Sunday, 16 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



§  स्वच्छता ही सेवा अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते आरंभ

§  आगामी निवडणुकीसाठी एमआयएम - भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाची आघाडी

§  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  माजी खासदार आमदारांसह २७ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

आणि

§  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण.

****



 स्वच्छता ही सेवा या देशव्यापी पंधरा दिवसीय अभियानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन केलं, देशभरात स्वच्छता क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्तींशी पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, लडाख इथं तैनात भारत तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान, यांच्यासह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. प्रत्येकानं आपल्या आजूबाजूचा फक्त दहा फूट परिसर जरी स्वच्छ ठेवला, तरी देखील संपूर्ण देश स्वच्छ होईल, असं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं, तर  टाटा विश्वस्त मंडळ गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानात आपलं योगदान देत असून, यापुढेही योगदान देत राहिल, असं रतन टाटा म्हणाले.

 

 संपूर्ण देशभरात या अभिनायांतर्गत काल शालेय विद्यार्थी, विविध सहकारी संघांचे सदस्य, स्थानिक प्रशासनातले अधिकारी-कर्मचारी, स्वयं-सहायता गट, तसंच सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली.



 दरम्यान, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्येही या  अभियानानिमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूर इथं, या अभियानाला काल स्वच्छतेची शपथ घेऊन सुरवात करण्यात आली. जिल्ह्यातले अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपलं गाव, शाळा-अंगणवाडी तसंच एकूण परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन  लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांनी केलं. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान शौचालय निर्मिती, सांडपाणी तसंच घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान तसंच समग्र स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. खासदार डॉक्टर सुनिल गायकवाड यांनीही काल प्रकाशनगरमधल्या सरस्वती महाविद्यालय परीसरात स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला.



 परभणी इथं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते  या अभियानाचा शुभारंभ झाला. प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्रयत्न करून गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

उस्मानाबाद इथं या अभियानिमित्त  परिसर स्वच्छता, शौचालयांसाठी खड्डे खोदणे,  सार्वजनिक स्वच्छता, यांच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करून सहभागी होण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी केलं आहे. दरम्यान, २०१७-१८ या वर्षीचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार काल वितरित करण्यात आले. जिल्हास्तरीय पाच लाख रूपयांचा प्रथम पुरस्कार तुळजापूर तालुक्यातल्या अलियाबाद ग्रामपंचायतीला, तर कुटुंब कल्याण व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ हजार रूपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****



 आगामी निवडणुका ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहादुल मुस्लिमीन - एमआयएम पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून लढवणार आहे. यासंबंधी प्राथमिक निर्णय झाला असल्याची माहिती औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या ७० वर्षात दलित, ओबीसी, वंचित आणि मुस्लिम समाजाचा, फक्त मतं मिळवण्यासाठी वापर केल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या दोन आक्टोबरला औरंगाबाद इथं दोन्ही पक्षांची संयुक्त सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिभाऊ भदे यावेळी उपस्थित होते.

****



 नांदेड  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या वेगवेगळ्या घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या २७ आजी माजी संचालकांविरुध्द गुन्हे दाखल करुन दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी दिले आहेत. २००२ ते २००७ या काळात हे घोटाळे झाले असल्याचा आरोप करत क्रांतिकारी जयहिंद सेनेचे संभाजी पाटील यांनी नांदेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर, हरिहरराव  भोसीकर, माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर,  माजी राज्यमंत्री दिगंबर बापूजी पवार, माजी आमदार सुभाष वानखेडे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार श्रीनिवास गोरठेकर, माजी नगरसेवक गफार खान महेमूद खान, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे अशा २७ माजी संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. १०५ कोटी रूपयांहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे. मराठवाड्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे.

****



 राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता विश्रामगृहावर ते मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीत सहभागी स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांनतर राज्यपाल गणपती नेत्र रुग्णालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारनंतर भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा इथल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करतील.

****



 पाऊस नसल्यामुळे वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार त्र्यंबक भिसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामात सुरुवातीत चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मूग, गहू, उडीद, तुर, सोयाबीन अश्या पिकांचा मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र नंतर पावसानं उघडीप दिल्यानं ही सर्व पिके वाळून गेली आहेत, या पार्श्वभूमीवर या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****



 बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान जनऔषधी सेवेच्या सात केंद्रांमधून २० हजाराच्यावर रुग्णांना औषधींचा पुरवठा केला जात आहे. खामगाव तालुक्यातल्या विविध आजाराच्या आठ ते नऊ हजार रुग्णांना जनऔषधी सेवेद्वारे उत्कृष्ट दर्जाची औषधी कमी दरात उपलब्ध झाली आहेत. या जनऔषधी सेवेचा लाभ घेणारे सुखानंद निकाळजे यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करत आपला अनुभव सांगितला..



माझे नाव सुखानंद निकाळजे.  मी बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव शहरात राहतो. मी  हद्याचा, रक्तदाबाचा, मधूमेहाचा रूग्ण आहे. शिवाय माझ्या घरात माझे वडील, माझी आई देखील रूग्ण आहे. परंतू जेव्हा मी मार्केट मध्ये औषधी घ्यायला जायचो, तेव्हा ती मला परवडणारी नसायची. कारण, ती खूप महागडी होती. परंतू जेव्हा पासून केद्र सरकारने खामगाव शहरामध्ये पंतप्रधान योजनेच्या द्वारे जनऔषधी सेवा सूरू केल्या पासून मी आपली औषधी त्यामधून घेत आहे. येथिल औषधाची गूणवत्ता चांगली आहे. शिवाय, किंमत सुध्दा कमी असल्यामुळे माझा खूप आर्थिक फायदा होत आहे.

****



 दुबई इथं सुरू झालेल्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेत काल बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या  सलामीच्या सामन्यात बांग्लादेशनं श्रीलंकेचा १३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशनं विजयासाठी श्रीलंकेसमोर २६२ धावाचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा संघ ३६ षटकांत केवळ १२४ धावाचं करू शकला.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...