आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जगातली सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढे येत असून, उद्योग, नवनिर्मिती आणि गुंतवणुकीच्या अनेक
संधी भारतात निर्माण झाल्या असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ग्रीसमध्ये
अथेन्स इथं भारतीय वंशाच्या नागरिकांना ते संबोधित करत होते.
भारतीय वंशाच्या लोकांचा भारताशी भावनात्मक संबंध असून, त्यांचं भारताच्या विकासातलं
योगदान कायम राहील, असं त्यांनी नमूद केलं. ग्रीस आणि भारताचे प्राचीन संबंध असून, उभय देश परस्परांच्या
लोकशाही मूल्यांचा सन्मान करतात असं राष्ट्रपती म्हणाले. ग्रीस आणि भारतादरम्यानचे
आर्थिक, सांस्कृतिक, संबंध आणि लोकांमधला संपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं सहकार्य
करण्याचं आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला
केलं.
****
राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण तसंच
अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत जात पडताळणी
प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. या मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न झाल्यास,
संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून मानला जाईल, असं या बाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं सामाजिक कार्यकर्त्या
अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे
यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दमानिया यांच्यावर
कारवाई केली जावी, अशी मागणी माधव पाटील यांनी तक्रारीत केली आहे.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम
भागात तसंच पश्चिम बंगाल, पूर्व आसाममध्ये घुटमळला असून, साधारणत: हा आठवडाभर
तो पुढे सरकण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, मुंबईसह पालघर, नाशिक, सातारा
तसंच रायगड जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली. अहमदनगर इथं काल दुपारी तुरळक पाऊस
झाला. मराठवाड्यात औरंगाबाद तसंच परभणी इथं काल संध्याकाळी पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान, येत्या छत्तीस
तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक
ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
*****
***
No comments:
Post a Comment