Saturday, 8 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 08.06.2019....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०१९ दुपारी .०० वा.
****
गेल्या मार्च महिन्यात झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आत्ता ऑनलाईन जाहीर केला जात आहे. राज्याचा एकूण निकाल सत्त्याहत्तर पूर्णांक दहा टक्के इतका लागल्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल बारा पूर्णांक एकवीस टक्क्यांनी कमी आहे. राज्यात निकालात या वर्षीही मुलींनी बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे अट्ठ्याऐंशी पूर्णांक तीस टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे सदुसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के,इतका लागला असल्याचं मंडळानं सांगितलं आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल पंचाहत्तर पूर्णांक वीस,तर लातूरचा बहात्तर पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के, इतका लागला आहे. औरंगाबाद विभागात तीन, लातूर विभागात सोळा तर राज्यभरात वीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत.
 mahresult.nic.in सह अधिकृत संकेतस्थळांवर आणि ५७७६६ या क्रमांकावर एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना हा निकाल बघता येणार आहे. गुणपडताळणीसाठी तसंच छायाप्रतीसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी ही माहिती दिली आहे.
****
एक आठवड्याच्या विलंबानंतर नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळच्या किनाऱ्यावर दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं पावसाच्या आगमनाची औपचारिक घोषणा काही वेळापूर्वी केली. केरळमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. विलंबानं आला असला तरी देशभरात एकूण पाऊस सामान्यपणे चांगला राहील, असंही हवामानविभागानं म्हटलं आहे. पावसाच्या आगमनानं उष्णतेच्या लाटेत आणि दुष्काळात होरपळणाऱ्या अनेक राज्यांना दिलासा मिळणार आहे.
****
केरळमध्ये सध्या जाणवणाऱ्या नेपा व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण मदत करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज केरळ मधल्या गुरुवायूर इथं एका सभेत बोलत होते. आपण लोकसेवक असून, लोकसेवेसाठी आयुष्यभर समर्पित असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. या सभेआधी पंतप्रधानांनी गुरुवायूरच्या मंदिराला भेट देऊन पूजा केली.
****
येत्या अर्थसंकल्पासंदर्भात नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी त्या `मायजीओव्ही डॉट इन` या सरकारच्या संकेतस्थळावर येत्या वीस तारखेपर्यंत मांडाव्यात, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रथेमध्ये समाजाच्या सगळ्या स्तरांतल्या नागरिकांनी यात भाग घेतल्यास सर्वसमावेशक अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होईल, असं सरकारनं म्हटल्याचं वृत्त आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या पाच जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या नौगाम शाहबाद भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान चकमक सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असून, अजून दोन ते तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या घेऱ्यात अडकले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
****
केंद्र सरकार योग चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या माध्यम समुहांना विशेष पुरस्कार देणार आहे. वृत्तपत्र संस्था, दूरचित्रवाणी आणि नभोवाणी वाहिन्या यांच्यासाठी प्रत्येकी अकरा पुरस्कार या अंतर्गत दिले जातील, अशी घोषणा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत केली. सहा सदस्यांची एक समिती विविध २३ भाषांमधील प्रवेशिकांतून हे पुरस्कार निश्चित करणार असल्याची माहितीही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली.
****
भारतीय वायुसेनेच्या ए एन बत्तीस, या बेपत्ता विमानाचा अजूनही शोध लागलेला नाही. या विमानासाठीची शोधमोहीम आज सहाव्या दिवशीही सुरू राहणार आहे. सैन्यदल, वायुदलासह पोलिस आणि स्थानिक लोकही अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात विमानाचा शोध घेत आहेत. वायुदलाचं हे विमान आसामच्या जोरहाट विमानटळावरून उड्डाण केल्यानंतर गेल्या सोमवार दुपारपासून बेपत्ता आहे.
****
महाराष्ट्रात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटे एसटी बसला खाजगी प्रवासी बसनं धडक दिली. या अपघातात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...