Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 19 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
योगी
आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे २१वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल राम
नाईक यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारतीय
जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्री
पदाची तर आणखी
२२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
****
दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार
येत्या आठवडाभरात राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु करणार आहे. आर्थिक दुर्बल गटातल्या
वृध्दांना सामान्य आणि सक्रीय जीवन जगता यावं यासाठी त्यांना या योजनेअंतर्गत मदत केली
जाणार आहे. त्या अनुषंगानं गरजु वृध्दांना चाकाची खुर्ची, चष्मे, श्रवणयंत्र, दातांची
कवळी, कुबड्या आदी साधनं पुरवली जातील. ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील
नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
****
देशातल्या न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या तीन कोटींहून
अधिक खटल्यांपैकी सुमारे ४६ टक्के खटल्यांमध्ये सरकार एक पक्ष म्हणून अंतर्भूत असते.
न्यायालयांचा मोठा वेळ अशी प्रकरणं निकाली काढण्यात जातो. त्यामुळे अशा प्रत्येक खटल्यात
सरकारनं अपरिहार्य पक्ष होऊ नये अशी सूचना केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी
विविध केंद्रीय मंत्रालयांना आणि राज्य सरकारांना केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी असे
क्षुल्लक आणि त्रासदायक खटले शोधून ते लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत असं
त्यांनी म्हटलं आहे.
****
घटस्फोटाच्या खटल्यात अज्ञान बालकांच्या खर्चासाठी मिळालेली
रक्कम एकल पालकाच्या खात्यात जमा केल्यास त्यावर आयकर सूट द्यावी अशी शिफारस विधी आयोगानं
केली आहे. अशा ठेवींवरील व्याज सध्या पालकांच्या उत्पन्नात धरले जाते, ज्यावर आयकर
लागू शकतो.
****
प्रस्तावित वस्तू आणि सेवा करासंदर्भात दागिने आणि जडजवाहिर
उद्योगाच्या समस्यांबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. या क्षेत्रातल्या पुरस्कार सोहळ्यात ते मुंबई इथं
बोलत होते. हा उद्योग देशाला परकीय चलन मिळवून देतो आणि रोजगाराच्या संधीही निर्माण
करतो असं सांगत त्यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव असल्याचं ते म्हणाले. आपण व्यवसाय
उद्योग सुलभीकरण प्रक्रिया राबवत असल्यानं यासंदर्भात उपाय शोधण्याचे प्रयत्न करू असं
ते पुढे म्हणाले. आपला देश दागिने आणि जडजवाहिर निर्यातीत जगात सहाव्या क्रमांकावर
असून या उद्योगासंदर्भात विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचं ते म्हणाले.
****
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
सरकार ठामपणे उभं असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार
मदत करणार असल्याची ग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
दिली आहे. जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या गारपीटग्रस्त येलोरी, मासुर्डी गावांना पालकमंत्री
निलंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज भेट देऊन
पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान पीक विमा योजनेत ज्यांनी
विमा हप्ता भरला आहे त्यांना आणि ज्यांनी भरला नाही त्यांनाही मदत दिली जाणार असल्याचं
सांगत दानवे यांनी, सरकार शेतकरी कर्ज माफीच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. शेतीत
शाश्वत गुंतवणूक झाल्याशिवाय शेतकरी कर्जमुक्त होणार नसल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं
पहिला डाव नऊ बाद ६०३ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारानं २०२, वृद्धीमान सहानं
११७, मुरली विजयनं ८२, लोकेश राहुलनं ६७ तर रविंद्र जडेजानं ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा
दुसरा डाव सुरु झाला असून, दिवस अखेर त्यांच्या दोन बाद २३ धावा झाल्या. रविंद्र जडेजानं
दोन बळी घेतले. भारत १२९ धावांनी आघाडीवर आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ
एक-एकनं बरोबरीत आहेत.
****
नाशिक इथं आज जलजागृती सप्ताहांतर्गत
जलसंपदा विभागाच्या वतीनं ‘जल दौड’ काढण्यात आली. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी
या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
उस्मानाबादमधल्या हनुमाननगर भागात वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या
दोघांनी काल रात्री महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्यांनी आपल्या वाहनानं
अधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक दिल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी
सुमारे २० लाख रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment