Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
विमुक्त
जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाअंतर्गत
येणाऱ्या महामंडळांना विविध योजना राबवण्यासाठी ७३६ कोटी रुपयांचं सहाय्यक अनुदान देण्यास
राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यात मागासवर्गीय तरुण उद्योजकांसाठी वैयक्तिक
कर्ज व्याज परतावा योजनेमार्फत दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि गट कर्ज परतावा योजनेंतर्गत
१० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार आहे.
इतर
मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाच्या २५ हजार रुपयांपर्यंतच्या थेट कर्ज योजनेची
मर्यादा एक लाख रुपये करणं, १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर
मागासवर्ग प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार देणं, मुलींसाठी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणीनुसार
एकूण ३६ वसतिगृहे सुरू करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
केंद्राची
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना
या दोन्ही योजना समन्वय साधून राबवणं, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत
आता शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
म्हाडा
आणि सिडकोच्या जमिनीवरील रहिवाशांना तसंच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्यानं
किंवा विकास आणि वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दरानं अकृषिक दराची आकारणी
करण्यात येऊ नये, तसंच यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली.
****
हवाई
वाहतूक क्षेत्रात झपाट्यानं पुढे येत असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असून, या
क्षेत्रातल्या सर्व देशांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री
सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक हवाई वाहतूक परिषदेचं आज उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. येत्या वर्षभरात राज्य सरकार नवी मुंबईचा विमानतळ कार्यान्वित
करेल, या विमानतळामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्याची भर पडू शकते, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मुंबई विमानतळ हे देशातलं सर्वात सक्षम व्यवस्थापन
असलेलं एक विमानतळ असल्याचं ते म्हणाले.
****
गेल्या
चार वर्षात राज्यात सुरु करण्यात आलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे सकारात्मक कार्यक्रम
आणि शिक्षकांनी केलेले प्रयत्न यामुळे महाराष्ट्रानं अन्य राज्यांच्या तुलनेत शिक्षणाच्या
विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं
आहे. मुंबईत आज राज्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळांचं सर्वेक्षण केलेल्या असर २०१८
या अहवालाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी तावडे
बोलत होते. राज्याच्या शिक्षणाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सरकार प्रयत्न करत
असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
परभणी
जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेच्या विविध मागण्यांसाठी
आज भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या वतीनं महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
दुष्काळ जाहीर करुन तालुक्यात एकही उपाययोजना लागू झाली नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात
आलं. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
धुळे
जिल्ह्यातल्या दोंडाईचा रेल्वे स्थानकावर चार जलद गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याठिकाणी जलद गाड्यांना
थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. जामनगर ते तिरुवेनेली एक्सप्रेस,
पुरी ते अजमेर एक्सप्रेस, सिकंदराबाद ते बिकानेर एक्सप्रेस आणि पुरी ते अहमदाबाद एक्सप्रेस
या गाड्या आता दोंडाईचा स्थानकावर थांबणार आहेत.
****
औरंगाबाद
इथं महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीच्या वतीनं येत्या १८ ते २१ जानेवारी दरम्यान
‘शारंगदेव समारोह’ या विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचा ‘शारंगदेव सन्मान’
हा राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार
आहे. या महोत्सवात पेरिणी नाट्यम्, चिंदू यक्षगानम, सुफी कव्वाली, सुंद्री वादन, ख्याल,
किर्तन यासह विविध विषयांवर कार्यशाळा, परिसंवाद आणि सप्रयोग व्याख्यान होणार असल्याची
माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ॲडलेड इथं झालेला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं सहा
गडी राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित षटकांत
नऊ बाद २९८ धावा केल्या. भारतानं कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर हे लक्ष्य
सहा गडी राखून पूर्ण केलं.
****
No comments:
Post a Comment