Wednesday, 16 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.01.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६   जानेवारी  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. अजंता ॲम्बेसिडर हॉटेल इथं आयोजित या परिषदेचं केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. ‘सूक्ष्म सिंचन आणि आधुनिक शेती’ हा या तीन दिवसांच्या परिषदेचा मुख्य विषय हा असून, यासंबंधी एक प्रदर्शनही या परिसरात भरवण्यात आलं आहे.

****

 आकाशवाणीच्या बातम्या खाजगी एफएम वाहिन्यांवरून प्रसारित करणं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं, प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूज वृत्तवाहिनीच्या एका चर्चासत्रात ते काल बोलत होते. खाजगी एफएम वाहिन्यांना सध्या फक्त हिंदी आणि इंग्रजी बातम्या प्रसारित करण्यासाठीची परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 प्रयागराज इथे सुरू झालेल्या कुंभ मेळ्यामध्ये काल पहिल्या दिवशी दोन कोटी पंचवीस लाख भाविकांनी शाही स्नानाचा लाभ घेतला, भाविकांच्या सहभागाची ही संख्या विक्रमी असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

****

 मुंबईतल्या बेस्ट बस सेवेच्या संपाचा आज नववा दिवस आहे. या संपामुळे मुंबईतल्या सुमारे तीन हजार बसेस बंद आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार, बेस्ट कर्मचारी संघटनांना या संपाबाबत आपला अंतिम निर्णय आज न्यायालयाला सांगायचा आहे.

****

 धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा रेल्वे स्थानकावर चार जलद गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. जामनगर - तिरुवेनेली एक्सप्रेस, पुरी - अजमेर एक्सप्रेस, सिकंदराबाद - बिकानेर एक्सप्रेस आणि पुरी - अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्या आता दोंडाईचा स्थानकावर थांबणार आहेत.

****



 लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून लातूर इथल्या क्रीडा संकुलावर १५० फूट उंचीचा ध्वज परवा शुक्रवारी १८ तारखेला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते फडकवला जाणार आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण, तसंच देशप्रेमाची भावना जागृत रहावी या उद्देशानं हा ध्वज फडकावला जाणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...