Friday, 14 September 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 14.09.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 14 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

हुंड्यासाठी छळाच्या तक्रारींसंदर्भात समिती नेमण्याबाबतच्या आपल्या यापूर्वीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं आज सुधारणा केली. अशा प्रकरणांमध्ये सुनावलेल्या निकालांवर पुनर्विचार केला जावा, अशी विनंती करणाऱ्या काही याचिकांवरचा निकाल, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राखून ठेवला होता. हुंड्यासाठी छळ प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीनाची तरतूद संरक्षित ठेवल्याचं, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं. दंड संहितेतल्या त्रुटी दूर करण्याचा अधिकार न्यायालयांना नाही, असंही न्यायालयानं सूचित केलं.

****

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नांबी नारायणन यांना १९९४ साली हेरगिरी प्रकरणी विनाकारण अटक करुन त्यांचा मानसिक छळ केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं, नारायणन यांना ५० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी केरळच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तपास करावा, असे आदेशही न्यायालयानं दिले. निवृत्त न्यायाधीश डी के जैन यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचं पीठ, आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालानं आपल्याला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया नारायणन यांनी दिली आहे.

****

गेल्या २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला चांगलं यश मिळालं असून, आता देशाची जवळपास ९२ टक्यांहून अधिक लोकसंख्या स्वच्छता अभियानाच्या कक्षेत येत असल्याचं, स्वच्छता सचिव परमेश्वरन अय्यर यांनी म्हटलं आहे. स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या पूर्व संध्येला आकाशवाणीसोबत एका विशेष वार्तालापात, ते बोलत होते.

पाणी आणि स्वच्छता यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या दोन ऑक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनात ५० हून अधिक देशांचे स्वच्छता मंत्री सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



दूरदर्शन आज आपला एकोणसाठावा वर्धापनदिन साजरा करत आहे.या निमित्त दूरदर्शनच्या मुख्य कार्यालयात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी यावेळी बोलताना, देशाच्या विकासात दूरदर्शन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं नमूद केलं, तर माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी देशभर लोकांना एकमेकांशी जोडण्यात दूरदर्शनचा मोठा वाठा असल्याचं मत व्यक्त केलं.

****

अंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत, नॅब या राष्ट्रीय दृष्टीहीन संघटनेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा, असं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे.

नॅबच्या वतीनं आज मुंबईत आयोजित ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. दृष्टिहीन व्यक्तींना डिजिटल इंडिया अंतर्गत रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी, नॅबनं पुढाकार घ्यावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली. दृष्टिहीन आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण लवकरच संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असं आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिलं.

****

मुंबई आग्रा महामार्गावर कसारा शहापूर जवळ झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. मृतांमध्ये धुळ्याचे काँग्रेसचे नगरसेवक आणि प्रसिद्ध व्यावसायिक कुमार डियालानी यांचा समावेश आहे. आज पहाटे डियालानी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे निघाले असतांना, कारवरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सन २०१९ मधील निवडणुका लक्षात घेऊन पात्र नागरिक, विद्यार्थ्यांनी येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती आणि स्थलांतरणाबाबत विहित नमुन्यात अर्ज करावा, असं आवाहन नांदेडच्या उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयळे यांनी केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या  राष्ट्रीय सेवा योजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या.

****

राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी, धुळे जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, यावेळी केलेल्या भाषणात, पूर्वी ५२७ कोटीला खरेदी केल्या गेलेल्या राफेल विमानाची किंमत थेट एक हजार ६७० कोटीवर नेल्याचं सांगितलं. सरकारनं नोटबंदी देखील फक्त आपल्या मित्र मंडळीचा काळा पैसा पांढरा करण्याच्या उद्देशानं केली, अशी टीकाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

परभणी इथल्या सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय आणि रूग्णालयात आज गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय निलावार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तथा जिल्हा लसीकरण अधिकारी, डॉ. समीर नवल, आदींनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

//************//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...