Wednesday, 14 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.02.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४   फेब्रुवारी  २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø  भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Ø  परभणी, नांदेड, हिंगोली तसंच बुलडाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट

Ø  ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक पद्मश्री मुजफ्फर हुसैन यांचं निधन

आणि

Ø  भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये विजय

*****

 भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या यमगरवाडी प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते काल बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित होते. भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, सर्वेक्षण करून समाजाची लोकसंख्या नोंदवावी त्याचबरोबर पालावरच्या शाळांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी यासह विविध संस्थेच्या प्रलंबित मागण्या राज्यस्तरावर पोहोचवून त्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यमगरवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून भटके विमुक्त समाजातल्या पारंपारिक कौशल्य वृद्धीसाठी या केंद्राला दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.  भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या पायाभूत सुविधांसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या औद्योगिक सामाजिक दायित्व निधीतून पाच कोटी रुपये देण्याची  घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

 दरम्यान, तुळजापूर तालुक्यातल्या सांगवी इथल्या नियोजित  विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

 परभणी, नांदेड, हिंगोली तसंच बुलडाणा जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी गारपीट झाली. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं गारांचा पाऊस झाला. हिंगोली  जिल्ह्यातल्या कडोळी, कनरेगाव परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गारांसह पाऊस झाला, तर नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील किवळा, बोरगाव माळी परिसरातही गारांचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात जिल्ह्यातल्या जानेफळ, मेहकर, गुंजवरोडीसह चिखली परिसरात गारांसह पाऊस झाल्यानं रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. वाशीम जिल्ह्यातही रात्री गारांचा पाउस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान, पुढच्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

 गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात आपण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. लोणीकर यांनी काल गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात नुकसान झालेल्या गावांमध्ये तातडीनं पंचनामे पूर्ण करून अहवाल द्यावा, अशी सूचनाही लोणीकर यांनी यावेळी केली. गारपीटीतील मृताच्या वारसांना आपत्ती निवारण निधीमधून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असून मृत जनावरांच्या मालकांनाही प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.

 दरम्यान, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काल मंठा तालुक्यातल्या गारपीटीनं नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे तातडीनं पंचनामे करुन शासनाकडे अहवाल पाठवण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

****

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक लाखावर पुस्तकं खरेदी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. ही पुस्तकं शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी दिली जाणार आहेत. या महिना अखेरपर्यंत ही पुस्तकं खरेदी केली जाणार आहेत.

*****

       हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक पद्मश्री मुजफ्फर हुसैन यांचं काल मुंबई इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. व्यासंगी पत्रकार असलेल्या मुजफ्फर हुसैन यांचा सामाजिक चळवळीतही सहभाग होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही हुसैन यांचा जवळचा संबंध होता. दहशतवाद, मुस्लीम राष्ट्रांमधील घडामोडी यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. इस्लाममधील तलाकसारख्या जाचक प्रथा परंपरांवर त्यांनी आपल्या लेखनातून निर्भिडपणे आसूड ओढले. त्यांच्या पार्थीव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

 बीड जिल्ह्याच्या परळी इथल्या दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक मोहनलाल बियानी यांचं मध्यरात्री एक वाजता वृद्धापकाळानं निधन झालं.ते ८८ वर्षांचे होते.परळी इथुन त्यांनी सुरु केलेल्या मराठवाडा साथी या वृत्तपत्राच्या बीडसह  परभणी औरंगाबाद आणि जालना अशा चार ठिकाणी आवृत्त्या निघतात. आज सायंकाळी ४ वाजता परळी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जातील.

****

 भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. पोर्ट एलिझाबेथ इथं झालेल्या पुरुषांच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ७३ धावांनी पराभव करत सहा सामन्यांची मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करत भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान ठेवलं, मात्र दक्षिण आफ्रिका ४२ षटकं २ चेंडूत सर्वबाद २०१ धावाच करु शकला. या मालिकेतील सहावा आणि शेवटचा सामना परवा शुक्रवारी होणार आहे. 

 महिलांच्या पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील काल झालेला पहिला सामना भारतानं सात गडी राखून जिंकला. दक्षिण अफ्रिकेनं निर्धारीत २० षटकांत चार बाद १६४ धावा केल्या. भारतीय महिलांनी हे आव्हान १८ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

****

 महाशिवरात्रीचा उत्सव काल सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला. वेरूळ इथल्या घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ मंदीरातही भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. जालना शहरातल्या पंचमुखी आणि ढवळेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण इथं शिवभक्तांनी गोदावरीत स्नान करून, सिद्धेश्वर तीर्थ तसंच चौदा महादेवांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

 नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यात भीमाशंकर इथंही ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल झाले होते.

****

 महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या नांदेड इथल्या मुक्तेश्वर आश्रमात ७५ जणांनी रक्तदान केलं. त्याचप्रमाणे तीस भाविकांनी यावेळी अवयवदानाचा संकल्प केला. गेल्या ३५ वर्षांपासून या आश्रमात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, अशी माहिती आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी दिली.

****

 औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा यंदाचा स्वातंत्र्यसैनिक वि.वा देसाई स्मृती पुरस्कार औरंगाबादच्या वेद प्रतिष्ठाण संस्थेला  आज प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. त्यांनतर डॉक्टर देखणे यांचं कवी कालिदास आणि परंपरा या विषयावर व्याख्यान होणार असल्याचं संस्थेनं प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

*****

***


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...