Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 18
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते आज मुंबई आणि पुण्यात एकूण ४१ हजार कोटी रूपयांच्या पायाभूत आणि
गृह बांधणी प्रकल्पांचा शुभारंभ
Ø तिहेरी तलाक
पद्धतीला दंडनीय अपराध ठरवणारं सुधारित विधेयक लोकसभेत सादर
Ø वडार समाजाच्या
विकासासाठी विजय चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Ø लातूर जिल्ह्यात
मुरुड अकोलानजीक भरधाव मोटारगाडी १५ फूट खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात पाच जण जागीच
ठार
आणि
Ø ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत पराभवाच्या छायेत
*****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या
एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मुंबई आणि पुण्यात ४१ हजार कोटी रूपयांच्या
पायाभूत आणि गृह बांधणी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात
कल्याण इथं ठाणे- भिवंडी –कल्याण आणि दहीसर- मीरा- भाईंदर या दोन मेट्रो प्रकल्पांचं
भूमिपूजन होणार आहे. कल्याण इथं जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत. त्यानंतर
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटाच्या ९० हजार
घर बांधणीच्या १८ हजार कोटी रूपये खर्चाच्या
प्रकल्पाचं उद्घाटनही मोदी यांच्या
हस्ते होणार आहे. पंतप्रधान, पुण्यात मेट्रोच्या
हिंजेवाडी ते शिवाजीनगर या प्रस्तावित तिसऱ्या टप्प्याच्या कामाचं भुमिपूजनही करतील.
तसंच, पुण्यातही एका जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.
****
मुस्लीम धर्मातल्या घटस्फोटासाठीच्या प्रचलित तिहेरी
तलाक पद्धतीला दंडनीय अपराध ठरवणारं सुधारित विधेयक केंद्र सरकारनं काल लोकसभेत सादर
केलं. सप्टेंबर महिन्यात लोकसभेनं यासंदर्भात संमत केलेल्या विधेयकासंदर्भात राज्यसभेत
विरोधकांचा काही मुद्यांवर आक्षेप होता, त्या अनुषंगानं अपेक्षित दुरुस्त्या करून,
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सादर केलं.
नव्यानं केलेल्या सुधारणेनुसार हा अजामीनपात्र गुन्हा
असेल, मात्र पीडित महिलेची बाजू ऐकून घेतल्यावर तिच्या पतीला जामीन देण्यासंदर्भातले
अधिकार न्यायालयाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, तृतीयपंथी अधिकार संरक्षण विधेयक काल लोकसभेत
आवाजी मतदानानं पारित करण्यात आलं. विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा फेटाळून हे विधेयक
पारित करण्यात आलं. त्यानंतर राफेल विमान खरेदी प्रकरणासह विविध मागण्यांसाठी विरोधी
पक्षांनी सभागृहात गदारोळ सुरू ठेवल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी
स्थगित केलं. राज्यसभेतही याच मागण्यांवरून गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार तहकूब करावं
लागलं, परिणामी सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
राफेल विमान खरेदी प्रकरणासंदर्भात विरोधी पक्षांसोबत
लोकसभेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर
यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं राफेल विमान
खरेदी प्रकरणात नियमावलीचं पालन केलं असून, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही,
सरकारनं नियंत्रक आणि महालेखापरिक्षक – कॅगला या संदर्भात सर्व कागदपत्रं सादर केली
असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष देशाच्या सुरक्षेला अडचण निर्माण करत असून,
त्यांना देशप्रेमापेक्षा सत्तेची भूक जास्त असल्याचा आरोप अहिर यांनी यावेळी केला.
मुंबईत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस पक्ष राफेल विमान खरेदी प्रकरणात
जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप वार्ताहरांशी बोलतांना केला.
****
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी
शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ
यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंतचं लाखांहून करण्याची घोषणा केली.
छत्तीसगडमध्ये प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांनीही मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काल
सोळा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं सहा हजार, १०० कोटी रूपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय
घेतला. राजस्थानमध्ये जेष्ठ नेते अशोक गेहलोत
यांनी मुख्यमंत्री आणि सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
****
वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास
महामंडळाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी जाहीर केलं. सोलापूर इथं वडार समाजाच्या मेळाव्यात काल ते बोलत होते.
या समाजाला इदाते समितीच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र
सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, वडार समाजाच्या विकासासाठी मेळाव्याचे संयोजक
विजय चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात येत असल्याचंही फडणवीस
यांनी यावेळी जाहीर केलं. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवावं, या हेतूनं रेशीम कार्यालयाच्यावतीनं
‘महारेशीम अभियान २०१९’ राबवण्यात येत आहे. रेशीम विभागानं गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत
पोहचून त्यांना रेशीम व्यवसाय करण्यास प्रवृत्त करावं, असे निर्देश वस्त्रोद्योग राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यांनी दिले आहेत. जालना इथं काल महारेशीम अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
केल्यानंतर ते बोलत होते.
या अंतर्गत औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालयानं रेशीम
रथाची निर्मिती केली आहे. या रथाला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल हिरवी झेंडी दाखवून
अभियानाचा शुभारंभ केला. हा रेशीम रथ २९ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या तालुक्यात शेतकऱ्यांना
तुती रेशीम शेती उद्योगाबाबत माहिती देणार आहे.
****
मुंबईत अंधेरी भागातल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या
रुग्णालयात काल लागलेल्या आगीत आठ जण ठार तर एकशे एक्केचाळीस जण जखमी झाले. यातील आठ
जण गंभीर आहेत. काल दुपारी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर सायंकाळपर्यंत
अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं. प्राथमिक अहवालानुसार शॉर्ट सर्कीटमुळे ही
आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यात बार्शी- मुरुड राज्य मार्गावर मुरुड
अकोलानजीक भरधाव मोटारगाडी पुलाच्या कठड्याला धडकून १५ फूट खड्ड्यात कोसळल्यानं झालेल्या
अपघातात पाच जण जागीच ठार तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला.
अपघातातले मृत हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या डिकसळ इथले रहिवाशी आहेत.
एका लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी ढोकी-
मुरुडमार्गे ते लातूरला जात होते.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे. काल चौथ्या दिवस अखेर भारतानं
पाच बाद ११२ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी २८७ धावांचं लक्ष्य मिळालं आहे. मात्र
दुसऱ्या डावात भारताची सुरूवात खराब झाली आहे. भारताचे प्रमुख पाच फलंदाज ११२ धावातचं
बाद झाले. जिंकण्यासाठी अजून १७५ धावांची आवश्यकता आहे. सध्या हनुमा विहारी २४ आणि
ॠषभ पंत नऊ धावांवर खेळत आहे.
****
बीड इथं काल आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातर्फे
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्याचं निवेदन शिष्टमंडळातर्फे
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या बांधकाम
कामगारांच्या वतीनं काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रशासनानं गेल्या
अनेक दिवसांपासून गोदावरी नदी पात्रातल्या बंद केलेल्या वाळूच्या धक्क्यांचा लिलाव
करुन ते पुन्हा सुरु करावे, या मागणीचं निवेदन तहसीलदारांना यावेळी देण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment