Sunday, 17 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०१८ दुपारी १.०० वा.

****

 जम्मू काश्मीरमध्ये रमजान महिन्याच्या काळात लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्र सरकारनं संपुष्टात आणली आहे. गृह मंत्रालयानं ट्विटरवरुन ही माहिती दिली. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

****



 मुद्रा, जनधन, स्टँड अप इंडिया यासारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक सहकार्य उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात सुरु असलेल्या नीति आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. समाजातल्या आर्थिक असंतुलनाकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर सात पूर्णांक सात टक्के असून, हे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलावी लागतील, असं त्यांनी नमूद केलं. विविध कल्याणकारी योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला.

****



 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सर्व विद्यापीठांना दरवर्षी प्रदवी प्रदान सोहळा घेणं बंधनकारक केलं आहे. पदवी प्राप्त करणं, हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी गौरवपूर्ण क्षण असल्यानं, हा कार्यक्रम दरवर्षी घ्यावा, असं मंत्रालयानं सर्व विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. काही विद्यापीठं दरवर्षी हा कार्यक्रम घेत नसल्याचं निदर्शनास आल्यानं, हे निर्देश देत, मंत्रालयानं, प्रत्येक विद्यापीठाला शेवटचा पदवी प्रदान कार्यक्रम कधी घेतला, याची माहिती देण्यास सांगितलं आहे. 

****



 रेल्वे दुरुस्तीच्या कामा करता नियोजित एकात्मिक ब्लॉकचा उपयोग करुन गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्याचे निर्देश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. दैनंदिन दुरुस्तीच्या कामावर परिणाम होऊ न देता रेल्वेगाड्या वेळेत धावायला हव्यात असं ते म्हणाले. उत्तर मध्य, ईशान्य तसंच पूर्व मध्य रेल्वेच्या कामांचा आढावा घेतांना ते नवी दिल्ली इथं बोलत होते. दीर्घकालीन  ब्लॉकच्या कामाचं योग्य नियोजन करण्याचं आवाहन करत, या नियोजित ब्लॉकची प्रवाशांना पूर्वसूचना द्यावी, जेणेकरुन संभाव्य गैरसोय टाळता येईल असंही ते म्हणाले.



 दरम्यान, रेल्वेगाड्यामंध्ये लावलेल्या जैविक शौचालयांच्या जागी प्रगत प्रकारचे व्हॅक्यूम जैव शौचालय लावण्याचा विचार रेल्वे विभाग करत असल्याचं, गोयल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पाचशे व्हॅक्यूम जैव शौचालयांची मागणी करण्यात आली असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व रेल्वेगाड्यांमध्ये व्हॅक्यूम जैव शौचालयायं बसवणार असल्याचं ते म्हणाले.   

****



 देशाच्या विविध भागात सक्रीय माओवादी संघटनांकडून मोठया प्रमाणावर काळा पैसा जप्त करण्यात आला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं काळया पैशासंदर्भात स्थापन केलेल्या   विशेष चौकशी समितीचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायन यांनी सांगितलं आहे. कटक इथं समितीच्या उच्च स्तरीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. माओवादी त्यांच्या यंत्रणेचा विस्तार करत असून, अंमली पदार्थाच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमवत असल्याची माहिती त्यांनी दिली. काळ्या पैशासंदर्भातल्या समितीनं आपला सहावा अहवाल सर्वोच्च न्यायालयात याआधीच सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्हे अन्वेषण, दक्षता आयोग, महसूल गुप्तवार्ता, सक्तवसुली संचलनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि खाण खात्यातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

****



 पुण्यात सुरु असलेल्या सब ज्यूनियर गटाच्या राज्यस्तरीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत काल झालेल्या लढतीत ३६ किलो वजनी गटात साताऱ्याचा रोहीत चौरसिया, पुण्याचा वेदांत बगले, ३८ किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचा उमर शेख, साताऱ्याचा आदित्य जाधव, तर ४० किलो वजनी गटात अकोल्याचा सुमित खरात यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. ६० किलो वजनी गटात पुण्याचा चैतन्य कोलेकर, ६३ किलो वजनी गटात नगरचा तेजस परखे, पुण्याचा अनवर मुजावर, औरंगाबादचा रणवीर भोसले, आणि मुंबईचा अनिस कडू यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला.     

****



राज्यात आजही अनेक भागात पावसानं हजेरी लावली. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सकाळ पासून पावसाची रिमझिम सुरू आहे. काल सायंकाळ पासून शहरात तसंच ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  



पालघर जिल्ह्यात कालपासून अनेक तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून, अनेक भागात रात्री पासून पावसाचं आगमन झालं. आज सकाळ पासून जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा भागांत पावसाला चांगली सुरुवात झाली आहे.



औरंगाबाद शहर परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...