Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø केंद्र सरकारच्या
अधिकाऱ्यांचं पथक आजपासून राज्यातल्या दुष्काळ स्थितीची पाहणी करणार
मराठा समाज आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तिला राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय
मराठा समाज आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तिला राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय
Ø आवडणाऱ्या आणि
न आवडणाऱ्या, गोष्टी ठरवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणं आवश्यक - जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा मत
आणि
Ø औरंगाबाद शहरातल्या
सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द
****
राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे
केलेल्या सात हजार कोटी रूपयांच्या मदतीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या
अधिकाऱ्यांचं पथक पाच डिसेंबरपासून ते सात डिसेंबरपर्यंत राज्यातल्या दुष्काळ स्थितीची
पाहणी करणार आहे. पाहणी केल्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्र सरकारला देईल. त्यानंतर
महाराष्ट्राला किती मदत द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. राज्य सरकारनं राज्यातल्या
२६ जिल्ह्यातल्या १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून या भागातल्या जनतेच्या मदतीसाठी
राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
****
मराठा समाज आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या
कुटुंबातल्या एका व्यक्तिला राज्य परिवहन- एस. टी. महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय
घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि
एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी काय करता येईल याबाबत
गट नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं विधिमंडळात सांगितलं होतं. त्या अनुषंगानं
हा निर्णय घेतला असल्याचं रावते यांनी सांगितलं.
****
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी राज्याच्या
विशेष तपास पथकानं भरत कुरणे आणि वासुदेव सुर्यवंशी या दोघांना चौकशी साठी बंगळुरूमधून ताब्यात घेतलं आहे. दोघेही गौरी लंकेश
हत्या प्रकरणातले आरोपी आहेत. या दोघांना कोल्हापूर न्यायालयानं सात दिवसांची पोलिस
कोठडी सुनावली आहे.
****
वारंवार आश्वासननं देऊनही सरकार लोकपाल, लोकायुक्त
नियुक्त करत नाही, त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगण
सिद्धी इथं आंदोलन करणार असल्याचं काल जाहीर केलं आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान
कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र लिहून कळवलं आहे. यापूर्वी सरकारनं
वारंवार आश्वासनं दिली. पण अजून पूर्तता केली नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
राज्याच्या कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांच्या
सोईसाठी महालेखापाल मुंबई यांच्या कार्यालयानं ‘Pull SMS’ सेवा सुरु केली आहे. भविष्य
निर्वाह निधी खात्याची वर्तमान स्थिती आणि निवृत्ती वेतनाच्या मंजुरीची वर्तमान स्थितीची
माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर उपलब्ध होईल. राज्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे
भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयाच्या संकेत स्थळावर नोंदणीकृत करावेत असं कळवण्यात आलं
आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक एड्स रुग्णाला योग्य उपचार
मिळाले पाहिजेत, असं आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. समाजानं एड्सग्रस्त रुग्णांकडे
बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असं सावंत यावेळी म्हणाले. राज्यात २०११ च्या तुलनेत
एड्स रुग्णांच्या संख्येत २०१७ मध्ये ५० टक्के घट झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
राज्याच्या विविध भागात काल जागतिक एड्स जनजागृती दिन साजरा करण्यात आला. औरंगाबाद
शहरात काढण्यात आलेल्या रॅलीला आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. एस. व्ही लाळे यांच्या
हस्ते तर उस्मानाबाद इथं काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
नेताजी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. बीड इथंही प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं
होतं. यावेळी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर फलक झळकावत फेरीत सहभाग
नोंदवला.
जालना इथं आयोजित रॅलीला जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. एड्स जनजागृती पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध
उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन बिनवडे यांनी यावेळी केलं.
तसंच लातूर इथं वैद्यकीय महाविद्यालयात पथनाट्यातून
जनजागृती करण्यात आली. परभणी इथंही या दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विज्ञान जे काही देईल ते घ्यायचं असं न करता, आवडणाऱ्या
आणि न आवडणाऱ्या, गोष्टी ठरवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणं आवश्यक असल्याचं मत
जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी
व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्यावतीनं आयोजित व्याख्यानादरम्यान
काल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. विज्ञानाबद्दल थोडीफार
माहिती असणं आवश्यक असून विज्ञानाचे प्रयोग करतांना घेतलेले निर्णय जाणीवपूर्वक घेतले
पाहिजेत असं त्यांनी यावेळी सांगितलं. ग्रहणांच्या बाबतीत अंधश्रध्दा न बाळगता वैज्ञानिक
दृष्ट्या ते काळजीपूर्वक बघण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गणितात सुधारणा करून
शिकवणं गरजेचं असून पाठांतरचा अतिरेक न करता गणित शिकवलं पाहिजे असं मत मंगला नारळीकर
यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद शहरामधल्या सिद्धार्थ उद्यानातल्या महानगर
पालिकेच्या मालकीच्या प्राणी संग्रहालयाची परवानगी, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं
रद्द केली आहे. प्राधिकरणानं सहा महिन्यापूर्वीच
महापालिकेला याबाबत नोटीस दिली होती. प्राधिकरणानं उपस्थित केलेल्या मुद्द्यावर महापालिकेनं
कोणत्याच उपाय योजना न केल्यानं ही परवानगी रद्द करण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातली जनता दुष्काळी परिस्थितीचा
सामना करत आहे. राज्यसरकार मोठ- मोठ्या घोषणा करण्यापलीकडे निर्णायक कृती करत नसून
सरकारच्या अनास्थेमुळेच जिल्ह्यातले महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ येत्या मंगळवारी चार डिसेंबरला राज्यपालांची
मुंबई इथं भेट घेणार असल्याची माहिती जिल्ह्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी
दिली.
****
औरंगाबादच्या डीकेएमएम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य
डॉ. शांतीलाल देसरडा यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. पुणे
इथं एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. होमियोपॅथीच्या क्षेत्रात त्यांनी
मोलाचं योगदान दिलं. डी के एम एम महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून २६ वर्ष ते कार्यरत होते. होमियोपॅथी अभ्यास मंडळाचे
सदस्य तसं नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केलं
होतं. देसरडा यांची अंत्ययात्रा आज सकाळी दहा वाजता श्रीनिकेतन कॉलनी इथून निघणार आहे.
****
औरंगाबाद इथं लेखक पत्रकार रमेश राऊत स्मृतिनिमित्त
देण्यात येणारा साक्षात साहित्य पुरस्कार ‘आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते’ या पुस्तकाचे लेखक सुदाम राठोड यांना काल प्रदान
करण्यात आला. जेष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
प्राथमिक शाळांत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या विविध
प्रलंबित मागण्या संदर्भात काल राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं राज्यव्यापी आंदोलनं
केलं. औरंगाबाद इथं जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी
धरणे आंदोलन केलं. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी,
भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत समायोजनानं नियुक्त करु नये याप्रमुख मागण्यासह
अन्य मागण्याचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं.
****
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या टेहरे
इथं काल कसमादे शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडन
करत महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याला हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या
शिफारशींची अंमलबजावणी करावी, जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी
हे आंदोलन करण्यात आलं.
****
राज्यात सुरु असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहीमेत
आतापर्यंत ४८ लाख ८७ हजार ५२७ मुलामुलींना म्हणजेच उद्दिष्टाच्या १६ टक्के लसीकरण झालं
आहे. राज्याचं उद्दिष्ट तीन कोटी १० लाख ८१ हजार ९७५ इतकं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment