Sunday, 16 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन इथं आज अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळून १६ भाविकांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर वैद्यकीय पथकानं तातडीनं घटनास्थळावर धाव घेत, जखमींना रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीनं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. उद्या मतदानानंतर, मतमोजणी २० जुलैला होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष उद्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत १८ विधेयकं मांडण्यात येणार आहेत. यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग रद्द करण्यासंबधी, तसंच भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक २०१७, भ्रष्टाचार प्रतिबंध विधेयक २०१३ आदी विधेयकांचा समावेश आहे. हे अधिवेशन १८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशभरात लागू झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानत, पंतप्रधानांनी या कायद्याची योग्य अंमलबजावणी ही सर्वांची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. राष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान होत आहे, या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचार प्रक्रियेनं, या पदाच्या प्रतिष्ठेचं यथायोग्य पालन केल्याचं पंतप्रधान म्हणाले. राजकारणातल्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाईचे संकेतही पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्याचं, अनंतकुमार यांनी सांगितलं.

गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांवर राज्यसरकारांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी या बैठकीत दिले आहेत. गायींचं संरक्षण करण्यासठी कायदे आहेत, मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

शेतकऱ्यांना अधिक सवलतीच्या दरानं कर्ज देता यावं यासाठी नवीन योजना विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'मी मुख्यमंत्री बोलतोय', या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सध्या शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंत शून्य टक्के दरानं तर एक लाखापासून तीन लाखांपर्यंत दोन टक्के दरानं शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. शेतमालाला भाव मिळण्याकरता बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी बृहद योजना, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी १५ जिल्ह्यांत चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपन्यांचं क्लस्टर, आदी बाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.

****

शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याकरता, राज्य सरकार एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे. 

****

परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातलं धान्य काळ्या बाजारात नेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महसूल विभागानं जिंतूर तालुक्यातल्या भांबरी शिवारातून हा साठा जप्त केला. यात दोन लाख २४ हजार रुपयांचं धान्य, बारदाना, टेम्पो आदी साहित्य जप्त करण्यात आलं. 

****

राज्यात आजही अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक तसंच सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. औरंगाबाद तसंच उस्मानाबाद इथं मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

नाशिक जिल्ह्यात काल रात्री सुरू झालेला पाऊस आज सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे गोदावरीला नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात सध्या १८ हजार ९९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात ४३० दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा असून, पाण्याचं प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या २० टक्क्यांवर पोहोचलं आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्या वतीनं आज स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जाणाऱ्या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...