Tuesday, 11 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 सरकार पोषण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्याशी संबंधित पैलुंवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाअंतर्गत पंतप्रधानांनी आशा, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य सेवेच्या लाभार्थ्यांशी, आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. देशभरात सध्या लसीकरण मोहीम वेगानं सुरु असून, याचा महिला आणि बालकांना लाभ होत असल्याचं ते म्हणाले. सुरक्षित मातृत्व अभियानासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोषण अभियानामुळे ८५ लाख गर्भवतींना लसीकरण करणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक घरात पोषण आहाराचं महत्त्व पटवून देणारा संदेश पोहोचवण्यासाठी चालू महिन्यात हा उपक्रम राबवला जात आहे. पोषण आहार अभियानाअंतर्गत बालकांचं कुपोषण तसंच महिला आणि किशोरवयीन मुलींमधलं रक्तक्षयाचं प्रमाण कमी करण्याचं उद्दीष्ट सरकारनं निश्चित केलं आहे.

****



 सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख डी. जी. वंजारा यांच्यासह इतर चार ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुटकेचा, सत्र न्यायालयाचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. २००५ - ०६ मध्ये सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबी, आणि साथीदार तुलसीराम प्रजापती या तिघांचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुजरात मधल्या सत्र न्यायालयानं या सर्वांना आरोपमुक्त केलं होतं. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज गुणवत्तेच्या निकषांवर फेटाळून लावली.

****



 आंतरराष्ट्रीय पार्सलच्या आरक्षणासाठी आधार अनिवार्य नसून, ओळख पटवण्यासाठीच्या पर्यायी कागदपत्रांपैकी आधार हा एक पर्याय असल्याचं, टपाल खात्यानं स्पष्ट केलं आहे. देशातल्या सध्याच्या नियमांनुसार सुरक्षेच्या कारणासाठी अशा प्रकारच्या सेवा किंवा व्यवहारांसाठी, ओळख पटवणारं कोणतंही एक स्वीकारार्ह प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे. पार्सल पाठवताना टपाल खात्याकडून आधार क्रमांकाची विचारणा करत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर टपाल खात्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

****



 जम्मू कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथं आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. गुलूरा लांगते भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधकांनी काल पुकारलेला बंद शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी आधी चर्चा न केल्यामुळे निष्फळ ठरला, असा दावा शिवसेनेनं केला आहे. काँग्रेसनं हा बंद पुकारण्याआधी शिवसेनेशी चर्चा केली असती, तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असता, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हा बंद अयशस्वी झाला असल्याचं, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन चर्चा केली, तर इंधन तेलाचे दर कमी होऊ शकतात, असं ते म्हणाले. 

****



 राज्यातल्या स्वयंसेविकांची कामं, त्याबद्दल त्यांना देण्यात येणारी रक्कम, त्यांना दिले जाणारे लाभ अशी त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती, आरोग्य विभागानं ऑनलाईन उपलब्ध करावी, अशी सूचना, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ‘आशा’, आणि गट प्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला त्यांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळावा, यासाठी विभागानं आवश्यक पावलं तत्काळ उचलावीत, असं अर्थमंत्र्यंनी सांगितलं.

****



 यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसंच सासवड इथं झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, लेखक विजय कोलते यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये, सन्मान चिन्ह, आणि सन्मानपत्र, असं पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १९ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं मुकुंदराज सभागृहात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. पुरस्कारचं हे सहावं वर्ष आहे.

****



 भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी ४६४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. काल इंग्लंडनं आपला दुसरा डाव आठ बाद ४२३ धावांवर घोषित केला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारत आज तीन बाद ५८ धावांवर खेळ सुरु करणार आहे. दुपारी साडे तीन वाजता खेळाला सुरुवात होईल. काल कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर, तर शिखर धवन फक्त एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर के. एल. राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला. राहुल ४६, तर रहाणे १० धावांवर खेळत आहे.

*****

***  

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...