Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 18 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी त्यांची
कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगत,
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतूदी तसंच विविध उपाययोजना घोषित
केल्या.
२०२१ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं
सांगत, जलसंपदा क्षेत्रासाठी आठ हजार २३३ कोटी, सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दोन
हजार ८२१ कोटी, ८२ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोन हजार कोटी, मागेल
त्याला शेततळे या योजनेसाठी २२५ कोटी, सौर कृषी पंपाचा अनुशेष दूर करण्यासाठी नऊशे
एकोणऐंशी कोटी, जलयुक्त शिवारासाठी बाराशे कोटी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी
चार हजार कोटी, सुक्ष्म सिंचनासाठी २०० कोटी, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी
१२५ कोटी, वीज जोडणीसाठी ९८१ कोटी, ॲग्रो मार्केटसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद केल्याचं
मुनगंटीवार यांनी सांगितलं.
त्याचप्रमाणे ऊस कारखान्यांना शेतकऱ्यांना किफायतशीर भाव
देता यावा यासाठी ऊस खरेदी कर रद्द करण्याची घोषणाही त्यांनी अर्थसंकल्पात केली. संत
शिरोमणी सावतामाळी आठवडी बाजार योजना विस्तारासाठी ५० कोटी, शेतमालालच्या वाहतुकीकरता
शीतवाहन योजना समूह गट शेतीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मुनगंटीवार
यांनी यावेळी सांगितलं.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार गावं दुष्काळमुक्त
करण्याचं ध्येय असल्याचं सांगत मुनगंटीवार यांनी, मराठवाड्यातला कृष्णा खोरे पाणी प्रकल्प,
तसंच अवर्षणग्रस्त भागासाठी पाणी पुरवठा प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करणार असल्याचं
सांगितलं. मराठवाड्यातल्या चार हजार आणि विदर्भातल्या १०० गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या
शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना आणणार असल्याचं ते म्हणाले.
शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी ४० कोटी, बंदर जोडणी प्रकल्पाला
चालना देण्यासाठी ७० कोटी, विदर्भ आणि मराठवाड्यात विजेच्या पुरवठ्यासाठी एक हजार कोटी,
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी ५७० कोटी, स्मार्ट सिटी योजनेसाठी
एक हजार ६०० कोटी, तसंच मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी १५ कोटी रुपयांची अतिरिक्त
तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
औरंगाबाद
इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी ३९ कोटी २८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून,
सांगली, यवतमाळ, नाशिक इथं कृषी महाविद्यालय स्थापन करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजता विकास अभियानाअंतर्गत राज्यभरात एक हजार ९७० प्रशिक्षण
केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक
बांधकाम विभागासाठी ३ हजार ५०० कोटी, राज्यातल्या रस्ते प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी,
मराठवाडा आणि विदर्भ विभागात नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी,
उद्योगात गुंतवणुकीसाठी औरंगाबाद इथं जागा उपलब्ध करुन दिली असून, त्यासाठी ५७० कोटी
रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबादच्या
कर्करोग रुग्णालयाचं रुपांतर राज्यस्तरीय कर्करोग संशोधन संस्थेत करण्यात येणार असून,
त्यासाठी १२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियानासाठी
५४५ कोटी, अल्पसंख्याक समाज कल्याण योजनांसाठी ३३२ कोटी, शाळांच्या माधान्ह आहार योजनांसाठी
३१० कोटी, महिला आयोगासाठी सात कोटी, महापुरुषांच्या स्मारकासाठी २०० कोटी, पंढरपूर
निर्मल वारीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
देशी-विदेशी
मद्य तसंच साप्ताहीक लॉटरी कर वगळता अन्य कुठल्याही वस्तूवर कर लावला जाणार नसल्याचं
अर्थमंत्र्यांनी करप्रस्ताव सादर करतांना सांगितलं. २०१७-१८ मध्ये चार हजार ५११ कोटी
महसुली तूट अंदाजित असल्याचं ते म्हणाले. कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी
स्वाईप मशीन स्वस्त, दूध परीक्षण कीटवरील कर माफ, मृदा चाचणी साहित्य स्वस्त, तसंच
मधुमक्षिका प्रक्रिया उद्योगावरचा २०१५-१६ पर्यंतचा कर माफ केल्याची घोषणा मुनगंटीवार
यांनी केली.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकरी कर्जमाफीच्या
मुद्यावरुन विरोधकांचा गदारोळ सुरुच होता. सरकारनं कर्जमाफीची घोषणा न केल्यामुळं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी
अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या.
****
त्रिवेंद्रसिंह
रावत यांनी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के के पॉल यांनी
त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रावत यांच्यासोबत नऊ मंत्र्यांनाही शपथ देण्यात
आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री यावेळी
उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment