Saturday, 8 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 08.06.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०१सकाळी ७.१० मि.
****
·      राज्यात पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन.
·      विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा काँग्रेसच्या आढावा बैठकीत सूर.
·      दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर होणार.
·      मराठवाड्याच्या काही भागात वळीवाचा पाऊस.
आणि
·      विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळं रद्द; दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण.
***
राज्यात पावसाला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरानं कराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत खरीपाचं नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी हवामानाचा आढावा पाहून शेतकऱ्यांना ४० कोटी एसएमएस पाठवण्यात आले होते. यंदा गेल्या तीन दिवसांत पाच कोटी एसएमएस पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सोयाबीन लागवडीखाली असून जलयुक्त शिवार, शेततळी, प्रवाही सिंचन अशा योजनांमुळे कमी पावसातही उत्पादकता वाढवण्याचे शासनाचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शेती शाळांचं आयोजन करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले…
मोठ्या प्रमाणात शेती शाळांचं आयोजन करायचं. या शेती शाळांच्या माध्यमातनं संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पेरणी केली पाहिजे, काय वापरलं पाहिजे, कशातनं उत्पादकता वाढू शकेल, या सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण देते, आणि आपण जवळजवळ १२ हजार शेतीशाळांचं या ठिकाणी आयोजन करतो आहोत.
****
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, मात्र त्याची निश्चित अशी वेळ ठरली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना काल सांगितलं. सध्या मंत्रिमंडळात ३७ मंत्री असून आणखी पाच मंत्र्यांना विस्तारात सहभागी करून घेतलं जाईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरू होणार असून त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत.
****
केंद्रातल्या सरकारनं पर्यावरण आणि विकास यात समतोल साधत देशाला प्रगतीपथावर नेल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. २००४ ते २०१४ या काळात पर्यावरणासंबंधी अनेक परवानग्या प्रलंबित राहिल्या, मात्र भाजप सरकार येताच पर्यावरणाचा तोल सांभाळत विकास कामांना गती मिळाली, असं ते म्हणाले. आताही केंद्र सरकार राज्याराज्यांमध्ये असलेल्या पर्यावरणविषयक रखडलेल्या प्रकल्पांबाबत बैठका घेईल आणि प्रश्न सोडवले जातील कामं मार्गी लावली जातील असंही त्यांनी सांगितलं.
मोदी सरकार २०१४ साली आल्यावर आम्ही धोरण घेतलं की पर्यावरणाचं रक्षण करायचं, आणि देशाचा विकासही करायचा. आणि म्हणून हे विकास झाल्यास पर्यावरहण रक्षण होणार नाही व पर्यावरण रक्षण झाल्यास विकास होणार नाही, हे खरं नाही. दोन्ही होऊ शकतं. हे आम्ही आता सिध्द केलं. मला आनंद वाटतो की महाराष्ट्राच्या अनेक प्रकल्प पेंडींग होते त्या सगळ्यांना आम्ही मान्यता दिली.
****
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत नव्हे तर वंचित बहुजन आघाडी सोबत युती करावी असा सूर काँग्रेसच्या आढावा बैठकीत निघत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत, ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला.
****
राज्याचे पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि औषध प्रशासन या विधीमंडळ कामकाज विभागाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या खात्याचे मंत्री गिरीश बापट हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर जळगावचे पालकमंत्री म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
गेल्या मार्च महिन्यात झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. mahresult.nic.in सह अधिकृत संकेतस्थळांवर आणि एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना हा निकाल बघता येणार आहे. गुणपडताळणीसाठी तसंच छायाप्रतीसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी ही माहिती दिली आहे.
****
राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुपारची जेवणाची सुटी केवळ अर्धा तासच घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. दुपारी एक ते दोन या वेळेत ही सुटी घ्यावी असं या आदेशात म्हटलं आहे. जेवणाच्या नावाखाली जनतेची कामं खोळंबत असल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे आल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
****
मराठवाड्यात काही भागात कालही वळीवाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यांत महातपुरी गावात काल वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. यात दुचाकीवरून घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला तर नागडगाव इथं शेतातून घरी जाणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्यामुळं तिचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातही काल वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात अनेकांच्या घरांवरची पत्रे उडाली तसंच विद्युत पुरवठाही खंडीत झाला. जवळपास तासभर चाललेल्या या वादळानं तालुक्यातल्या केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सेलू तालुक्यात देवगाव फाटा आणि परिसरालाही काल सायंकाळी वादळाचा बसला. हिंगोली शहर आणि परिसरात काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाच्या पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर आणि कन्नड तालुक्यातल्या काही भागात वादळी पाऊस बरसला. पावसासह वादळी वारं आल्यामुळं अनेक घरांवरची पत्रे उडाली आणि विद्युत ताराही तुटल्या. औरंगाबाद शहराच्या काही भागातही काल पाऊस पडला. जालना शहरातही आज सकाळी पाऊस झाला.
****
श्री क्षेत्र औंढा नागनाथ  तीर्थक्षेत्र विकासासाठी ६० कोटी ५० लाख रुपयांच्या विकास आराखड्यालाही मुनगंटीवार यांनी  काल तत्त्वतः मंजुरी दिली. या आराखड्यातील विकासकामे उत्कृष्ट दर्जाची असावीत आणि जलद गतीने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. आराखड्याच्या अंमलबाजवणी साठी पहिल्या टप्प्यात २४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी देताना १० कोटी रुपयांचा निधी हा तातडीनं वितरीत करण्याचे आदेश ही मुनगंटीवार यांनी दिले.
****
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बोगस ३४ पाल्यांना सेवेतून बडतर्फ केलं असल्याचा अहवाल काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. गेल्या २५ फेब्रुवारीला औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. चौकशीत ४८ पाल्यांपैकी ३४ पाल्य हे दोषी आढळून आले होते.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. यामुळे उभय देशांना एक एक गुण विभागून देण्यात आला आहे. 
दरम्यान, विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे..
****
जालना शहरात अतिरिक्त शंभर खाटांचं महिला आणि बाल रुग्णालय उभारणीला आरोग्य विभागानं मान्यता दिली असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. जिल्हा प्रशासनाकडून जागा निश्चित झाल्यानंतर या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असून त्यासाठी आवश्यक ४६ पदं भरण्यास शासनानं मान्यता दिल्याचंही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी सांगितलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठाच्या उस्मानाबाद उपपरिसर विकासासाठी आपण कटीबध्द असून येत्या आर्थिक वर्षात तरतूद केलेली सर्व विकास कामं लवकरच सुरु करण्यात येतील, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली आहे. विद्यापीठ उपपरिसर मंडळाच्या सदस्यांसोबत चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी काल उस्मानाबाद इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद उपपरिसरात चालू आर्थिक वर्षासाठी १४ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं सांगून कुलगुरूंनी उपपरिसरातल्या विकास कामांचा आढावा घेतला.
****
औरंगाबाद शहरात जयभवानीनगरमध्ये शहरात पाण्याच्या टँकरखाली सापडून नऊ वर्षांची चिमुरडी चिरडून ठार झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी घटनास्थळाला भेट देऊन टँकरचालकाच्या निलंबनाचे आदेश देत मुलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले.
****
जिंतूर - औरंगाबाद महामार्गावर अकोली गावाजवळ काल सायंकाळी झालेल्या रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचं उपचारादरम्यान निधन झालं. भिमराव ढाले असं मृत व्यक्तीचं नाव असून काल रस्ता ओलांडत असतांना त्यांना मिनी बसनं धडक दिली होती.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथं एका शेतातल्या गोठ्याला आग लागून ३५ शेळ्यांसह शेती साहित्य खाक झाले आहे. या आगीत सुमारे ३ लाख रूपयांचे नुकसान झालं आहे. गोठ्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या शेतात कचरा पेटवनं सुरु होतं. त्यातली ठिणगी उडून शेतातल्या गोठ्याला आग लागल्याचं सांगण्यात आलं.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...