Sunday, 17 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 17 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

उद्योग क्षेत्राकडून कृषी क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीचं प्रमाण देशभरात अत्यंत कमी असून, हे प्रमाण वाढवण्यासाठी राज्यांनी योग्य धोरण आखावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत नीती आयोगाच्या चौथ्या बैठकीत बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्यावर विस्तृत स्तरावर चर्चा करावी, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पैशाची बचत आणि साधन संपत्तीचा योग्य विनियोग यासह या निर्णयाच्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा व्हावी, असं ते म्हणाले. नीती आयोगानं गेल्या वर्षी केलेल्या शिफारशीत, २०२४ पासून लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका एकत्रित घ्याव्यात, असं सुचवलं आहे.

****

नागरिकांवर सरकारी जाहिरातींच्या होणाऱ्या प्रभावावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय स्वतंत्र अभ्यास करणार आहे. योजनांसाठी असलेल्या निधीचा योग्य वापर करणं, हा यामागचा उद्देश असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

****

हुतात्मा सैनिकांवरून राजकारण केलं जात असल्याबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी खंत व्यक्त केली आहे. ते आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी हुतात्मा सैनिक योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली नसल्याचं सांगून सरकारवर टीका केली होती, त्या पार्श्वभूमीवर भामरे बोलत होते. भदाणे यांच्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनानुसार ९८ लाख ८८ हजार रुपयांची मदत मिळवून दिली असून, गोटे यांनी फक्त राजकारण करण्यासाठी खोटे आरोप केल्याचं भामरे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं.

****

फरार हिरे व्यापारी नीरव मोदी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार करून परदेशी पसार झालेल्या नीरव मोदीकडे किमान सहा भारतीय पारपत्र असून, रद्द केलेल्या पारपत्रासह अन्य एका पारपत्राच्या आधारे तो परदेशात प्रवास करत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एकापेक्षा अधिक पारपत्र बाळगणं बेकायदा असल्यानं, बोगस पारपत्र बाळगल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे

****

बिटकॉईन या आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषातून एका व्यक्तीचे साडे बावीस लाख रुपये लुबाडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करू नये, असा सल्ला सरकारकडून पूर्वीपासून दिला जात आहे.

****

लातूर शहरात नाट्यगृह आणि नियोजन भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. लातूर इथं आज पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिन चेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन, मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागानं कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. मंठा इथं कृषी विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. एक जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबवल्या जाणार असलेल्या वनमहोत्सवात, जालना जिल्ह्यास ३६ लाख २२ हजार वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट देण्यात असून, उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करून मोहीम यशस्वी करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. मराठवाडा संपूर्ण टंचाईमुक्त करण्यासाठी पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करावेत, तसंच पाऊस पडण्यासाठी सहाय्यभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्यांचं संगोपन करण्याची गरज लोणीकर यांनी व्यक्त केली.

****

मातंग समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज उस्मानाबाद इथं लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे उस्मानाबाद – तुळजापूर मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

****

नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तसंच पश्चिम बंगाल, पूर्व आसाम भागात घुटमळत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढचे सहा ते सात दिवस मान्सून पुढे सरकण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, मुंबई आणि परिसरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. पालघर, नाशिक, सातारा जिल्ह्यातली आज पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरातही आज दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...