Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
बीड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं तीन कोटी रुपये कर्ज थकवल्याप्रकरणी विधान परिषदेतले
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश अंबाजोगाई जिल्हा
सत्र न्यायालयानं दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या, बीड जिल्हा
सहकारी बँक घोटाळ्यावर कारवाईची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून, या अंतर्गत झालेल्या
कारवाईत न्यायालयानं, संत जगमित्र सुतगिरणी कर्ज प्रकरणाची सुनावणी पाच सप्टेंबरला
पूर्ण करून, निकाल राखीव ठेवला होता. या निकालानुसार धनंजय मुंडे यांची देशमुख टाकळी,
कौडगाव, जलालपुर इथली शेतजमीन, परळी इथलं घर, जगमित्रचं कार्यालय तसंच इतर मालमत्तांचा,
पुढील आदेश येईपर्यंत कुठलाही लाभ देण्यास तसंच विक्रीस मनाई करण्यात आली आहे. या निकालाची
प्रत न्यायालयानं पोलिस अधीक्षकांकडे पाठवली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पार्थिव गणेश पूजनाचा
गणेशोत्सव आजपासून सुरु झाला. महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू-कर्नाटक, गुजरात आणि इतर काही राज्यांमधे हा
उत्सव साजरा केला जातो. आज सकाळी घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवण्याकडे यंदाही गणेशभक्तांचा
कल दिसून येत असून, शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ झाली आहे. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या स्थापनेसाठी
मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग आज गणेश चतुर्थी निमित्त बंद राहणार असल्याचं या
महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी कळवलं आहे.
****
सबका साथ सबका विकास हा केवळ नारा नसून प्रत्येक
भारतीयाच्या विकासासाठी हा प्रेरणा मंत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. भाजप कार्यकत्यांना दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना त्यांनी ही
माहिती दिली. अन्य राजकीय पक्ष मतांसाठी राजकारण करत असताना भाजप प्रत्येक देशवासीयाला
समान संधी मिळावी यावर लक्ष केंद्रित करून कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्वाधिक
वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपली अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं.
*****
पंतप्रधान अन्नदाता
उत्पन्न संरक्षण अभियान अर्थात `पीएम आशा` योजनेमुळे शेतकरी सशक्त होतील आणि कृषी क्षेत्राला बळकटी
येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. वर्ष २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं तसंच शेतकऱ्यांच्या
जीवनस्तरामध्ये सकारात्मक बदल करण्याबाबत आपल सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार
पंतप्रधानांनी ट्वीट संदेशातून केला आहे. देशातला प्रत्येक नागरिक कष्टकरी
शेतकऱ्यांचा आभारी असल्याचं, पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे. पीएम आशा योजना
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचं लाभकारी मूल्य निश्चित व्हावं यासाठी असल्याचंही
पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
एका पाकिस्तानी नागरिकाला जम्मू काश्मीरमधील पुंछ
जिल्ह्यात घुसखोरी करताना पकडण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या
माहितीनुसार या पाकिस्तानी नागरिकानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दित
प्रवेश केला होता. पाकिस्तानमधील हाजरा तालुक्यातील तो रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं
असल्याची माहितीही प्रवक्त्यांनी दिली आहे.
****
बँकांची फसवणूक करून भारतातून पळून
गेलेला फरार उद्योजक विजय माल्या याचं भारताला प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या
याचिकेवर ब्रिटनमधलं न्यायालय १० डिसेंबरला निकाल देणार आहे. या प्रकरणी ब्रिटनमधल्या
वेस्टमिनीस्टर दंडाधिकारी न्यायालयात काल अंतिम वाद - प्रतिवाद झाला. यावेळी न्यायालयानं
विजय माल्या याच्यासाठी आर्थर रोड कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोठडीचंही
परीक्षण केलं. याचिकेत नमूद असलेलं प्रकरण महत्त्वाचं असून, कारागृहाची स्थिती हा दुय्यम मुद्दा
असल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी सुनावणी करताना नोंदवलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदे
परिसरात आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन रिश्टर
स्केलच्या या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते. पांगरा
शिंदे सह वापटी, कुपटी, सिरळी, पिंपळदरी, आदी गावांना, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत
आज भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्याचं, या बातमीत
म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment