Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 1 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनामधला जी-ट्वेंटी शिखर परिषदेचा दौरा
आटोपण्यापूर्वी आज अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या. मायदेशी परतण्यापूर्वी ते
अजून जर्मनीचे चॅन्सलर, अर्जेंटिना, फ्रान्स, दक्षिण अफ्रिका आणि स्पेनच्या अध्यक्षांच्याही
भेटी घेणार आहेत. तसंच जमैका आणि नेदरलँडच्या पंतप्रधानाबरोबरच युरोपिअन परिषद आणि
युरोपिअन आयोगाच्या अध्यक्षांचीही भेट घेणार आहेत.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री
भूपिंदरसिंग हूडा, काँग्रेसचे नेते मोतीलाला वोरा आणि असोसिएटेड जर्नल लिमीटेड अर्थात
ए जे एल या संस्थेविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. ए जे एल ला बेकायदेशीररित्या भूखंडाचं
पुनर्वाटप केल्याप्रकरणी पंचकुल्याच्या विशेष सीबीआय न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात
आलं आहे. या प्रकरणी यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांच्या नियंत्रणात
ए जे एल ही संस्था काम करत असल्याचा आरोप आहे.
****
पाकिस्तान आणि बांग्लादेश सीमेवर देशाच्या सुरक्षेची काळजी वाहणाऱ्या सीमा सुरक्षा
दलाचा ४५वा स्थापना दिवस नवी दिल्लीत छावला कॅम्पमध्ये साजरा करण्यात आला. केंद्रीय
गृहराज्य मंत्री किरण रिजीजू हे या सोहळ्याला उपस्थित होते. रिजीजू यांनी यावेळी सीमा
सुरक्षा दलाच्या योगदानाचं कौतूक केलं.
****
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी राज्याच्या विशेष तपास पथकानं पत्रकार
गौरी लंकेश यांच्या हत्येत आरोपी असलेला भरत कुरणे याला बंगळुरुमधून ताब्यात घेतलं
आहे. कर्नाटक अन्वेषण विभागाकडून कुरणे याला ताब्यात घेण्यात आलं. कुरणे आणि दुसरा
आरोपी वासुदेव सुर्यवंशी यांना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता,
न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
राज्य सरकारनं मिठी नदी आणि किनारपट्टी भागाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा,
असं आवाहन केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज राज्य सरकार
आणि मुंबई प्रकल्प यांनी मुंबईत आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलत होते. मिठी नदी आणि
समुद्राच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया व्हायला हवी, हे कठीण वाटलं तरी अशक्य नाही, असं
गडकरी यांनी सांगितलं.
****
सरकार वारंवार दिलेल्या आश्वासनानुसार लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करत नाही,
त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी पासून राळेगणसिद्धी इथं आंदोलन
करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री
जितेंद्र सिंह यांना पत्र लिहून कळवलं आहे. यापूर्वी सरकारनं वारंवार आश्वासनं दिली
पण अजून पूर्तता केली नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात एड्स रुग्णांच्या संख्येचं प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्याकरता प्रत्येक
एड्स रुग्णाला योग्य उपचार मिळाले पाहिजे, असं आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी म्हटलं
आहे. ते आज मुंबईत जागतिक एड्स दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात बोलत होते. समाजानं एड्सग्रस्त रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला
पाहिजे, असं सावंत यावेळी म्हणाले. राज्यात २०११ च्या तुलनेत एड्सच्या रुग्णांच्या
संख्येत २०१७ मध्ये ५० टक्के घट झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी एचआयव्ही एड्सविषयी
माहिती देणाऱ्या ‘समाधान ॲप’ची सुरुवात तसंच माहिती प्रदर्शनाचं उद्घाटन सावंत यांच्या
हस्ते झालं.
उस्मानाबाद इथं आयोजित एड्स जनजागृती रॅलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी
पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला.
बीड इथंही प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शालेय महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर फलक झळकावत फेरीत सहभाग नोंदवला.
जालना इथं आयोजित रॅलीला जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी हिरवा झेंडा दाखवून
सुरुवात केली. एड्स जनजागृती पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं
आवाहन बिनवडे यांनी यावेळी केलं.
तसंच लातूर इथं वैद्यकीय महाविद्यालयात पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.
****
राज्यात सुरु असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहीमेत आतापर्यंत ४८ लाख ८७ हजार ५२७ मुलामुलींना
म्हणजेच उद्दिष्टाच्या १६ टक्के लसीकरण झालं आहे. राज्याचं उद्दिष्ट तीन कोटी १० लाख
८१ हजार ९७५ इतकं आहे. ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख मुलांना गोवर रुबेला प्रतिबंधात्मक
लस देण्यात आली आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या टेहरे इथं आज कसमादे शेतकरी कृती
समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडन करत महामार्गावर रस्तारोको
आंदोलन केलं. कांद्याला हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी
करावी, जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment