Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राफेल
लढाऊ विमान खरेदी व्यवहारात शंका घेण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. या कराराची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी
करणाऱ्या अनेक याचिका, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज
फेटाळून लावल्या. लढाऊ विमानांची देशाला आवश्यकता असल्याचं सांगत, या खरेदी व्यवहारात
कोणत्याही प्रकारची अनियमितता नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं.
****
दरम्यान,
राफेल विमान मुद्यावरुन आजही संसदेचं कामकाज बाधित झालं. राफेल प्रकरणी पंतप्रधानांवर
आरोप केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजपच्या
खासदारांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ
सुरु केल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेतही
या मुद्यावरुन गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
देशात
तंबाखूच्या उत्पादनावर संपूर्ण बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं आज
लोकसभेत सांगितलं. अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं. सिगारेट आणि
अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंधक कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान
करण्यास, तसंच १८ वर्षांखालच्या मुलाला आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही तंबाखूजन्य
पदार्थ विकण्यास बंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेसनं
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गहलोत यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची
निवड केली आहे. काँग्रेसचे महासचिव के के वेणुगोपाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना
ही माहिती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक नेत्यांसोबत चर्चा करुन हा
निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यावर
भर देणार असल्याचं गहलोत यावेळी म्हणाले.
****
राज्याचे
माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या निधनानं एक द्रष्टा आणि कुशल प्रशासक आपण गमावला
आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बोंगिरवार यांचं आज पहाटे निधन झालं, ते शहात्तर वर्षांचे होते.
****
सोलापूर
जिल्ह्याच्या उजनी धरणातल्या पाण्यात आरोग्यास हानीकारक असलेले काही रासायनिक घटक सापडले
आहेत. सोलापूर विद्यापीठानं या पाण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. पुणे, भिगवण, इंदापूर
इथल्या औद्योगिक वसाहतीतलं दूषित पाणी, तसंच आजूबाजूच्या शेतीला दिलेली खतं, कीटकनाशकं
मिश्रित पाणी धरणात येऊन हे पाणी दूषित होत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. उजनी धरणातून
सोलापूरसह, उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना पाणीपुरवठा
केला जातो, त्यामुळे पाणी दूषित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत
आहे.
****
सातारा
जिल्ह्यातल्या किल्ले प्रतपागडावर आज शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून
शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भवानी मातेची पूजा,
पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम यावेळी पार पडले.
****
बीड
जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला आज सकाळी
वर्णी महापूजेनं प्रारंभ झाला. २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी योगेश्वरी
देवल समितीच्या वतीनं भाविकांसाठी निवास, स्वच्छता, पेयजल आदींसह आवश्यक सुविधा उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत. महोत्सवाच्या कालावधीत दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजनही
करण्यात आलं आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या पाथरी इथल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर आंदोलन करताना एका शेतकऱ्याचा
मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ
बंद पाडली. मरडसगाव इथले शेतकरी तुकाराम काळे कर्ज मिळत नसल्यानं बॅंकेसमोर उपोषणाला
बसले होते, त्यांचा काल मृत्यू झाला. बँकेच्या कामकाजामुळे काळे यांचा मृत्यू झाला
असून, बँकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात
आली.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या
आजच्या पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद २७७ धावा झाल्या. इशांत शर्मा, हनुमा
विहारीनं प्रत्येकी दोन, तर जसप्रित बुमराह आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक गडी बाद केला.
****
राज्यात
तापमानात लक्षणीय घट झाली असून, आज सर्वात कमी दहा अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं
गेलं. औरंगाबाद १४ पूर्णांक चार, परभणी १५ पूर्णांक चार, तर नांदेड इथं १७ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment