Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकरी कर्ज माफीबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण
जेटली यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री विधानपरिषदेत बोलत
होते. कर्जमाफी संदर्भात केंद्र सरकारला निवेदन दिलं असून, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. आज सादर होणाऱ्या अर्थ संकल्पावेळी विरोधकांनी गदारोळ न करता
शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. ३१ लाख शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असून, कर्जमाफी करण्यासाठी
केंद्रासोबत राज्यही स्वत:चा हिस्सा उचलायला तयार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावेळीही विरोधकांची घोषणाबाजी
सुरु होती. कामकाज सुरु होण्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधान
भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन सरकार विरोधी घोषणाबाजी केली.
विधान परिषदेतही या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले. कर्ज माफी
घोषित झाल्याशिवाय कामकाज होऊ देणार नसल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी कृषीकर्ज माफ करण्यासंदर्भात कृषी मंत्रालय आणि काही राज्यांशी बोलणी सुरू केली
आहे. कृषी कर्ज माफीबरोबरच कृषीच्या इतर विषयांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री
राधामोहन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तामिळनाडूचे अर्थमंत्री
डी जयकुमार यांनी जेटली यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली. या मागण्यांबाबत केंद्र
सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन जेटली यांनी यावेळी दिलं.
****
ज्येष्ठ भाजप नेते त्रिवेंद्रसिंह
रावत आज तीन वाजता उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपाल के के
पॉल हे देहरादूनमध्ये होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमात रावत यांना पद आणि गोपनियतेची
शपथ देतील. रावत यांची काल एकमतानं विधीमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
****
उत्तर प्रदेशमध्ये विधीमंडळ
नेतेपदाच्या निवडीसाठी आज आमदारांची लखनऊमध्ये चार वाजता बैठक होणार आहे. केंद्रीय
मंत्री वेंकय्या नायडू तसंच भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव हे देखील या बैठकीला हजर
राहाणार आहेत. तर उद्या लखनऊमध्ये नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
****
देशाच्या उत्तर-पूर्व भागांमध्ये
दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरींच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्याचं गृहमंत्री
राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते. उत्तर-पूर्व
भागामध्ये गेल्या २० वर्षांच्या तुलनेत घुसखोरींच्या घटनेमध्ये ७५ टक्क्यांनी घट झाली
असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. तर २०११ मधील ९९ नक्षलवाद्यांच्या तुलनेत २०१६
मध्ये २२२ नक्षलवादी मारले गेले असल्याचं सिंह त्यांनी सांगितलं.
****
नवीन शहरी पुनर्निर्माण उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतातल्या
शहरांच्या नागरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं मत केंद्रीय शहर विकास
मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत इंडिया टुडे परिषदेला संबोधित
करत होते. केंद्र सरकारची स्मार्ट शहरे मोहिम म्हणजे, शहरे
आणि नगरांना आर्थिक घडामोडींचं शाश्वत केंद्र म्हणून परिवर्तित करण्याचा महत्वाकांक्षी
उपक्रम असल्याचं ते म्हणाले.
****
महावितरणची महसूल वाढीसाठीची फेरआढावा
याचिका पूर्णपणे फेटाळावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप
होगाडे यांनी, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे केली आहे. महावितरणनं गेल्या वर्षी
दरवाढ लागू केली होती, आता पुन्हा २४ हजार २५१ कोटी रुपयांची महसूल वाढीची याचिका दाखल
केली असून, त्या पार्श्वभूमीवर होगाडे यांनी ही मागणी केली. महावितरणनं महसूल वाढीसाठी
केलेले दावे खोटे असून, पुन्हा बारा टक्के वीज दरवाढ ग्राहकांवर लादण्याचा महावितरणचा
प्रयत्न असल्याचा आरोप होगाडे यांनी केला आहे. ही याचिका फेटाळली नाही तर राज्यभर वीज
ग्राहकांचं जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठणी शालु, हिमरु
शाली आदी वस्त्रांच्या उत्पादनासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील,
तसंच त्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ स्थापन करण्यात येईल, असं विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
भापकर यांनी सांगितलं. ते औरंगाबाद इथं विभागीय हातमाग कापड स्पर्धा आणि बक्षिस वितरण
समारंभात बोलत होते. रेशीम उत्पादनाचं क्षेत्र चार हजार हेक्टर वरुन वीस हजार हेक्टरपर्यंत
वाढवण्यात येणार असून, यासाठी औद्योगिक वसाहतीत रेशीम युनिट स्थापन केले जातील, असं
भापकर यांनी सांगितलं.
//****//
No comments:
Post a Comment