Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 December 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø मराठा आरक्षण
विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; लवकरच महा
भरती अभियान सुरु करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Ø राज्य विधी मंडळाचं
हिवाळी अधिवेशन संपलं. येत्या १८ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
Ø येत्या एक जानेवारीपासून
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा राज्य सरकारचा पुनरूच्चार
आणि
Ø स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर्सच्या दरात कपात
****
विधी मंडळात एकमतानं मंजूर झालेल्या मराठा आरक्षण
विधेयकावर काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली. यामुळे मराठा आरक्षणाचा
कायदा अस्तित्त्वात आला आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून शिक्षण आणि
रोजगारामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद
या कायद्यात आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण कायदा लागू झाल्यामुळे आता
राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच महा भरती अभियान सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा
प्रस्तावाला उत्तर देतांना ते बोलत होते. मराठा समुदायाला आरक्षण मिळेपर्यंत ७२ हजार
पदं भरण्याला ऑगस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती.
****
ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन – एआयएमआयएम
पक्ष मुस्लीम आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं आमदार
इम्तीयाज जलील यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. आपला पक्ष मराठा समाजाच्या
आरक्षणाविरुद्ध नाही पण मुस्लिमांना सुद्धा हा निकष लागू केला पाहिजे, असं ते म्हणाले.
****
राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन काल संपल. पुढचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १८ फेब्रुवारीपासून सुरू होईल. काल अधिवेशनाच्या शेवटच्या
दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची
आवश्यकता नसल्याचं विधानसभेत सांगितलं. या आरक्षणासंदर्भात कारवाई पूर्ण करुन पुढच्या
अधिवेशनात कृती अहवाल मांडला जाईल, तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुस्लिम आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी,
घटनेमध्ये धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं. मुस्लिम धर्मातल्या
ज्या जाती आरक्षणाच्या निकषात बसतात, त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु
करता येईल, असं ते म्हणाले. मात्र यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस करावी लागणार
असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मराठा आंदोलन आणि भिमा कोरेगाव
हिंसाचारातले अनेक गुन्हे मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र मराठा
आंदोलनातले ४६ आणि भिमा कोरेगाव हिंसाचारातले ६३ गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्यामुळे
ते मागे घेतले जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
येत्या एक जानेवारीपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना
सातवा वेतन आयोग लागू होईल असं अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी काल विधान परिषदेत
सांगितलं. सदस्य कपिल पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
वेतनश्रेणी समानीकरणासाठी नियुक्त के. पी. बक्षी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर
शासन त्यावर कार्यवाही करेल, असं त्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय
५८ वर्षांवरुन ६० वर्ष करण्याबाबत नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला
नाही, तर पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं केसरकर
यांनी सांगितलं.
****
वाळू उपशावर राष्ट्रीय हरित लवादानं घातलेली बंदी
आणि बांधकाम क्षेत्राकडून सातत्यानं वाढत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, राज्य
शासन आता वाळूची आयात करण्यावर विचार करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
काल विधानपरिषदेत सांगितलं. औष्णिक वीज केंद्रांमधून निर्माण होणाऱ्या राखेचा उपयोग
घरं, रस्ते, धरणं आणि बांधकाम क्ष्रेत्राच्या इतर वापरासाठी करण्यासाठी याआधीच परवानगी
दिली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
शाळांच्या
पटपडताळणी मोहिमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन
महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत
सांगितलं. राज्यातल्या शाळांमध्ये ‘सरल’ प्रणालीद्वारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती
आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखवण्यास वाव
राहिलेला नाही, असं ते म्हणाले.
****
विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी यांची
बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं औटी यांची बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष हरीभाऊ बागडे
यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
स्वयंपाकाच्या लिक्विफाईड
पेट्रोलियम गॅस सिलिंडर्सच्या दरात कपात करण्यात आली असल्याचं इंडियन ऑईल कार्पोरेशन
कंपनीनं काल जाहीर केलं. अनुदानीत गॅस सिलेंडर्स सहा रुपयांनी तर विना अनुदानीत गॅस
सिलिंडर्स १३३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. काल
मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या
विजेसंबंधीत अडचणी तात्काळ सोडवण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरणच्या
अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. शहरातल्या
लोंबकळलेल्या तारा सरळ करण्याच्या तसंच धोकादायक ट्रान्सफार्मर आणि विद्युत पोल त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना खैरे
यांनी यावेळी दिल्या.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या कळमनुरीचे केंद्र प्रमुख आणि पंचायत समितीचे अतिरिक्त विस्तार अधिकारी
बालाजी गोरे याना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. घरकूल योजनेच्या
यादीत लाभार्थ्याचं नाव समाविष्ट करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथल्या
पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात २५व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा
सीमा सुरक्षा बलाचे पोलीस महानिरीक्षक संजीव भनोट यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला.
या पोलीस क्रीडा स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातल्या ५०३
खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
****
राज्यात सर्वत्र गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला उस्फूर्त
प्रतिसाद मिळत असून, परभणी जिल्ह्यात तीन दिवसांत ४६ हजार २०१ बालकांना लसीकरण करण्यात
आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. लसीकरणानंतर एकाही बालकावर गंभीर दुष्परिणाम
झाला नसून, पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment