वडेट्टीवार याची तर उपनेतेपदी मोहम्मद आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे.
****
शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. मेहता यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती ३० जून पर्यंत केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, असं मेहता यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यात अनुदान बंद केल्यामुळं नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कांदा निर्यातीचं अनुदान गेल्या डिसेंबर महिन्यात पाच टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलं होतं. ते बंद झाल्यामुळं नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे दोनशे रूपयांची घसरण झाली.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...