Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 11 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा
आरक्षणासंदर्भात नेमलेला मागासवर्गीय आयोग आपला अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर
करेल, असं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. आरक्षणासंदर्भात ‘मराठा
क्रांती मोर्चा’नं दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं,
राज्य अनुदानित शैक्षणिक संस्थां आणि कार्यालयांमध्ये मराठा समुदायाला आरक्षण द्यावं
की नाही, यासंदर्भात आयोग आपल्या शिफारशी सादर करेल, असंही सांगितलं. आयोगाचा अंतिम
अहवाल येईपर्यंत आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रगती अहवाल दर चार आठवड्यांनी सादर करावा,
असे निर्देश न्यायालयानं यावेळी दिले.
****
‘महात्मा
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक उपाय योजना राबवण्याचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. ही योजना शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयं किंवा संलग्नित रूग्णालयात
राबवताना विमा निधीतली २० टक्के रक्कम प्रक्रियेतल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन
भत्ता म्हणून, २५ टक्के रक्कम अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडे देण्याचा
आणि ५२ टक्के रक्कम संबंधित संस्थेतल्या शैक्षणिक रूग्णालयीन विकासासाठी देण्याचा निर्णय
यावेळी घेण्यात आला.
राज्यात
जागतिक दर्जाची अभिमत विद्यापीठं स्थापन करण्यासाठी विविध सोयी-सुविधा देण्याचा निर्णयही
यावेळी घेण्यात आला.
यवतमाळ
तसंच सांगली जिल्ह्यांमध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळानं घेतला आहे. हे महाविद्यालय उभारण्यासाठी १०२ कोटी रूपयांच्या निधीला
यावेळी मंजूरी देण्यात आली.
मुंबईत
दहीसर ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा
दोन मार्गावरच्या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
झोपडपट्टी
पुनर्वसन प्राधिकरणानं तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाईल ॲप्लीकेशनचा शुभारंभ आज मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. प्राधिकरणानं डिजिटायझेशनची चांगली सुरुवात केली
असून, झोपडपट्टीवासियांना विविध सोयी सुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीनं
या ॲपचा उपयोग होईल, कामकाजात पारदर्शकता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त
केला.
****
बालकांच्या
निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी पोषक आणि संरक्षित वातावरण असणं आवश्यक असून, प्रत्येक
शिक्षकांनी मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे, असं शालेय शिक्षण
मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या
वतीनं आयोजित केलेल्या ‘रक्षा अभियाना’चा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. शाळांची
गुणवत्ता तपासताना मुलांच्या हक्कासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही
याची तपासणी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. रक्षा अभियानाच्या माध्यमातून बालकांशी
संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय घडवून शाळा, महाविद्यालयांमध्ये संपर्क अभियान राबवणं,
कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती आदी विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
देशातली
संरक्षण सामग्री खासगी उद्योजकांना देण्याची केंद्र सरकारची योजना चुकीची असून, देशासाठी
तसंच परराष्ट्र धोरणासही धोकादायक असल्याची टीका भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय
सचिव भालचंद्र कांगो यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. खासगी
उद्योजकांसाठी संरक्षण व्यवहार खुले करणं, हाच सरकारच्या मेक इंडिया मोहिमेचा हेतु
असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या दोन ते ३० ऑक्टोबर दरम्यान भाकपच्या वतीनं संविधान
बचाव, देश बचाव, भाजपा हटाव असं अभियान राबवलं जाणार असून, आठ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या
प्रश्नावर राज्यात मोर्चे काढण्यात येतील, असंही कांगो यांनी सांगितलं.
****
परभणी
इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळावी या मागणीसाठी खासदार संजय जाधव
यांच्या नेतृत्वात आज विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं. शहरातल्या विविध महाविद्यालयातले
हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या
शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन सादर केलं.
****
परभणी
जिल्ह्यात सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे काही रेल्वे
गाड्या उशीरा धावणार आहेत. १५ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान एक दिवसाआड हा ब्लॉक
घेण्यात येणार आहे. या कालावधीत हैदराबाद ते औरंगाबाद सवारी गाडी ढेंगळी पिंपळगाव रेल्वे
स्थानकावर १५ मिनिटं थांबेल, तर नगरसोल ते नांदेड सवारी गाडी सेलू रेल्वे स्थानकावर
२० मिनिटं थांबेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
धुळे
जिल्ह्यातल्या साक्री पंचायत समिती मधले लेखापाल प्रदीप साबळे आणि लिपिक नंदू खैरनार
यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज अटक करण्यात आली. शिक्षकाचं वैद्यकीय बिल
काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment