Wednesday, 16 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.01.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 January 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.

****



§  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाअंतर्गत विविध योजना राबवण्यासाठी ७३६ कोटी रुपये अनुदान मंजूर

§  महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मान्यता

§  नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ

§  दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात

आणि

§  खेलो इंडिया स्पर्धेत औरंगाबादची नेमबाज हर्षदा निठवेला सुवर्णपदक

****



 विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाअंतर्गत  विविध योजना राबवण्यासाठी ७३६ कोटी रुपयांचं सहाय्यक अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मागासवर्गीय तरुण उद्योजकांसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजनेमार्फत दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि गट कर्ज परतावा योजनेंतर्गत १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार आहे.



इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाच्या २५ हजार रुपयांपर्यंतच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा एक लाख रुपये करणं, १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार देणं, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणीनुसार एकूण ३६ वसतीगृहं सुरू करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.



 केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबवणं, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.



 म्हाडा आणि सिडकोच्या भूखंडावर रहिवाशांना तसंच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्यानं किंवा विकास आणि वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दरानं अकृषिक दराची आकारणी करण्यात येऊ नये, तसंच यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

****



 महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक एक हजार २४१ कोटी रूपये निधीची तरतूद करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. देशभरातल्या  २९ हजार २६४ तर खाजगी क्षेत्रातल्या साडे तीन लाख महाविद्यालयीन शिक्षकांना या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. पदवी स्तरावरच्या तांत्रिक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनाही याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं अतिरीक्त एक हजार २४१ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

****



 राज्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काल मंत्रालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला.

****



 राज्यातल्या पाणी पुरवठा योजना, तसंच जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्य स्तरावरील अर्धवट असलेल्या पाणी पुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने गठीत समितीची बैठक मंत्रालयात काल झाली. या बैठकीत महसूल मंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यापेक्षा जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरु करणं आणि कायम स्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करणं यावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****



 बीड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग या तीर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिली आहे. काल याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. या निधीतून दर्शनबारीतलं प्रतिक्षागृह, भक्तनिवास, धर्मशाळा तसंच उपहारगृहाचं बांधकाम, मंदिर परिसरात उद्यान तसंच वाहनतळ विकसित करणं आदी विकास कामं करण्यात येणार आहेत.

****



 जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याला कालपासून  उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा यमुनेच्या संगमावर प्रारंभ झाला. पंचावन्न दिवस चालणाऱ्या यंदाच्या कुंभमेळ्यात १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रयाग संगमावर २१ स्नान घाट बनवण्यात आले आहेत. महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बावीस हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह, चौदाशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे. यासाठी आधुनिक ‘एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र’उभारण्यात आलं आहे.

 ****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. अजंता ॲम्बेसिडर हॉटेल इथं आयोजित या परिषदेचं आज सकाळी अकरा वाजता केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. ‘सूक्ष्म सिंचन आणि आधुनिक शेती’ असा या तीन दिवसांच्या परिषदेचा मुख्य विषय हा आहे. सूक्ष्म सिंचन क्षेत्रात कार्यरत विविध निर्माते, उत्पादक आणि लाभार्थ्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. विविध ५६ देशातल्या १०० विदेशी प्रतिनिधींसह जवळपास ७४० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये ठिबक आणि तुषार सिंचन योजनांचा वापर वाढवण्याच्या उद्देशानं, केंद्रीय जलसंपदा मंत्रालय आणि अन्य सहयोगी संस्थांच्यावतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ॲडलेड इथं झालेला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं सहा गडी राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित षटकात नऊ बाद २९८ धावा केल्या. भारतानं कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर पन्नासाव्या षटकांत चार चेंडू राखून हे लक्ष्य साध्य केलं. कोहलीनं १०४, महेंद्रसिंह धोनीनं ५५, रोहीत शर्मानं ४३ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत.

 ****



 पुणे इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत दहा मिटर पिस्तुल प्रकारात औरंगाबादच्या हर्षदा निठवेनं सुवर्णपदक पटकावलं आहे. २१ वर्षांखालील गटात हर्षदानं उत्तर प्रदेशातील युविका तोमरचा पराभव करत महाराष्ट्राला नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून दिलं. महाराष्ट्राच्या नेमबाजांनी काल नेमबाजीत रौप्य आणि कांस्य पदकाचीही कमाई केली. एकूण १७६ पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.

****



 युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या साळवा, कांडली आणि तोंडापूर या दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. कोणीही आत्महत्या करू नये तसंच दुष्काळानं खचून जाऊ नये असं सांगत शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचा धीर आदित्य ठाकरे यांनी दिला. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक शेतकऱ्यांना पशु खाद्य वाटप करण्यात आलं.

****



 भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दुष्काळ जाहीर करुन तालुक्यात एकही उपाययोजना लागू झाली नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचं भाकपकडून सांगण्यात आलं.

****



 जालना जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामं गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात सुरू असलेली विविध विकास कामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...