Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
भारतीय जनता पक्ष तेलंगणा
विधानसभा स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असं पक्षाध्यक्ष खासदार अमित शहा यांनी म्हटलं
आहे. ते आज हैदराबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपची तेलंगणा राष्ट्र समिती
आणि काँग्रेससोबत थेट लढत असेल, असं शहा यांनी स्पष्ट केलं. सार्वत्रिक निवडणुकांच्या
नऊ महिने आधीच निवडणुका घेऊन टीआरएस सरकारनं मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैशाचा अपव्यय
केला असल्याचा आरोप करत, शहा यांनी, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे राज्यात तुष्टीकरणाचं
राजकारण करत असून फक्त आपल्या कुटुंबाचं हित जपत असल्याची टीकाही केली.
****
देशाच्या निर्यातीमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये सर्वात वेगानं
वाढ झाली असून ऑगस्टमध्ये ही निर्यात २७ पूर्णांक ८४ शतांश अब्ज डॉलरपर्यंत पोहचली
आहे. पेट्रोलियम पदार्थ, अभियांत्रिकी उत्पादनं, औषधी, जडजवाहीर आणि दागदागिन्यांच्या
निर्यातीमुळे ही वाढ शक्य झाली असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या तीन महिन्यांमध्ये
निर्यात ही १९ पूर्णांक २१ शतांश एवढी असून ही तीन महिन्यांमधली सर्वाधिक निर्यात असल्याचं
वाणिज्य मंत्रालयानं नमूद केलं. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे या काळात आयात
देखील २५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांवरून वाढून ४५ पूर्णांक २४ शतांश टक्के एवढी झाली
असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
’स्वच्छता ही सेवा’, या मोहिमेअंतर्गत
भारतीय नाविक दलानं आज आंतरराष्ट्रीय नाविक स्वच्छता दिवस पाळला. जगभरात अनेक देशांमध्ये
सागरी तटावर प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हा स्वच्छता दिवस
पाळला जातो. या वेळी नाविक दलानं सुमारे पाच हजार किलो कचरा गोळा केला करून, योग्य
व्यवस्थापनासाठी हा कचरा बृहन्मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आला.
****
आगामी निवडणुका एमआयएम पक्ष
भारिप बहुजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीसोबत लढवणार आहे. यासंबंधी प्राथमिक निर्णय
झाला असल्याची माहिती औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली. ते आज औरंगाबाद इथं
वार्ताहरांशी बोलत होते. अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार
असदुद्दीन ओवेसी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या ७० वर्षात दलित, ओबीसी, वंचित आणि मुस्लिम समाजाचा, फक्त मतं मिळवण्यासाठी वापर
केल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या दोन आक्टोबरला औरंगाबाद इथं दोन्ही पक्षांची संयुक्त
सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार
हरिभाऊ भदे यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव
तालुक्यात आयोजित पहिला रानगंध पुरस्कार वितरण सोहळा स्थगित करण्यात आला आहे. ज्येष्ठ
कवी ना.धों.महानोर यांचे धाकटे बंधु रामकृष्ण महानोर यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या
धक्क्यानं निधन झालं. त्यामुळे हा समारंभ स्थगित केल्याची माहिती संयोजकांनी एका पत्रकाद्वारे
दिली आहे. कवयित्री अनुराधा पाटील यांना पहिल्या रानगंध पुरस्कारानं उद्या सन्मानित
करण्यात येणार होतं.
****
नाशिक - औरंगाबाद शिवशाही बसचा नाशिक जिल्ह्यात विंचूर जवळ अपघात होऊन एक जण ठार तर २२ हून अधिक प्रवासी जखमी झाले. आज दुपारच्या सुमारास हा
अपघात झाला. हरि ठाकरे असं मयत प्रवाशाचं नाव असून, ते औरंगाबाद शहरातल्या सिडको एन - नाईने
इथले रहिवासी असल्याची
माहिती लासलगाव पोलिसांनी दिली. पाठीमागून येणाऱ्या डिझेल टॅंकरचं टायर फुटून, या टॅंकरनं
बसला जोरदार धडक दिली, यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याजवळील नाल्यात उलटल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींपैकी दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना
निफाड तसंच नाशिक इथल्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
लातूर इथं, स्वच्छता ही सेवा
या विशेष अभियानाला आज सकाळी स्वच्छतेची शपथ घेवून सुरवात करण्यात आली. या अभियानात
जिल्हयातले अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपलं गाव, शाळा-अंगणवाडी
तसंच एकूण परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ
विपीन इटनकर यांनी केलं. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात १६ ते ३०
सप्टेंबर दरम्यान शौचालय निर्मिती, सांडपाणी तसंच घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान तसंच
समग्र स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
परवा साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम
दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे.
मराठवाड्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment