Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
आयुष्यमान भारत आरोग्य योजनेपासून वंचितांना महात्मा फुले जन
आरोग्य योजनेच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचार मोफत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
§
मराठवाडा
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम; औरंगाबाद इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
ध्वजारोहण
§ मराठवाड्याचं
मागासलेपण दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाचे दोन
हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रूपयांचे प्रस्ताव राज्य सरकारला सादर
आणि
§
हिंदकेसरी
गणपतराव आंदळकर यांचं निधन
****
आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या लाभापासून
वंचित गरजूंना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचार मोफत
देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल धुळे इथं अटल महाआरोग्य
शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राज्यातल्या गरीब, गरजु रुग्णांपर्यंत अत्याधुनिक
वैद्यकीय उपचार पोहचवण्यासाठी अशा महा-आरोग्य शिबीरांची पंरपरा सुरु केल्याचं सांगत,
आतापर्यंत २५ लाख रुग्णांवर या शिबीरांमधून उपचार करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली. राज्याचे
आरोग्य मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार
रावल, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, खासदार डॉ.हिना गावीत, यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. या शिबिरात तीन हजार डॉक्टर आणि त्यांचे चार हजार सहकारी रुग्णांची
तपासणी करत आहेत. या तपासणीसाठी ९४ बाह्यरुग्ण तपासणी कक्ष कार्यान्वित करण्यात आले
असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज औरंगाबाद
इथं सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होईल.
नांदेड इथं गृह, अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव
पाटील, बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, लातूर
इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर आणि
जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होईल. या निमित्तानं
मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे आज
जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता विश्रामगृहावर मराठवाडा
मुक्ती संग्राम चळवळीत सहभागी स्वातंत्र्य सैनिकांशी ते संवादसाधणार आहेत. त्यांनतर
राज्यपाल गणपती नेत्र रुग्णालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारनंतर
भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा इथल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करतील.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल पी एस एल व्ही
– सी- ४२ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. रात्री दहा वाजून
आठ मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या यानानं उड्डाण केलं. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या दोन उपग्रहांचं प्रक्षेपण,
या यानातून करण्यात आलं. हे दोन्ही उपग्रह ब्रिटनच्या सर्रे सेटेलाइट टेक्नोलॉजी लिमिटेड
या कंपनीचे आहेत. ब्रिटनची कंपनी आणि इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या एंट्रिक्स
कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये असलेल्या व्यावसायिक कराराअंतर्गत हे प्रक्षेपण
करण्यात आलं. या उपग्रहांमार्फत वनक्षेत्राचं आकलन, जमिनीचा वापर आणि हिम क्षेत्र तसंच
आपत्तीची देखरेख केली जाणार आहे.
****
विनाअट संयुक्त महाराष्ट्रात
सामील झालेल्या मराठवाड्याचं मागासलेपण अद्यापही दूर झालेलं नाही.
सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष शिल्लक आहे. अपूर्ण असलेले लहानमोठे ६१ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
१५ हजार कोटी रूपयांची गरज आहे, तसंच मंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यापासून
शासनाकडे तब्बल दोन हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रूपयांचे प्रस्ताव सादर केले असून,
ते मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड
यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
जालना-परभणी आणि उस्मानाबाद
इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं
प्रवेशाच्या जागा देण्याचीही मागणी करण्यात आल्याची माहिती कराड यांनी दिली.
****
संपूर्ण भारतीय बनावटीच्या रणगाडा
विरोधी क्षेपणास्त्राची काल अहमदनगरच्या तळावरुन चाचणी झाली. वजनानं हलक्या असलेल्या
या क्षेपणास्त्राची ही दुसरी चाचणी होती. ही चाचणी यशस्वी ठरल्याचं संरक्षण सूत्रांनी
म्हटलं आहे. परवा आणि काल या क्षेपणास्त्राची
वेगवेगळ्या पल्ल्यांकरता चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी
या कामगिरी करता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या चमूचं तसंच भारतीय सेनंचं आणि
ही यंत्रणा निर्माण करण्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या उत्पादक कंपन्यांचं अभिनंदन
केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे आमदार डॉक्टर मधुसुदन
केंद्रे यांच्या विरुद्ध ५० कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा गंगाखेड शुगर या साखर
कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दाखल केला आहे. कारखान्याच्या नावानी
तसंच इतर कंपन्यांच्या नावानी कोट्यवधी रुपयाचं कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा
आरोप करून आमदार केंद्रे यांनी आपली बदनामी
केली. यामुळे जनमानसातली आपली प्रतिमा मलिन झाल्याचं गुट्टे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या
पत्रकात म्हटलं आहे.
****
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं काल हृदयविकाराच्या
धक्क्यानं पुणे इथं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. १९६० मध्ये पंजाबच्या मल्लाचा
पराभव करुन हिंदकेसरी किताब पटकावणारे ते दुसरे मराठी मल्ल होते. आंदळकर यांनी अनेक
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचं नेतृत्व केलं. अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती
पुरस्कार अशा प्रतिष्ठीत पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या कारकीर्दीत
आंदळकरांनी २०० पेक्षा अधिक कुस्त्या खेळल्या. कुस्ती सोडल्यानंतरही आंदळकरांनी कोल्हापूर
इथं मल्लांना प्रशिक्षण देण्याचं कार्य केलं. गणपतराव आंदळकर यांच्या पार्थिव देहावर
शिराळा तालुक्यातल्या पुनवत या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या लोहारा इथले
स्वातंत्र्य सैनिक भिमराव हैबतपुरे यांचं काल, वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे
होते. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रिय
सहभाग घेतला होता. त्यांच्या पार्थिवावर आज, सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार
आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातली
श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाकडे हस्तांतरित करून, पिण्याच्या पाण्यासाठी
कार्यान्वीत करावी, अशी मागणी श्रीरामकृष्ण
गोदावरी उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीनं केली आहे. या मागणीसाठी काल दहेगाव इथं
रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे औरंगाबाद - नाशिक रस्त्यावर काही काळ वाहतूक
विस्कळीत झाली होती. समितीच्यावतीनं आपल्या मागण्यांचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं
निवेदन वैजापूरच्या तहसीलदारांना सादर केलं. या योजनेचं पाणी पिण्यासाठी वापरल्यास
वैजापूर आणि गंगापूर हे दोन्ही तालुके १०० टक्के टँकरमुक्त होतील असं या निवेदनात म्हटलं
आहे.
****
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व
अभियानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण
भागात आरोग्य सेवांचा संपर्क वाढला आहे. प्रत्येक महिन्याच्या नऊ आणि २२ तारखेला प्राथमिक
आरोग्य केंद्रांवर गरोदर मातांची नोंदणी आणि विविध तपासण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यातल्या
पोहनेर गावाच्या रहिवासी विद्या अडगळे
या अभियानाला धन्यवाद देत आपला अनुभव सांगत आहेत.
नमस्कार, माझं नाव विद्या शिवाजी अडगळे. राहणार पोहनेर,
जिल्हा उस्मानाबाद. मी पहिल्यानंदा आठवड्यानंतर आशा ताईकडे गेले. तेव्हा त्यांनी मला
सांगितले की, मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तिथल्या
डॉक्टरनी आणि सिस्टरनी मला कार्ड दिले. प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला तपासीसाठी
येते तेव्हा ते तपासणी करतात. आणि गोळ्या दिल्या जातात. आहारामध्ये काय घेतलं जातात
ते सांगतात. त्या नंतर ये-जा करण्यासाठी येथे गाडी आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर
इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात आयोजित मराठवाडास्तरीय वादविवाद स्पर्धेत नांदेडच्या
राजीव गांधी महाविद्यालयाचा संघ अजिंक्य ठरला आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणीच्या लोकमान्य
टिळक महाविद्यालयाच्या संघानं द्वितीय तर लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या
संघानं तिसरा क्रमांक पटकावला.
*****
***
No comments:
Post a Comment