Monday, 18 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०१८ सकाळी ६.५० मि.

****



§  उद्योग क्षेत्राकडून कृषी क्षेत्रात गुंतवणुकीचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्यांनी योग्य धोरण आखावं, पंतप्रधानांची सूचना

§  जम्मू काश्मीरमध्ये रमजान महिन्याच्या काळात लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात

§  विद्यापीठांना दरवर्षी पदवी प्रदान सोहळा बंधनकारक - मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून स्पष्ट 

आणि

§  पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात प्रत्येक नागरिकानं सक्रीय सहभागी व्हावं - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन



****



 उद्योग क्षेत्राकडून कृषी क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीचं प्रमाण देशभरात अत्यंत कमी असून, हे प्रमाण वाढवण्यासाठी राज्यांनी योग्य धोरण आखावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत नीती आयोगाच्या चौथ्या बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्यावर विस्तृत स्तरावर चर्चा करावी, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. पैशाची बचत आणि साधन संपत्तीचा योग्य विनियोग यासह या निर्णयाच्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा व्हावी, असं ते म्हणाले. नीती आयोगानं गेल्या वर्षी केलेल्या शिफारशीत, २०२४ पासून लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका एकत्रित घ्याव्यात, असं सुचवलं आहे.

****



 जम्मू काश्मीरमध्ये रमजान महिन्याच्या काळात लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्र सरकारनं काल संपुष्टात आणली. गृह मंत्रालयानं ट्विटरवरुन ही माहिती दिली. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचही, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात सांगितलं.

****



 नागरिकांवर सरकारी जाहिरातींच्या होणाऱ्या प्रभावावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय स्वतंत्र अभ्यास करणार आहे. योजनांसाठी असलेल्या निधीचा योग्य वापर करणं, हा या मागचा उद्देश असल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

****



 रेल्वे दुरुस्तीच्या कामा करता नियोजित एकात्मिक अवरोधचा उपयोग करुन गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्याचे निर्देश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. रेल्वेच्या कामांचा आढावा घेतांना ते नवी दिल्ली इथं बोलत होते. दीर्घकालीन अवरोधच्या कामांचं योग्य नियोजन करावं, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी या नियोजित अवरोधकांची प्रवाशांना पूर्वसूचना द्यावी, असंही ते म्हणाले.



दरम्यान, रेल्वे गाड्यामंध्ये लावलेल्या जैविक शौचालयांच्या जागी अद्ययावत  व्हॅक्यूम जैव शौचालय लावण्याचा विचार रेल्वे करत असल्याचं, गोयल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अशा पाचशे शौचालयांची मागणी करण्यात आली असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ती बसवणार असल्याचं ते म्हणाले. पाण्याचा वापर कमी करणारी, दूर्गंधीरहित, न तुंबणाऱ्या या शौचालयांमुळे रेल्वे रुळही स्वच्छ राहणार आहेत.

****



 देशाच्या विविध भागात सक्रीय माओवादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जप्त करण्यात आला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं काळ्या पैशासंदर्भात स्थापन विशेष चौकशी समितीचे उपाध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी सांगितलं आहे. ओडीशातल्या कटक इथं या समितीच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. माओवादी त्यांच्या यंत्रणेचा विस्तार करत असून, अंमली पदार्थाच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमवत असल्याची माहिती त्यांनी दिली. या समितीनं काळ्या पैशासंदर्भातल्या आपला सहावा अहवाल सर्वोच्च न्यायालयात याआधीच सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्हे अन्वेषण, दक्षता आयोग, महसूल गुप्तवार्ता, सक्तवसुली संचलनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि खाण खात्यातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

****



 पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार करून परदेशी पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी कडे किमान सहा भारतीय पारपत्र असून, रद्द केलेल्या पारपत्रासह अन्य एका पारपत्राच्या आधारे तो परदेशात प्रवास करत असल्याचं, निदर्शनास आलं आहे. एका पेक्षा अधिक पारपत्र बाळगणं बेकायदा असल्यानं, बोगस पारपत्रप्रकरणी नीरव मोदी विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे

****



केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सर्व विद्यापीठांना दरवर्षी प्रदवी प्रदान सोहळा घेणं बंधनकारक केलं आहे. पदवी प्राप्त करणं, हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी गौरवपूर्ण क्षण असल्यानं, हा कार्यक्रम दरवर्षी घ्यावा, असं मंत्रालयानं सर्व विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. काही विद्यापीठं दरवर्षी हा कार्यक्रम घेत नसल्याचं निदर्शनास आल्यानं, हे निर्देश देत, मंत्रालयानं, प्रत्येक विद्यापीठाला शेवटचा पदवी प्रदान कार्यक्रम कधी घेतला, याची माहिती देण्यास सांगितलं आहे. 

****



 राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण तसंच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. या मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून मानला जाईल, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राज्य सरकारनं जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा लाभ कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या शेतकरी कैद्यांनाही मिळाला आहे. नागपूर आणि नाशिक कारागृहातल्या ८८ कैद्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला होता, त्यापैंकी ५६ कैद्यांना याचा लाभ मिळाला असल्याचं नागपूरचे माजी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पी.टी.आय.शी बोलताना सांगितलं. कर्जमाफी योजनेसाठी पात्र असणारा एकही शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने कारागृहातल्या शेतकरी कैद्यांनाही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 राज्य सरकारच्या पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात प्रत्येकानं स्वत:हून सक्रीय सहभागी होऊन  वृक्ष लागवड संवर्धन चळवळीचा रक्षक बनावं असं राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल वन विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन कार्डाचं वाटप मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत  करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, सुरेश धस, विनायक पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मराठवाड्यात वनक्षेत्र फारच कमी आहे त्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमातून वनक्षेत्रात वाढ करणं अपेक्षित असल्याचं वन मंत्री  म्हणाले.

****



 जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागानं कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. मंठा इथं कृषी विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एक जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबवल्या जाणार असलेल्या वन महोत्सवात, जालना जिल्ह्यास ३६ लाख २२ हजार वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट देण्यात असून, उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करून मोहीम यशस्वी करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. मराठवाडा संपूर्ण टंचाईमुक्त करण्यासाठी पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करावेत, तसंच पाऊस पडण्यासाठी सहाय्यभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्यांचं संगोपन करण्याची गरज लोणीकर यांनी व्यक्त केली.

****



 मातंग समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ काल उस्मानाबाद इथं लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे उस्मानाबाद - तुळजापूर मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

****



 नाशिक जिल्ह्यात घोटी- सिन्नर रस्त्यावर काल संध्याकाळी झालेल्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले. घोटीहून उंबरकोनकडे जाणाऱ्या रिक्षाला एका मोटारीनं धडक दिल्यानं ती उलटली, त्यानंतर समोरुन येणाऱ्या दुसऱ्या मोटारीचीही रिक्षाला धडक बसल्यानं रिक्षेत बसलेले चौघे जण जागीच ठार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 पालघर जिल्ह्यात केळवा किनाऱ्यावर काल चार जण समुद्रात बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून, अन्य तिघांचा शोध संध्याकाळी उशीरापर्यंत सुरु होता.

****



 लातूर जिल्ह्याच्या शिरुर अनंतपाळ तालुक्यात साकोळ इथं काल शेततळ्यात बुडून एका मुलाचा मृत्यु झाला. काल दुपारी ही दुर्घटना घडली.

****



 उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण दगावले. येळी गावानजिक काल संध्याकाळी हा अपघात झाला.

****



हुतात्मा सैनिकांवरून राजकारण केलं जात असल्याबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी खंत व्यक्त केली आहे. ते काल धुळ्यात वार्ताहरांशी बोलत होते. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी हुतात्मा सैनिक योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली नसल्याचं सांगून सरकारवर टीका केली होती, त्या पार्श्वभूमीवर भामरे बोलत होते. भदाणे यांच्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनानुसार ९८ लाख, ८८ हजार रुपयांची मदत मिळवून दिली असून, गोटे यांनी फक्त राजकारण करण्यासाठी खोटे आरोप केल्याचं भामरे यांनी सांगितलं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...