Saturday, 3 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.02.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी  २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø  संभाव्य करदात्यांना कराच्या कक्षेत आणणं, हे मोठं आव्हान - केंद्रीय   अर्थमंत्री

Ø  शेती तसंच व्यवसाय पूरक चार योजनांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ

Ø  पथदिव्यांसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे सार्वजनिक बांधकाम    राज्यमंत्र्यांचे निर्देश 

Ø  कांद्याचं किमान निर्यात मूल्य रद्द

 आणि

Ø  एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना सुरू

****



कर संकलनाची व्याप्ती आणि संभाव्य करदात्यांना कराच्या कक्षेत आणणं, हे देशापुढचं मोठं आव्हान असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली इथं अर्थसंकल्पावर आधारित खुल्या परिसंवादात ते बोलत होते.

 अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या तसंच, आवश्यकता असलेल्या क्षेत्रांना पाठबळ देणं हे या अर्थसंकल्पाचं मुख्य उद्दीष्ट असल्याचं सांगतानाच, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि आरोग्य क्षेत्र, हे दोन मुद्दे प्राधान्यानं हाताळल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

 रेल्वेभाडे आकारणीत मागणीनुसार बदल करण्याची पध्दत राबवण्याबाबत रेल्वे मंत्रालय पुनर्विचार करत आहे, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. उपनगरीय रेल्वे तिकीटांची आकर्षक दरपद्धत ठरवताना सवलतीचाही विचार केला जाईल तसंच आवश्यकतेनुसार अत्याधुनिक कार्यप्रणालीद्वारे तिकीट दरात आपोआप बदल केले जातील, अशी माहिती गोयल यांनी दिली. सिग्नल यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल, असंही गोयल यांनी सांगितलं.

****



 अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या चार विविध योजनांना काल मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प योजना आणि शेतकरी कुशल योजना यांचा समावेश आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानांतर्गत, या योजना राबवण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या अडीच लाख युवकांना प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यातील आणखी अडीच लाख युवकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 दरम्यान, मुंबई इथं नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या खासगी विद्यापीठातर्फे आयोजित “शिक्षण ते उद्योजकता” या विषयावरील एक दिवसीय परिसंवादातही मुख्यमंत्री काल सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याकडे लक्ष देण्याचं तसंच मानसिकता बदलून प्रयोगशील राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****



 रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पथदिव्यांसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले आहेत. ते काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका बैठकीत बोलत होते. राज्यात विविध शासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या सोलार पॅनलचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. सर्व  शासकीय कार्यालयामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचं आवाहन, त्यांनी केलं.

****



 सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसरात काल सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापकावर याची तीव्रता तीन पूर्णांक दोन रिश्टर स्केल इतकी असून, भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २२ किलोमीटर दूर वारणा खोऱ्यातल्या जावळे गावाजवळ असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत पुण्याच्या श्रुती श्रीखंडेनं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत देशभरातून २३२ उमेदवार उत्तीर्ण झाले, मुलांमध्ये निपर्ण दत्ता यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे.

****



 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही.शांताराम पुरस्कार यंदा ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, श्याम बेनेगल यांना जाहीर झाला आहे. दहा लाख रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. मुंबईत आज संध्याकाळी या चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात बेनेगल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. देशात माहितीपट चळवळीला प्रोत्साहन देण्यात श्याम बेनेगल यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 सरकारनं कांद्यावरचं किमान निर्यात मूल्य रद्द केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून ही माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे कांद्याच्या दरात होत असलेली घसरण थांबवण्यास मदत होईल, मात्र येत्या काळात कांद्याची दरवाढ नियंत्रित करण्यासाठी पुन्हा किमान निर्यात मूल्य लागू केलं जाऊ शकतं, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान अंतिम सामना सध्या सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा,

दरम्यान, ऑस्ट्रेलिया तसंच भारताच्या संघानं हा विश्वचषक प्रत्येकी तीन वेळा जिंकला असून, यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत पराभूत झालेला नाही. साखळी सामन्यात भारतानं, ऑस्ट्रेलियालाही पराभूत केलं होतं.

****



 भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं स्पेनच्या बेट्रीज कोराल्स चा २१-१२, १९-२१ आणि २१-११ असा पराभव केला. पुरुषांच्या गटात मात्र पी कश्यप तसंच बी साईप्रणीत यांचं या स्पर्धेतलं आव्हान काल संपुष्टात आलं.

****



 ‘खेलो इंडिया' या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत’ कोल्हापूरचा नेमबाज शाहू माने यानं १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकवलं. मुलींच्या १० मीटर एअर रायफल मध्ये पुण्याच्या नंदिता सुळ हिने रौप्यपदकाची कमाई केली. जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या निल रॉयने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली असून तो सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जात आहे.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीच्या संवर्धनासाठी कळमनुरी इथल्या उगम संस्थेनं पुढाकार घेतला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

कयाधूचे पात्र पुन्हा बारमाही प्रवाहित असावे, यासाठी कयाधूचे पात्र माथा ते पायथा पुनरुज्जीवीत करण्याचे काम उगम ग्राम विकास संस्थेने हाती घेतले आहे. संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यासाठी लोकसहभाग, शासकीय उपक्रमाचा सहभाग, प्रशासकीय योजनाचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आहे. कयाधू नदीच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम हा यशस्वी ठरल्यास जिल्ह्याच्या विकासासाठी वरदान ठरेल. बारमाही पाणी उपलब्ध राहिल्याने ही नदी शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरेल. रमेश कदम आकाशवाणी वार्ताहर, हिंगोली.

****



 शेतकऱ्यांना दृष्टी आणि बळ देण्याचं काम मराठवाड्यातल्या संतांनी केलं आहे, असं मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. सहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पळसप इथं देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून, त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. संमेलनाध्यक्ष जगदीश कदम, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

****



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेच्या मराठवाड्यातल्या दुसऱ्या टप्प्याचा आज औरंगाबाद इथं पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. सकाळी अकरा वाजता शहरातल्या क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून विभागीय आयुक्तांना पक्षातर्फे निवेदन दिलं जाणार आहे.

****



 इंधन दरवाढी विरूध्द काल नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाड्या, सायकल रिक्षा, सायकलचालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मोर्चात लोकप्रतिनिधीही सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

 विद्युत रोहित्र बदलण्यासाठी शेतकऱ्याकडून एक लाख रुपये लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन जणांना काल उस्मानाबाद इथं लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक केली. सहायक अभियंता सुधीर बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण, आणि खासगी गुत्तेदार पांडुरंग जाधव अशी या तिघांची नावं आहेत.

*****

***






No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...